बुलढाणा : स्वातंत्र्य काळापासून दीर्घकाळ विदर्भ काँग्रेसचा बालेकिल्ला आणि गांधी घराण्याचा चाहता राहिला. अगदी काँग्रेसचे विभाजन झाल्यानंतरही इंदिरा काँग्रेसला विदर्भाने पाठबळ दिले. यामुळे काँग्रेसच्या लेखी विदर्भाचे वेगळे स्थान राहिले. त्यामुळे वेळोवेळी राज्यात पक्ष नेतृत्वाची धुरा विदर्भातील नेत्यांवर सोपविण्यात आली. काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ या परंपरेतील एक नेते आहेत.
बुलढाणा जिल्ह्याला केंद्रीय मंत्रिमंडळात तीनदा आणि राज्य मंत्रिमंडळात वेळोवेळी स्थान मिळाले. मात्र राष्ट्रीय पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जवाबदारी जिल्ह्याला प्रथमच मिळाली. यापार्श्वभूमीवर जिल्ह्यात ‘बंटी दादा’ या नावाने ओळखले जाणारे हर्षवर्धन सपकाळ यांना ही संधी मिळाली. ते सध्याच्या बिकट अवस्थेत असलेल्या काँग्रेसला तारतील का ? काँग्रेसमधील टोकाची गटबाजी, प्रस्थापित नेत्यांची नाराजी, अहंकार याचा सामना करतानाच बलाढ्य भाजपाचा सामना करण्यात यशस्वी होतील का? आघाडीतील मित्र पक्षासोबत कसे जुळवून घेतील, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकात पक्षाला यशरूपी नव संजीवनी मिळवून देतील काय?असे एक ना अनेक प्रश्न त्यांच्या नियुक्तीने निर्माण झाले आहे.
आव्हानांचे डोंगर
केंद्रात व राज्यात काँग्रेस दीर्घ काळपासून सत्तेबाहेर आहे, विधानसभेतील दारुण पराभवामुळे काँग्रेसचे मनोबल खचले आहे. शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना या मित्र पक्षांची धुसपूस सुरूच आहे. अशा विषम राजकीय परिस्थितीत राज्य काँग्रेसची धुरा सपकाळ यांच्या हाती सोपविण्यात आली आहे. ते हे शिवधनुष्य कसे उचलतात यावरच त्यांच्या राजकीय कारकीर्दीचे मुल्यमापन होईल.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने त्यांच्या वाट्याला आलेल्या चारही जागा गमावल्या. पक्ष अनेक गटात, नेत्यांत विखुरला आहे, नेते जास्त आणि कार्यकर्ते कमी, अशी स्थिती आहे. त्यामुळे त्यांना पक्षाची वाढ करण्याच्या कामाची सुरूवात बुलढाण्यापासूनच करावी लागणार असून गटबाजी मोडून काढण्याचे कडवे आव्हान पेलावे लागणार आहे. आपापल्या मतदार संघात, जिल्ह्यात संस्थानिकाप्रमाणे राहणाऱ्या दिग्गज नेत्यांना आणि अडगळीत पडलेल्या कार्यकर्त्यांची मोट बांधावी लागणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये पक्षाला यश मिळवून देणे, जागा वाटपात काँग्रेसला सन्मानजनक जागा मिळवून देण्याची जवाबदारी त्यांना पार पाडावी लागणार आहे.
संघर्ष नवा नाही, पण…
विद्यार्थी संघटना ते युवक काँग्रेस, जिल्हा परिषद सदस्य व अध्यक्ष, आमदार, दिल्ली दरबारी वेगळे स्थान, ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक यांचे पट्टशीष्य, दस्तूरखूद्ध राहुल गांधी यांच्या गोटाचे विश्वासू अशी सपकाळ यांची राजकीय कारकीर्द राहिली आहे. बुलढाण्यासारख्या लहान गावातून त्यांनी सुरू केलेला राजकीय प्रवास प्रदेशाध्यक्षपदापर्यंत पोहचला आहे. त्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली, संघटनेत स्वतःला झोकून दिले. काही महिन्यापूर्वी ते बुलढाणा लोकसभा आणि विधानसभेच्या उमेदवारीसाठी धडपडत होते. मात्र कुणालाही पूर्णपणे न कळणाऱ्या राजकारणाच्या एका चालीत त्यांच्या हाती राज्याचे उमेदवार ठरविण्याची ताकद आली आहे. एक साधा कार्यकर्ता प्रदेश अध्यक्ष होऊ शकतो हे काँग्रेसने दाखविले आहे.अर्थात राहुल गांधींनी अनेक कसोट्यावर पारखून त्यांची प्रदेशाध्यक्ष या पदावर नियुक्ती केली, हे उघड रहस्य आहे. त्यावर ते किती खरे उतरतात हे पाहणे उत्सूकतेचे ठरणार आहे…