पीटीआय, रांची
मी राजकारण सोडणार नाही. नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याचा पर्याय नेहमीच खुला आहे, असे झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी स्पष्ट केले.सोरेन म्हणाले की, ‘झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेत्यांकडून अपमान सहन केल्यानंतर’ मी माझ्या योजनांवर ठाम आहे. आपण झारखंड मुक्ती मोर्चासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केल्याचा दावा सोरेन यांनी केला. ‘हा माझ्या आयुष्यातील एक नवीन अध्याय आहे,’ असेही सोरेन यांनी मंगळवारी सरायकेला-खरसावन जिल्ह्यातील झिलिंगोरा या मूळ गावी पोहोचल्यानंतर सांगितले.
मी राजकारण सोडणार नाही, कारण मला माझ्या समर्थकांचे खूप प्रेम आणि पाठिंबा मिळाला आहे. मी नवीन पक्ष स्थापन करू शकतो, असे सोरेन यांनी सांगितले. सोरेन यांनी झारखंडच्या निर्मितीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना ‘झारखंडचा वाघ’ असे टोपणनाव देण्यात आले.
हेही वाचा >>>Badlapur : बदलापूरमधली लैंगिक अत्याचाराची घटना आणि महाराष्ट्रात उठलेलं राजकीय वादळ
चंपई म्हणाले, ‘‘झामुमोच्या कोणीही माझ्याशी संपर्क साधला नाही. ही झारखंडची भूमी आहे… मी माझ्या विद्यार्थीदशेपासूनच संघर्ष करत आलो आहे. मी पक्षाचे प्रमुख शिबू सोरेन यांच्या नेतृत्वाखाली झारखंड राज्याच्या आंदोलनात भाग घेतला. मला समविचारी पक्ष किंवा मित्र आढळल्यास कोणत्याही पक्षाशी हातमिळवणी करेन.’’ १८ ऑगस्टला समाज माध्यमांवरील पोस्टचा संदर्भ देत, ते म्हणाले, ‘मला जे योग्य वाटले तेच मी पोस्ट केले. मला काय वाटले हे संपूर्ण देशाला माहीत आहे.’ मुख्यमंत्री म्हणून त्यांना ‘घोर अपमान’ सहन करावा लागला, ज्यामुळे त्यांना पर्यायी मार्ग स्वीकारावा लागला.