पुणे : राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड विधानसभा मतदारसंघावर भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी दावा केला आहे. आगामी विधानसभा निवडणूक कोथरूडमधून लढण्याची बालवडकर यांनी तयारी केली असून गेल्या काही दिवसांपासून त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन देखील सुरू केले आहे. स्वपक्षातून विरोध होऊ लागला असल्याने पाटील यांच्यासमोर नाराजी रोखण्याचे आव्हान उभे राहिले आहे.

कोथरूड विधानसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत या मतदार संघातील विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांना तिकीट नाकारून भाजपचे तत्कालीन प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. पाटील या मतदारसंघातून निवडून आले.

आणखी वाचा-“मोदीशहांच्या हाती महाराष्ट्र देऊ नका!”, मल्लिकार्जुन खरगे यांचे आवाहन

कोथरूड विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असलेले मुरलीधर मोहोळ आणि माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना दिल्लीत संधी देण्यात आली. त्यामुळे यावेळी देखील कोथरूडमधून चंद्रकांत पाटलांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. मात्र असे असतानाच आता या मतदारसंघातून पुणे महापालिकेचे माजी नगरसेवक आणि शहर सुधारणा समितीचे माजी अध्यक्ष अमोल बालवडकर यांनी दावा केला आहे. बालवडकर यांनी कोथरूड भागात जनसंपर्क कार्यालय सुरू केले असून होम मिनिस्टर, लाडकी बहीण योजनेची माहिती सांगणारे रथ तसेच विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून ते कोथरूड विधानसभा मतदारसंघात सक्रिय झाले आहेत. यामुळे येणाऱ्या काळात या मतदारसंघावरून भाजपमध्ये बंडाळी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून शहराध्यक्ष दीपक मानकर यांनीही विधानसभा लढविण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे पाटील यांना सोपी वाटणारी निवडणूक आता आव्हानात्मक झाली आहे. महाविकास आघाडीमध्ये कोथरूडची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मिळण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाकडून माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, पृथ्वीराज सुतार यांनी तयारी सुरू केली आहे. सुतार यांनी काही दिवसांपूर्वी उमेदवारीसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली होती.

आणखी वाचा-वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या थेट भरतीच्या निर्णयावरून एनडीएत मतभेत? कुणाचा पाठिंबा, तर कुणाचा विरोध; नेमकं काय घडलं?

भाजपमधून कोथरूड मतदार संघातून मी विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहे. गेली अनेक वर्षे पक्षाचे काम निष्ठेने केले आहे. विजयाची क्षमता असलेल्या व्यक्तीलाच उमेदवारी दिली जाईल. यासाठी भाजप माझा नक्की विचार करेल, असा मला विश्वास आहे. -अमोल बालवडकर, माजी नगरसेवक, भाजप