सोलापूर : सोलापूरच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभवाचा धक्का देत निवडून आलेल्या काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे लगेचच सक्रिय झाल्या आहेत. मतदारसंघातील प्रलंबित विकास कामे तडीस नेण्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर महापालिकेसह अन्य शासकीय आढावा बैठका घेऊन प्रशासनाला कामाला लावले आहे. दुसरीकडे मतदारसंघात प्रत्येक तालुक्यात कृतज्ञता मेळावे घेऊन भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडताना राजकीय वर्तुळात आक्रमकता दाखवली आहे. यातून त्यांची काही विधाने स्फोटक आणि वादग्रस्त ठरली आहेत. यातून त्या भाजपला पुन्हा अंगावर घेत आहेत. दुसरीकडे आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर सोलापुरात काँग्रेसची पक्ष भक्कम करण्याची जबाबदारीही त्यांनाच पेलावी लागणार असल्यामुळे त्यादृष्टीने त्यांना आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे.

एकेकाळी काँग्रेसचा मजबूत बालेकिल्ला राहिलेल्या काँग्रेसची सोलापुरातील स्थिती गेल्या दहा वर्षांत दयनीय झाली आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकूण सहापैकी पाच विधानसभा क्षेत्र महायुतीच्या आहेत. तर केवळ सोलापूर शहर मध्य ही एकच जागा काँग्रेसच्या ताब्यात प्रणिती शिंदे यांच्या माध्यमातून राहिली आहे. त्या आता खासदार झाल्यामुळे त्यांनी आमदारकी सोडली आहे. आगामी सोलापूर शहर मध्य विधानसभेच्या निवडणुकीत इतरांस उमेदवारी मिळवून देऊन निवडूनही आणायचे आहे. याशिवाय भाजपची मागील २५-३० वर्षांपासून मोठी ताकद असलेल्या सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात रसातळाला गेलेल्या काँग्रेसला पुन्हा नव्याने प्राण फुंकून पुनरुज्जीवित करायचे आहे. अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूरचा गडही भाजपच्या ताब्यातून सोडवून घ्यायचा आहे. दुसरीकडे मोहोळ, पंढरपूर आणि मंगळवेढ्यातही अस्तित्वहीन झालेल्या पक्षाची नव्याने बांधणी करावी लागणार आहे. ही जबाबदारी खासदार प्रणिती शिंदे यांनाच एक खांबी तंबू होऊन पेलायची आहे.

हेही वाचा – सांगलीत जागावाटपावरून काँग्रेस, शरद पवार गटात आतापासानूच कुरघोड्या सुरू

इकडे सोलापूर शहरात स्वतःच्या शहर मध्य विधानसभा मतदारसंघातही यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने मोठी झुंज देऊन अवघ्या ७९६ मतांच्या आघाडीवर काँग्रेसला रोखल्याच्या पार्श्वभूमीवर तेथेही जातीने लक्ष घालून आपली १५ वर्षे राखली गेलेली जागा कोणत्याही परिस्थितीत भाजपच्या ताब्यात जाणार नाही, याचीही खबरदारी खासदार प्रणिती शिंदे यांनाच घ्यावी लागणार आहे. किंबहुना, अक्कलकोटपासून ते मंगळवेढ्यापर्यंत पक्ष बांधणीसाठी स्थानिक नेत्यांची मोट बांधण्याचे काम खासदार प्रणिती शिंदे यांच्याशिवाय अन्य कोणी करू शकणार नाही. पक्षाची ताकद वाढली तरच यापूर्वी सोलापूर महानगरपालिकेतील गमावलेली सत्ता पुन्हा मिळवणे शक्य आहे. २०१७ सालच्या महापालिका निवडणुकीत एकूण १०५ जागांपैकी काँग्रेसला केवळ १४ जागांवरच समाधान मानण्याची नामुष्की ओढवली होती. पक्षाच्या नेतृत्वाकडून झालेल्या दुर्लक्षाचा हा परिणाम आजही पक्षाची दुर्दशा दाखवतो.

लोकसभा निवडणुकीत भाजपने जागा राखण्यासाठी ताकद पणाला लावून साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर केला होता. धार्मिक ध्रुवीकरणाचा आवडता प्रयोग केला असता त्यातून मिळालेली जास्तीची मते विशेषतः सोलापूर शहर मध्यमध्ये भाजपचा हुरूप वाढविणारी ठरतात. त्या अनुषंगाने या शहर मध्य विधानसभा मतदारसंघात भाजपने आतापासूनच जोर लावायला सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीत ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश केलेले पूर्वाश्रमीच्या काँग्रेसचे सूत्रधार दिवंगत विष्णुपत कोठे यांचे नातू देवेंद्र कोठे यांनी धार्मिक ध्रुवीकरणाच्या नजरेतून भडक विधाने केली होती. त्याबद्दल त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता. आता हेच देवेंद्र कोठे शहर मध्यच्या जागेसाठी भाजपकडून खूपच सक्रिय झाले आहेत. महायुतीच्या जागा वाटपात ही जागा शिवसेनेच्या वाट्याला असल्यामुळे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. शिवाजी सावंत यांनी साखर पेरणी सुरू केली आहे. मात्र भाजपच्या हट्टापुढे त्यांची डाळ शिजणार नाही, असे बोलले जाते.

हेही वाचा – “I, Nilesh Dnyandev Lanke…”; भाषेवरून हिणवलेल्या लंकेंची इंग्रजीतून शपथ, त्यांच्या कारकिर्दीवर एक नजर…

दुसरीकडे खासदार प्रणिती शिंदे यांचा उत्तराधिकारी होण्यासाठी काँग्रेससह महाविकास आघाडीमध्ये आतापासूनच चढाओढ लागली आहे. यातच लोकसभा निवडणुकीत प्रणिती शिंदे यांना पाठिंबा देण्याच्या मोबदल्यात त्यांच्या हक्काची शहर मध्य विधानसभेची जागा मिळण्यासाठी माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्वोच्च नेते शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आदी नेत्यांकडे खेटे घालायला सुरुवात केली आहे. याशिवाय याच शहर मध्यमध्ये एमआयएमनेही पुन्हा तगडे आव्हान देण्याची तयारी हाती घेतली आहे. त्यामुळे एकाचवेळी भाजप आणि एमआयएमच्या आव्हानाला सामोरे जायचे आहे. शिवाय महाविकास आघाडीतील घटक पक्षांचाही याच जागेवर डोळा आहे. अर्थात, त्यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांनाच राजकीय कौशल्य पणाला लावावे लागणार आहे. हेच त्यांच्यासमोरील आव्हान ठरणार आहे.