शेतकरी संघटनेचे अ‍ॅड. वामनराव चटप आठव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात

शेतकरी संघटनेचे नेते ॲड. वामनराव चटप राजुरा विधानसभेतून आठव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

adv Wamanrao Chatap
शेतकरी संघटनेचे अॅड. वामनराव चटप आठव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

चंद्रपूर : तीन विधानसभा निवडणुका जिंकण्याचा आणि लोकसभेच्या दोन व विधानसभेच्या दोन निवडणुकांत पराभूत होण्याचा अनुभव पाठिशी असलेले शेतकरी संघटनेचे नेते ॲड. वामनराव चटप राजुरा विधानसभेतून आठव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

शेतकरी प्रश्न, स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी तसेच विविध विषयांवर आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधणारे स्वतंत्र भारत पक्षाचे प्रमुख व शेतकरी संघटनेचे नेते चटप यांनी १९९० व १९९५ अशा सलग दोन विधानसभा निवडणुका जिंकल्या होत्या. १९९९ मध्ये त्यांचा पराभव झाला. २००४ मध्ये ते पुन्हा विजयी झाले. त्यानंतर चटप यांनी २००९ आणि २०१४ मध्ये लोकसभा निवडणूक लढवली. या दोन्ही निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान, चटप यांनी विधानसभा निवडणूक लढवणार नाही, अशी प्रतिज्ञा केली होती. त्यावेळी त्यांनी शेतकरी संघटनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना निवडणुकीत संधी दिली. मात्र, संघटनेचे उमेदवार जिंकू शकले नाही. परिणामी चटप यांनी प्रतिज्ञा विसरून २०१९ मध्ये पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. चटप ही निवडणुक जिंकतील, असेच काहीसे वातावरण होते. मात्र, मतमोजणीच्या शेवटच्या दोन फेऱ्यांमध्ये काँग्रेसचे सुभाष धोटे यांनी अडीच हजार मतांची आघाडी घेत अल्पमतांनी का होईना विजय खेचून आणला.आदिवासी नेते गोदरू पाटील जुमनाके यांना मिळालेली ४३ हजार इतकी प्रचंड मते ॲड. चटप यांच्या पराभवाला कारणीभूत ठरली होती.

हेही वाचा : Uttar Pradesh Politics : उत्तर प्रदेशमध्ये १० पैकी ९ जागांवरच पोटनिवडणूक का? मिल्कीपूरची पोटनिवडणूक का जाहीर झाली नाही?

चटप आता पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. काँग्रेसचे विद्यमान आमदार सुभाष धोटे नेहमीप्रमाणे त्यांचे प्रतिस्पर्धी राहणार आहेत. भाजपकडून येथे माजी आमदार ॲड. संजय धोटे, सुदर्शन निमकर व देवराव भोंगळे या तिघांनी उमेदवारी मागितली आहे. ॲड. चटप ही निवडणूक जिंकतात की पराभवाची मालिका कायम ठेवतात, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chandrapur at rajura assembly constituency adv wamanrao chatap contesting election for the 8th time print politics news css

First published on: 20-10-2024 at 13:32 IST
Show comments