चंद्रपूर : बहुजन समाज पक्ष, वंचित बहुजन आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या तीन पक्षांच्या उमेदवारांना विधानसभा निवडणुकीत फारच कमी मते मिळाली. वंचित उमेदवार मताधिक्यापासून ‘वंचित राहिल्याने, मनसेचे इंजिन न चालल्याने, तर बसपच्या ‘हत्ती’ची चालही मंदावल्याने यांपेक्षा अपक्ष उमेदवार तरी बरे, असा सूर आता उमटू लागला आहे.
मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाने २००४ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वच मतदारसंघांत उमेदवार दिले होते. या सर्व उमेदवारांनी लाखावर मते घेऊन काँग्रेसचे उमेदवार पाडण्यात त्यावेळी मोठी भूमिका बजावली होती. मात्र, त्यानंतर झालेल्या प्रत्येक लोकसभा व विधानसभा निवडणुकीत बसपच्या ‘हत्ती’ची चाल मंदावली. या विधानसभा निवडणुकीत तर बसपच्या जिल्ह्यातील एकाही उमेदवाराला पाच हजार मतांचा पल्ला गाठता आला नाही. अनेक उमेदवारांना दोन ते तीन हजार मते मिळाली.
हेही वाचा – बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेसच्या पराभवाने मुकुल वासनिक यांची दिल्ली दरबारी अडचण!
ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची अवस्थाही अशीच आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वंचितचे उमेदवार ॲड. राजेंद्र महाडोळे यांनी एक लाखापेक्षा अधिक मते घेतली होती. मात्र २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत वंचितचे उमेदवार राजेश बेले यांची चांगलीच दमछाक झाली. यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही वंचितचा एकही उमेदवार दहा हजार मतांपर्यंत पोहोचू शकला नाही. वंचितचे वरोरा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार अनिल धानोरकर यांना ९,१२३ मते, चिमूरचे अरविंद सांडेकर यांना ३,९५६ मते, ब्रह्मपुरीतील डॉ. राहुल मेश्राम यांना ४,००५ मते, तर बल्लारपूरमधील सतीश मालेकर यांना ५,०७५ मते मिळाली. हे पाहता वंचितला जिल्ह्यातील मतदारांनी नाकारल्याचे दिसून येते.
रिपाइंचे विविध गटाचे उमेदवारदेखील या निवडणुकीत रिंगणात होते. मात्र त्यांना मिळालेली मतेदेखील अतिशय कमी आहेत. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची अवस्था तर यापेक्षा वाईट झाली आहे. वरोरा मतदारसंघात अनिल सूर यांना केवळ दोन हजार, तर राजुरा मतदारसंघात सचिन भोयर यांना चार हजारांपेक्षा थोडे अधिक मते मिळाली. चंद्रपूर मतदारसंघात तर जिल्हाध्यक्षाने उमेदवारी जाहीर होऊनदेखील नामांकन दाखल केले नाही.
हेही वाचा – महायुतीच्या संयुक्त बैठकीची प्रतीक्षा; दिल्लीतील चर्चेबाबत अद्याप निर्णय नाही
विधानसभा निवडणुकीतील कामगिरी पाहता या लहान पक्षांचे अस्तित्व आता संपुष्टात आल्याचे चित्र आहे. या पक्षांपेक्षा अपक्ष उमेदवारांनी अधिक मते घेतली आहेत. वरोरामध्ये मुकेश जीवतोडे यांनी ४९ हजारांपेक्षा अधिक मते घेतली. ही जागा महाविकास आघाडीतील घटक पक्ष ठाकरे शिवसेनेला सोडण्यात आली असती तर निकाल काही वेगळा असता. मात्र काँग्रेसचे नेते भ्रमात होते. त्यामुळे येथे नुकसान झाले. याच मतदारसंघात मुस्लीम समाजाचे अहेतेशाम अली यांनी २० हजारांपेक्षा अधिक मते घेतली. राजुरा येथे गोंडवाना गणतंत्र पक्षाचे गजानन गोदरू पाटील जुमनाके यांनी २८ हजारांपेक्षा अधिक मते घेतली, तर चंद्रपूरमध्ये बिरजू पाझारे यांनी १५ हजारांपेक्षा अधिक मते घेतली. बल्लारपूरमधेही अपक्ष डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी २० हजारांपेक्षा अधिकचे मताधिक्य मिळवले. बल्लारपूरची काँग्रेसची उमेदवारी डॉ. गावतुरे यांना मिळाली असती तर निकालाचे चित्र काही वेगळे असते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.