महेश सरलष्कर
काँग्रेसच्या कन्याकुमारीहून निघालेल्या ‘भारत जोडो’ यात्रेमध्ये राहुल गांधी लोकांशी मनमोकळेपणाने संवाद साधत असले तरी, ‘पुन्हा पक्षाध्यक्ष होणार की, नाही’, हाच मुद्दा अधिक चर्चेत राहिलेला आहे. तामिळनाडूतील नागरकोईलमध्ये शुक्रवारी राहुल गांधी यांनी घेतलेली भूमिका पाहता, गांधी वगळता इतर नेताच काँग्रेसचा पक्षाध्यक्ष होऊ शकेल हे आता स्पष्ट होऊ लागले आहे.
‘’भारत जोडो’’ यात्रेच्या काळात काँग्रेसची पक्षाध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार असून रिंगणात गांधी कुटुंबापैकी कोणी उमेदवार उतरला नाही तर, बंडखोरांपैकी एखादा नेता ‘गांधीसमर्थक’ उमेदवाराला आव्हान देऊ शकतो. राहुल गांधी यांनीच पक्षाध्यक्षपद स्वीकारले पाहिजे, असा आग्रह अजूनही काँग्रेसचे नेते त्यांना करत आहेत. मात्र, शुक्रवारी राहुल गांधी यांनी, (पक्षाध्यक्षपदासंदर्भात) ‘मी निर्णय घेतलेला आहे. मला काय करायचे आहे, हे मी निश्चित केलेले आहे. त्याबाबत माझ्या मनात कोणतीही शंका नाही’, असे स्पष्ट केले. राहुल यांनी पक्षाध्यक्षपद स्वीकारण्याबाबत कोणताही सकारात्मक प्रतिसाद दिला नाही.
हेही वाचा… जळगाव : शिवसेना महापौरांच्या निवासस्थानावर गणेश मंडळ कार्यकर्त्यांकडून पेटत्या सुतळी बॉम्बसह दगडफेक
पक्षाध्यक्षपदासाठी २४ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल व ३० सप्टेंबर अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. १७ ऑक्टोबर रोजी मतदान होईल व १९ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर केला जाईल. मतदानाच्या दिवसापर्यंत ‘भारत जोडो’ यात्रा कर्नाटकमध्ये पोहोचलेली असेल. तिथे काँग्रेसच्या ‘यात्रेकरू’ मतदारांना मतदान करता येऊ शकेल. बंगळुरूतील प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयात मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, ‘मी अर्ज भरला नाही तर, मी असे का केले असा प्रश्न तुम्ही विचारू शकता. त्यावर मी उत्तरही देईन’, असे राहुल गांधी यांनी पत्रकारांना सांगितले. राहुल गांधी यांच्या या दोन्ही विधानांमुळे ते काँग्रेसच्या पक्षाध्यक्षपदाची धुरा सांभाळण्याची शक्यता धूसर झाल्याचे दिसते.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या काळात काँग्रेसने राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली महागाईविरोधात आंदोलन केले होते. राहुल यांच्यासह अनेक काँग्रेसनेत्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेऊन किंग्जवे पोलिसांच्या मोठ्या सभागृहात ठेवले होते. तिथे राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्यांच्या पक्षाध्यक्षाच्या मुद्द्यावरून विनापडदा चर्चा झाली होती. काँग्रेसनेत्यांनी राहुल यांना, त्यांनी पक्षाध्यक्षपद स्वीकारण्याची गरज का आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा, राहुल गांधी यांनी, ‘तुम्ही गांधी कुटुंबासाठी काम करता की, काँग्रेससाठी’, असा थेट प्रश्न विचारला होता. ‘काँग्रेस ही विचारसरणी आहे, त्यासाठी मीही काम करत आहे, त्यामुळे पक्षाध्यक्ष कोण असेल हा मुद्दा महत्त्वाचा ठरत नाही’, असे राहुल गांधी यांनी नेत्यांना स्पष्ट केले होते असे काहींचे म्हणणे आहे.
हेही वाचा… Video : गणेशोत्सव मिरवणुकीत भाजपाचेच दोन गट आपापसांत भिडले; अखेर पोलिसांना करावी लागली मध्यस्थी!
दीडशे दिवसांच्या ‘भारत जोडो’ यात्रेमध्ये राहुल गांधी सक्रिय झाले असून या यात्रेवर लक्ष केंद्रीत करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे. ‘यात्रेमध्ये मी लोकांच्या गाठीभेटी घेत आहे, या अनुभवातून दोन-तीन महिन्यांनी मी अधिक परिपक्व झालेलो असेन’, असेही राहुल गांधी यांचे म्हणणे होते. ‘भारत जोडो यात्रेमध्ये अनेक जण सहभागी होत आहेत, त्यापैकी मी एक आहे, ही यात्रा माझ्या नेतृत्वाखाली चाललेली नाही. तुम्ही (पत्रकार) माझ्याकडे जास्त लक्ष देत आहात इतकेच’, असे सांगत राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाच्या मुद्दा चर्चेतून बाजूला करण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा… पुणे : विसर्जन मिरवणूक अद्यापही लांबलेलीच
काँग्रेसच्या पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी स्वीकारावी असा आग्रह केला जात आहे. मात्र, अशोक गेहलोत यांनी मुख्यमंत्रीपद सोडण्यास नकार दिला तर मात्र, वेगळ्या नेत्याचा विचार करावा लागणार आहे. गेहलोत यांच्याप्रमाणे मुकुल वासनिक वगैरे अन्य नेत्यांची नावेही आता चर्चेत आली आहेत. महासचिव मुकुल वासनिक यांना मध्य प्रदेशच्या प्रभारीपदातून मुक्त करण्यात आले आहे. त्यांच्यावर काँग्रेसकडून नवी जबाबदारी दिली जाणार असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, शशी थरूर आदी पाच नेत्यांनी निवडणूक विभागाचे प्रमुख मधुसुदन मिस्त्री यांना पत्र लिहून निवडणूक प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्याची मागणी केली आहे. काँग्रेसच्या नव्या पक्षाध्यक्षासाठी दीड महिन्याचा कालावधी राहिलेला असताना पक्षांतर्गत निवडणूक अधिक उत्सुकतेची झाली आहे.