आंध्रप्रदेशमध्ये २०२४ साली विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहे. यासाठी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील वायएसआर काँग्रेसने जाहीर सभांचे आयोजन करण्यात येत आहेत. याला प्रत्युत्तर म्हणून तेलुगू देसम पक्षाचे ( टीडीपी ) अध्यक्ष चंद्रबाबू नायडू हे ‘जगन हटवा, आंध्रप्रदेश वाचवा’ ही मोहिम उघडत सरकारविरोधात मैदानात उतरले आहेत. तसेच, टीडीपीला सत्ता दिली नाहीतर, २०२४ च्या निवडणुका ह्या शेवटच्या असतील, असेही चंद्रबाबू नायडू यांनी सांगितलं.
आंध्रप्रदेशमधील विजयनगरम जिल्ह्यातील बोबिली येथे बोलताना चंद्रबाबू नायडू यांनी सत्ताधारी वायएसआर काँग्रेसवर सडकून टीका केली. “सरकारच्या धोरणांवर राज्यातील एकही वर्ग खूश नाही. जगन मोहन रेड्डी यांनी केलेल्या आवाहनाला बळी पडून, जनतेने निवडून दिलं. पण, येत्या निवडणुकीत रेड्डींचा पराभव करणे हा एकमेव पर्याय आहे,” असे चंद्रबाबू नायडू यांनी म्हटलं.
“राज्यावर साडेनऊ लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती, वीजेचे दर, घरपट्टी कराच्या दरात वाढ झाली आहे. राज्यातून गुंतवणूकदार पळून जात आहेत. त्यामुळे तरुणांना रोजगार मिळत नाही. अमरावतीला राजधानी न करण्याचा निर्णय घेतल्याने ३ लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे,” असेही चंद्रबाबू नायडू यांनी सांगितलं.
हेही वाचा : “काश्मीरमध्ये परिस्थिती नियंत्रणात येत नाही, तोपर्यंत काश्मीरी पंडितांचे…”; गुलाब नबी आझाद यांचं मोठं विधान
“जगन मोहन रेड्डी जनतेला १० रुपये देतात आणि दुसरीकडे १०० रुपये वसूल करतात. त्यामुळे महागाई वाढली आहे. मुख्यमंत्र्यांना याची जाणीव नाही, जनतेला याचा त्रास सहन करावा लागत आहे. राज्यातील सर्वच भागातील रस्त्यांची अवस्था वाईट का झाली?,” असा सवालही चंद्रबाबू नायडूंनी उपस्थित केला आहे.