लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चंद्रपूर : अनुसूचित जातीसाठी राखीव चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्याने भाजप कार्यकर्ते ब्रिजभूषण पाझारे यांनी बंडखोरी केली आहे. एका ‘यूट्यूब चॅनल’ला दिलेल्या मुलाखतीत पाझारे भावूक झाले आणि त्यांनी आता माघार नाहीच, अशी भूमिका स्पष्ट केली. पक्षाच्या कोणत्याही वरिष्ठ नेत्याने उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव आणल्यास आत्महत्येसारखे पाऊल उचलणार, असा इशाराही त्यांनी दिला.

पाझारे यांचे हे पाऊल चंद्रपूरचे भाजप उमेदवार किशोर जोरगेवार यांच्यासाठी मोठे आव्हान मानले जात आहे. जोरगेवार यांच्यासाठी हा नवा राजकीय गतिरोधक ठरू शकतो. दरम्यान, राजुरा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवर देवराव भोंगळे यांनी, पाझारे उमेदवारी मागे घेतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. मात्र, पाझारे यांची सध्याची आक्रमक भूमिका पाहता ते उमेदवारी मागे घेण्याची शक्यता धूसर झाल्याचे दिसते आहे. तथापि, पाझारे भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांचा खूप आदर करतात आणि मुनगंटीवारांनी त्यांना पटवून दिल्यास कदाचित ते आपली भूमिका बदलतील, असेही बोलले जाते. आता ३ नोव्हेंबरपर्यंत पाझारे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आणखी वाचा-बुलढाणा जिल्ह्यातील सातही मतदारसंघात अपक्षांची ‘पेरणी’!

केवळ पाझारेच नाही तर भाजपमध्ये राजुरा मतदारसंघात सर्वात मोठी बंडखोरी झाली आहे. तिथे भाजप उमेदवार भोंगळे यांच्या विरोधात माजी आमदार ॲड. संजय धोटे व माजी आमदार सुदर्शन निमकर या दोघांनी शड्डू ठोकला आहे. ॲड. धोटे, निमकर व खुशाल बोंडे यांनी पत्र परिषद घेऊन भोंगळे यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविला होता. बोंडे हे मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांचे कट्टर समर्थक आहेत. त्यामुळे राजुरा येथील या बंडखोरीमागे कोण, हे सर्वश्रुत आहे. राजुरा भाजपतील बंड शमले नाही तर चंद्रपूरमध्येही बंड शमण्याची चिन्हे कमी आहे. भोंगळे मुनगंटीवार गटाचे उमेदवार आहेत, तर जोरगेवार यांचा भाजप प्रवेश व उमेदवारी अहीर यांच्यामुळेच मिळाल्याचे बोलले जाते.

आणखी वाचा-Rohit Patil: तासगावमध्ये चार ‘रोहित पाटील’ रिंगणात

चंद्रपूर व राजुरा येथील भाजपअंतर्गत सुरू असलेल्या घडामोडी एकमेकांशी संबंधित आहेत. आज आणि उद्या हे चित्र बदलणार का, पाझारे या सामान्य कार्यकर्त्याला भाजप न्याय देणार की त्यांची पक्षातून हकालपट्टी करणार, ॲड. धोटे, निमकर व बोंडे काय भूमिका घेणार, याकडे जिल्हावासीयांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrapur assembly constituency brijbhushan pazare warned about to commit suicide if he pressured to withdraw candidature print politics news mrj