सुहास सरदेशमुख
औरंगाबाद : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची औरंगाबाद येथे आयोजित सभेच्या दिवशी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी कीर्तनाचे आयोजन केले. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या या कार्यक्रमास गर्दी होती आणि भाजपच्या कार्यक्रमातून महिला ठराविक वेळेनंतर उठून जात असल्याचे चित्र दिसून आले. गर्दीच्या निकषावरुन आता लोकसभेच्या तयारीची समीकरणे मांडली जात आहेत. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी माजी खासदार खैरे यांना निवडणूक लढण्यासाठी तयारीचे संकेत दिल्याने त्यांनी नव्याने संपर्क वाढविला आहे. खरे तर माध्यमांमध्ये सर्व विषयांवर जमेल तशी पक्षाची बाजू रेटणारा नेता अशी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची ओळख बनू लागली होती. मात्र, कमी मताने पराभूत झालेल्या खैरे यांच्याविषयी असणारी सहानुभूती आणि वंचितबरोबरची युती असा नवा डाव मांडून खैरेदेखील लोकसभेच्या मैदानात पाय रोवून उभे राहणार असल्याचे सांगत आहेत.
महाविकास आघाडीत सहभागी झाल्यापासून शिवसेनेविषयी मुस्लिम मतदारांमध्ये सकारात्मकता निर्माण झाली असल्याचा दावा केला जात आहे. तर प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर सुरू असणाऱ्या बोलणीमुळे वंचितच्या मतांचाही फायदा हाेईल, असा दावा केला जात आहे. या अनुषंगाने बोलताना चंद्रकांत खैरे म्हणाले, ‘काँग्रेस- राष्ट्रवादीबरोबरच विविध स्तरावरील लोक शिवसेनेशी जोडले जात आहेत. अनेकांचा पश्चाताप होतो आहे. नाहकच पराभव झाला, अशी भावना आहे. त्यामुळे पुन्हा निवडणूक लढावयाची असे ठरवून संपर्क वाढवत आहे. समोर भाजप असो किंवा शिंदे गट त्याने फरक पडत नाही.’
हेही वाचा >>> तेलंगणात केसीआर यांना मोठा धक्का? BRSचा तगडा नेता अमित शाहांची भेट घेणार
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात चंद्रकांत खैरे यांनी १९९९ ते २०१९ या कालावधीमध्ये सलग चार वेळा विजय मिळविला होता. त्या वेळी भाजपची मतेही चंद्रकांत खैरे यांच्या पदरात पडत. त्यामुळे शिवसेना नेते खैरे यांच्या रा. स्व. संघ परिवारातील धुरिणांबरोबर चांगले संबंध होते. मात्र, गेल्या काही दिवसांत शिवसेनेची भूमिका बदलल्यानंतर ते संबंध परिवारातील व्यक्तींना मतदार बनवू शकतात का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत एकूण मतदानाच्या ४२.८ टक्के मतदान खैरे यांना मिळाले होते. तर २०१४ मध्ये मोदी लाटेत हे शेकडा प्रमाण ५३ टक्क्यांपर्यंत वाढले होते. लोकसभा निवडणुकीत भाजपशिवाय पहिल्यांदा निवडणूक लढविताना शिवसेनेला पूर्ण ताकद लावावी लागणार आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेनेतील मराठा- मराठेत्तर वादाचा फटका खैरे यांना बसला होता. या वेळी खैरे त्यासाठी नवा डाव मांडू पाहत आहेत.