पिंपरी: एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात बोलण्यास विरोधी पक्षातील पदाधिकारीही घाबरत असताना आता मात्र स्वपक्षातील माजी नगरसेवकांकडूनच अजित पवार यांना थेट आव्हान दिले जात आहे. त्यांच्यावर नाराजी आणि आरोप करत नगरसेवक पक्ष सोडण्याचे इशारे देत आहेत. त्यामुळे पवार यांची पिंपरी-चिंचवडवरील राजकीय पकड सैल होताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बारामतीनंतर पिंपरी-चिंचवड शहरावर अजित पवार यांचे एकहाती वर्चस्व होते. लोकसभेला बारामतीमधून पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमधूनही एकनिष्ठ असणाऱ्या पक्षाच्या माजी नगरसेवकांकडूनच आव्हानाची भाषा केली जात आहे. अजित पवार सन १९९१ मध्ये बारामतीचे खासदार झाले. त्यावेळी शहराचा बारामती मतदारसंघात समावेश होता. खासदारकीच्या माध्यमातून पवार यांचा शहराच्या राजकारणात प्रवेश झाला. त्यानंतर त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांची स्वतंत्र फळी निर्माण केली. शहराचे कारभारी असलेले तत्कालीन काँग्रेसचे दिवंगत नेते प्रा.रामकृष्ण मोरे आणि पवार यांच्यात शह-काटशहाचे राजकारण सुरू झाले. पुढे राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर पवार यांनी शहराच्या राजकारणावर ताबा मिळविला. काँग्रेसमधील अनेकांना पक्षात घेतले. महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आणली. महापालिकेतील आणि शहरातील पक्ष संघटनेतील सर्व निर्णय अजित पवार यांच्या कलानेच होऊ लागले. ते सांगतील त्यालाच महापालिकेतील पदे मिळत होती. त्यांचा दरारा, वचक आणि आदरयुक्त भीती निर्माण झाली होती. त्यांच्याविरोधात बोलण्याचे धाडस कोणीही करत नव्हते. केवळ पक्षातीलच नव्हे तर विरोधी पक्षातील नगरसेवक, पदाधिकारीही पवार यांच्या विरोधात बोलण्याची हिम्मत करत नव्हते.

हेही वाचा >>>जालन्यात वैद्यकीय महाविद्यालय मंजुरीवरून श्रेयाची लढाई

राजकीय परिस्थिती बदलल्यानंतर कट्टर समर्थक असलेले दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, आझम पानसरे यांनी पवार यांची साथ सोडली. तिघांनी अजित पवारांना धक्का देत सन २०१७ च्या निवडणुकीत महापालिकेवर कमळ फुलविले. असे असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे ३८ नगरसेवक होते. प्रबळ विरोधी पक्ष होता. शहरातील राजकारणावर पवार यांची पकड कायम होती. शहरावर त्यांचे लक्ष होते. पक्षातील फुटीनंतरही सर्व पदाधिकारी पवार यांच्यासोबत राहिले. परंतु, लोकसभेला राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाल्याने आणि महायुतीत कोंडी होत असल्याने राजकीय भवितव्यासाठी माजी नगरसेवकांना घरवापसीचे वेध लागले आहेत. तत्कालीन शहराध्यक्षांसह भोसरीतील माजी नगरसेवकांनी घरवापसी केली. माजी आमदार विलास लांडे देखील लवकरच शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याचे त्यांच्या चिरंजिवाने सांगितले आहे.

हेही वाचा >>>महायुतीचा बंजारा समाजाच्या एकगठ्ठा मतांवर डोळा, मोदींची पोहरादेवीत सभा

चिंचवड मतदारसंघातील पाच माजी नगरसेवकांनी शरद पवार यांची भेट घेत. ‘ज्याला उमेदवारी द्याल’ त्याचा प्रचार करण्याची ग्वाही देत अजित पवारांना आव्हान दिले. आता माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनीही चिंचवडमधून निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे. सन २००९ च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्यामुळेच माझा पराभव झाला. पवारांनी सरड्याचा डायनासोर करत माझ्यासह अनेकांचा विश्वासघात केल्याचा आरोपही भोईर यांनी केला. चिंचवडच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीतील बंडखोरीमुळे कमी मतांनी पराभूत झालेले आणि अजित पवार यांचे निकटवर्तीय असलेले माजी नगरसेवक नाना काटे यांनीही विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी पक्ष सोडण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे पक्षाला गळती लागण्याची चिन्हे दिसत आहेत. दुसरीकडे, तीन महिन्यांपासून पक्षाला शहराध्यक्ष नाही. अजित पवार यांची शहरातील राजकीय पकड सैल होताना दिसत आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Challenging for ajit pawar in pimpri chinchwad assembly elections 2024 print politics news amy