मागील काही दिवसांपासून आंध्र प्रदेशच्या राजकारणात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. तेलुगू देशम पार्टीचे (टीडीपी) अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांच्या सभेत चेंगराचेंगरी झाल्यामुळे ७ जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे येथे वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर आगामी २०२४ च्या विनासभा निवडणुकीत विजय न झाल्यास, माझी ती शेवटची निवडणूक असेल असे नायडू यांनी जाहीर केले आहे. नायडू यांच्या या विधानामुळेही अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. दरम्यान, नायडूंच्या या घोषणेनंतर टीडीपीचे नेतृत्व नायडू यांचे पुत्र एन लोकेश नायडू यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. ४ हजार किमी पदयात्रेच्या माध्यमातून टीडीपीतर्फे तसा प्रयत्न केला जात आहे
हेही वाचा >> गुजरात विजयानंतर आता मिशन कर्नाटक! ‘या’ दोन भागावंर असणार भाजपाचे विशेष लक्ष
लोकेश टीडीपीच्या ४००० किलोमीटर पदयात्रेचे नेतृत्व करणार आहेत. याच पदयात्रेच्या माध्यमातून ते टीडीपीचा मुख्य चेहरा म्हणून उदयास येण्यासाठी प्रयत्न करतील. बुधवारी (२८ डिसेंबर) टीडीपी पक्षाने युवा गलम (युवकांचा आवाज) पदयात्रेची घोषणा केली. तसेच या यात्रेचे नेतृत्व लोकेश करतील असेही टीडीपी पक्षाकडून यावेळी जाहीर करण्यात आले. ही यात्रा एकूण ४०० दिवसांची असून यात्रेच्या माध्यमातून ४ हजार पायी प्रवास केला जाणार आहे. आगामी वर्षातील २७ जानेवारी रोजी या यात्रेची सुरुवात होणार आहे.
टीडीपीच्या नेत्यांचा पाठिंबा
हेही वाचा >> “ऋषभ पंतला आईला सरप्राईज द्यायचं होतं, पण…”, उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली माहिती
आगामी काळात टीडीपी पक्षाचे नेतृत्व लोकेश यांच्याकडे येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे टीडीपी पक्षातील नेत्यांनीही लोकेश यांना पूर्ण पाठिंबा दिला आहे. याविषयी टीडीपी पक्षाचे नेते काल्वा श्रीनिवासुलू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “लोकेश यांनी याआधी माहिती आणि तंत्रज्ञान, पंचायतराज अशी खाती सांभाळलेली आहेत. त्यामुळे त्यांना लोकांच्या अडचणी माहिती आहेत,” असे म्हणत काल्वा यांनी लोकेश यांना पाठिंबा दिला.
लोकेश यांनी मे २०१३ मध्ये राजकारणात प्रवेश केला. त्यांनी स्टँडफोर्ड विद्यापीठातून एमबीएचे शिक्षण घेतलेले आहे. २०१५ साली सत्तेत आल्यानंतर चंद्राबाबू नायडू यांनी लोकेश यांच्याकडे मोठी जबाबदारी दिली होती. नायडू यांनी लोकेश यांच्याकडे पक्षाचे सरचिटणीसपद सोपवले होते. तर २०१७ साली विधानपरिषदेवर आमदारकी देऊन लोकेश यांना आयटी, पंचायतराज, ग्रामीण विकास विभागाचे मंत्रीपद देण्यात आले होते.
दरम्यान, लोकेश यांचा त्यांनी लढवलेल्या पहिल्याच निवडणुकीत पराभव झाला होता. मे २०१९ मध्ये त्यांनी मंगलगिरी विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्याचा ५३३७ मतांनी पराभव झाला होता. त्यामुळे आगामी काळात त्यांची राजकीय वाटचाल कशी असेल? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.