गेल्या दोन विधानसभा निवडणुकांत उत्तर महाराष्ट्राने भाजपला बऱ्यापैकी साथ दिली. मात्र यंदा लोकसभेला येथील सहा जागांपैकी जळगाव जिल्ह्यातील दोन जागा वगळता उर्वरित चारही जागा महाविकास आघाडीने जिंकल्या. त्यामुळे आता विधानसभेला महायुतीचे काय होणार? याची चर्चा सुरू झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार अशा चार जिल्ह्यांत विधानसभेच्या ३५ जागा आहेत. गेल्या वेळी भाजप-शिवसेना युतीत भाजपने १३ तर शिवसेनेने ६ ठिकाणी यश मिळवले. राष्ट्रवादी काँग्रेसला सात तर त्यांचा मित्रपक्ष काँग्रेसला पाच जागा मिळाल्या. इतरांना चार मतदारसंघात विजय मिळाला. एकूणच या पट्ट्यात हिंदुत्वाला यश मिळाले, मात्र आता महायुती किंवा महाविकास आघाडी यात नवे भिडू आहेत. जागावाटपानंतरच येथील चित्र स्पष्ट होईल असे दिसते. चारही जिल्ह्यांत वेगळा कौल राहील अशी शक्यता दिसते.

हेही वाचा >>>माथाडी राजकारणाला शिंदे सेनेची बगल ? मराठा बहुल मेळाव्यावर भाजपचा प्रभाव

शरद पवार यांचा प्रभाव

उत्तर महाराष्ट्राचे केंद्र असलेल्या नाशिक जिल्ह्यात १५ जागा आहेत. नाशिक शहरातील तिन्ही जागा भाजपकडे आहेत. मात्र ग्रामीण भागात शरद पवार यांच्या विचारांना मानणारा मोठा वर्ग आहे. गेल्या वेळी जिल्ह्यात सहा जागा राष्ट्रवादीने जिंकल्या. आता फुटीनंतर सहाही आमदार अजित पवार यांच्याबरोबर गेले. मात्र लोकसभेला शरद पवार यांनी ताकद दाखवून दिली. नाशिक शहरात मेट्रोचा मुद्दा पुढे सरकत नाही. वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांविषयी विश्वास राहिलेला नाही. शहरात भाजपची पालिकेवर सत्ता असताना अनेक कामे प्रलंबित राहिल्याची तक्रार आहे. अर्थात शहरात भाजपचे संघटन मजबूत असून, एखादी जागा वगळता अन्य जागी त्यांची स्थिती उत्तम आहे. ग्रामीण भागात कांद्याचा मुद्दा पुन्हा केंद्रस्थानी येईल. कांदाप्रश्नी सरकारचे अनिश्चित धोरण मविआच्या मदतीला येईल. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाने काही प्रमाणात मराठा विरुद्ध इतर मागासवर्गीय असे ध्रुवीकरण झाले आहे. त्यामुळे उमेदवार देताना राजकीय पक्ष तो विचार करतील. सध्या शरद पवार यांच्या पक्षाकडे उमेदवारीसाठी असलेली मागणी पाहता नाशिकच्या ग्रामीण भागात त्यांचा प्रभाव दिसेल. तर महायुतीची मदार प्रामुख्याने लाडक्या बहिणींवर आहे.

भाजपची ताकद

जळगाव जिल्ह्यात गेल्या वेळी भाजपला दोन जागा गमवाव्या लागल्या होत्या. त्यात एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगरचा समावेश होता. खडसेंच्या कन्येचा पराभव झाला. नंतर खडसे भाजपमधून बाहेर पडले. जिल्ह्यात महायुतीत इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यातच कापूस, पाण्याच्या प्रश्नावरून नाराजी आहे. गेल्या वेळी शिवसेनेने चार जागा जिंकल्या होत्या. पक्षातील फुटीनंतर ज्येष्ठ नेते गुलाबराव पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आहेत. लोकसभा निकाल व राज्यपातळीवर जिल्ह्यातून कार्यरत असलेले नेते पाहता कागदावर तरी महायुतीचे बळ अधिक दिसत आहे. विधानसभेच्या जळगाव जिल्ह्यात भाजपच्या प्रभावाची कसोटी लागेल, तसेच विभागातील अन्य ठिकाणी एखादी जागा कमी होत असेल तर, भाजप येथून भरपाई करण्याचा प्रयत्न करेल.

हेही वाचा >>>Tripura : त्रिपुरा दहशतवादमुक्त? ‘एनएलएफटी’ आणि ‘एटीटीएफ’ बंडखोर गटाच्या ६०० सदस्यांचं आत्मसमर्पण

धुळे जिल्ह्यात धुळे ग्रामीण वगळता अन्यत्र भाजप क्रमांक एक किंवा दोनवर राहिला. धुळे शहरातील जागा एमआयएमने जिंकली होती. यंदा तेथे भाजपने ताकद लावली आहे. उमेदवारांची संख्या आणि ध्रुवीकरण हा घटक या वेळी निकालात महत्त्वाचा ठरेल. शिंदखेडा मतदारसंघात ज्येष्ठ नेते जयकुमार रावल यांना आव्हान देण्याची तयारी महाविकास आघाडीतून सुरू आहे. तेथील सामना उत्कंठावर्धक होण्याची चिन्हे आहेत.

उत्तर महाराष्ट्रात गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची कामगिरी चांगली झाली आहे. मात्र लोकसभेला महाविकास आघाडीने येथे बाजी मारली. या विभागातील चारही जिल्ह्यांतील राजकीय समीकरणे वेगळी आहेत. जागावाटप आणि उमेदवार ठरल्यानंतर संधी न मिळालेले कोणता पर्याय शोधतात यावर येथील काही जागांचे निकाल ठरतील.

भाजप विरुद्ध काँग्रेस

आदिवासीबहुल नंदुरबार जिल्ह्यात भाजप विरुद्ध काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांमध्येच अटीतटी होण्याची चिन्हे आहेत. आदिवासी-धनगर आरक्षण वादाचा परिणाम जाणवेल. भाजपचे ज्येष्ठ नेते मंत्री विजयकुमार गावित यांच्याविरोधात सारे एकटवले तर चुरस वाढेल. लोकसभेला गावित यांच्या कन्येचा पराभव झाला. गेल्या वेळी जिल्ह्यातील चारपैकी भाजप व काँग्रेसला प्रत्येकी दोन जागा मिळाल्या. अक्कलकुव्यात चुरशीच्या लढतीत शिवसेनेचा पराभव झाला होता. आता ती जागा शिंदे गटाला मिळणार काय? हा प्रश्न आहे. नवापूर हा काँग्रेसचा प्रभाव असलेला मतदारसंघ आहे. तेथे महायुतीमधून कोण आव्हान देणार? येथेही जागावाटप महत्त्वाचे ठरेल.