मधु कांबळे
अनेक स्पर्धकांवर मात करत माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी विधान परिषदेची काँग्रेसची उमेदवारी पटकावली. विधान परिषदेच्या दहा जागांच्या निवडणुकीत आघाडीच्या सत्ता समीकरणात दोन जागा काँग्रेसच्या वाट्याला आल्या. त्यातही एक जागा हमखास निवडून येणारी. दुसऱ्या जागेसाठी संघर्ष करावा लागणार. परंतु हंडोरे यांचे काँग्रेसच्या उमेदवार यादीत पहिलेच नाव. त्यामुळे त्यावरून तरी त्यांचा विधान परिषदेत जाण्याचा मार्ग सुकर असल्याचे मानले जाते.
काँग्रेसच्या वाट्याला दोन जागा, त्यात अनेकजण स्पर्धेत उतरले होते. माजी मंत्री नसीम खान, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, माजी आमदार मोहन जोशी, अशी बरीच नावे चर्चेत होती. अखेर हंडोरे यांनी बाजी मारली. त्यांना उमेदवारी देण्यामागे काँग्रेसची राजकीय गणिते आहेत. काँग्रेसचा मुख्य जनाधार हा दलित, आदिवासी, मुस्लिम समाज राहिला आहे. २०१४ च्या निवडणुकीत हा जनाधार कमी झालेला दिसतो. काँग्रेसला त्यांचा पारंपरिक मतदार पुन्हा जोडून घ्यायचा आहे. हंडोरे हे मूळचे आंबेडकरी चळवळीतील लढवय्या कार्यकर्ते आहेत. दलित पॅंथर, भारिप-बहुजन महासंघ, रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) ते काँग्रेस असा त्यांचा राजकीय प्रवास आहे.
१९८५ मध्ये मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून येऊन, त्यांनी राजकीय प्रवासाला सुरुवात केली. पुढे १९९२-९३मध्ये आपले खास राजकीय कौशल्य वापरून मुंबईचे महापौरपदही मिळविले. पुढे कालांतराने ते काँग्रेसमध्ये दाखल झाले. २००४ मध्ये ते चेंबूर मतदारसंघातून निवडून आले आणि विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री झाले. सामाजिक न्याय मंत्री म्हणून त्यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले होते. मंत्रिमंडळातही आक्रमक मंत्री म्हणून त्यांची चर्चा असायची. २००९ मध्ये ते दुसऱ्यांदा विधानसभेवर निवडून आले, परंतु त्यांना अंतर्गत स्पर्धेत मंत्रिपद मिळू शकले नाही. काँग्रेसमध्ये असूनही त्यांनी भीमशक्ती नावाचा आपला दबाव गट कायम तयार ठेवला. सध्या ते प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आहेत. सामाजिक अभिसरणाच्या प्रयोगातील मोहरा किंवा चेहरा म्हणून काँग्रेसला हंडोरे यांना सभागृहात आणण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जाते.
सचिन अहिर – कामगार ते गृहनिर्माण… सर्वत्र संचार
राज्यात सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये मोठ्या संख्यने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या दृष्टीने आणि अर्थातच काँग्रेसच्या दृष्टीनेही मुंबई महापालिका निवडणूक अति महत्त्वाची आहे. त्यादृष्टीनेही हंडोरे यांची निवड विशेष मानली जाते. हंडोरे यांचे राजकीय कार्यक्षेत्र हे प्रामुख्याने मुंबई राहिले आहे. कार्यकर्ता, नगरसेवक, महापौर ते मंत्री म्हणून त्यांना मुंबईतील सामाजिक, राजकीय परिस्थितीची चांगली माहिती आहे. मुंबईत दलित समाजही मोठ्या संख्येने आहे. चंद्रकांत हंडोरे यांची विधान परिषदेवर निवड करून काँग्रेसचा दलित समाजाची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न राहणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत हंडोरे हा काँग्रेसचा महत्त्वाचा चेहरा असणार आहे.