चंद्रपूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर विधानसभा मतदारसंघासाठी राजकीय भेटीगाठींना जोर आल्याचे चित्र आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे कट्टर समर्थक व जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रिजभूषण पाझारे यांनी मुंबईत मुख्यमंत्रिपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली, तर अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

चंद्रपूर विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. अनुसूचित जातीचे नेते म्हणून पाझारे हे प्रदीर्घ काळापासून भाजपशी संलग्न आहेत. ते पालकमंत्री मुनगंटीवार यांचे कट्टर समर्थक मानले जातात. पाझारे यांनी जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती, सदस्य आणि पंचायत समिती सभापतीपदही भूषवले आहे.

पाझारे यांनी शनिवारी खासदार श्रीकांत शिंदे यांची मुंबईत भेट घेतली. त्यावेळी त्यांच्यासोबत भाजप नेते डॉ. मंगेश गुलवाडे होते. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा पारंपरिक मतदारसंघ असल्याचे पाझारे यांनी शिंदे यांना सांगितले. ही जागा महायुतीत भाजपला सोडावी, अन्य कुणालाही ही जागा देवू नये, अशी विनंती शिंदे यांच्याकडे केल्याचे त्यांनी सांगितले. या भेटीत त्यांनी चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीची मागणी केली, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

हेही वाचा – गडकरी म्हणतात, “चुकून राजकारणात आलो, नाहीतर नक्षलवादी चळवळीत जाऊन…”

चंद्रपूर मतादरसंघाचे विद्यमान आमदार किशोर जोरगेवार भाजपमध्ये प्रवेश करतील, अशीही चर्चा आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून या प्रवेशाला ‘ग्रीन सिग्नल’ही मिळाला आहे. मात्र, भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून याला विरोध होत आहे. यामुळे आमदार जोरगेवार इतर पक्षाकडून उमेदवारी मिळते का, याच्या शोधात आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे.

यासंदर्भात जोरगेवार यांना विचारले असता, भाजपच्या राज्य व केंद्रीय नेतृत्वाकडून विचारणा झाली आहे. मात्र, महायुतीने सर्वप्रथम जागावाटपाचा तिढा सोडवावा, त्यानंतरच आपण निर्णय घेऊ, असे त्यांनी स्पष्ट केले. शरद पवार यांची भेट घेतली नाही, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा – निवडणुकीच्या निमित्ताने मराठीचा भाग्योदय, विकास मंडळांचा कधी?

जोरगेवार यांच्या म्हणण्यानुसार ही भेट झालीच नाही. मात्र, राजकीय वर्तुळात या भेटीची चर्चा रंगली आहे. दुसरीकडे, पाझारे यांनीही या जागेसाठी प्रयत्न सुरू केल्यामुळे महायुतीत तिढा निर्माण होण्याची चिन्हे आहे.

Story img Loader