चंद्रपूर : भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी उमेदवारीत ‘लाडक्या बहिणीं’ना डावलले, तर रिपब्लिकन पक्षाने दोन रणरागिनींना उमेदवारी दिली आहे. जिल्ह्यातील सहा मतदारसंघांत एकूण ९४ उमेदवारांमध्ये केवळ ८ महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. चिमूर व ब्रम्हपुरी या दोन मतदारसंघांत तर एकही महिला उमेदवार नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सर्वाधिक २० उमेदवार बल्लारपूर मतदारसंघात आहेत. येथे डॉ. अभिलाषा गावतुरे, छाया गावतुरे, सौ. निशा धोंगडे या तीन महिला उमेदवार आहेत. यातील डॉ. गावतुरे यांनी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली होती, मात्र काँग्रेसने नाकारली. राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार व खासदार प्रतिभा धानोरकर या दोघांनी गावतुरे यांच्या नावाला अगदी सुरुवातीपासूनच विरोध दर्शविला होता. त्यामुळे डॉ. गावतुरे यांचे नाव मागे पडले. विशेष म्हणजे, बल्लारपूर या एकाच मतदारसंघात गावतुरे या एकाच आडनावाच्या दोन महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

हेही वाचा – Rebellion in Maha Vikas Aghadi Gadchiroli: बंडखोरीमुळे तिन्ही जागांवर महाविकास आघाडीची कोंडी, तर अहेरीत महायुतीपुढे आव्हान?

हेही वाचा – Maha Vikas Aghadi in Raigad: रायगडमध्ये चार मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार समोरासमोर

राजुरा मतदारसंघात एकूण १४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या प्रिया बंडू खाडे, किरण गेडाम व चित्रलेखा धंदरे या तीन महिला उमेदवारांचा समावेश आहे. वरोरा मतदारसंघात १८ उमेदवारांमध्ये तारा काळे या एकमेव महिला उमेदवार आहेत. चंद्रपूर मतदारसंघात १६ उमेदवारांमध्ये नभा वाघमारे या एकमेव महिला उमेदवार रिपब्लिकन पक्षाकडून रिंगणात आहेत. ब्रम्हपुरी व चिमूर या दोन मतदारसंघांत प्रत्येकी १३ उमेदवार निवडणूक रिंगणात असून एकही महिला उमेदवार नाही. आज महिला मतदारांची संख्या निम्मी आहे. काही मतदारसंघांत तर महिलांची संख्या अधिक आहे. मात्र, तिथेही महिला उमेदवार नाहीत.

विनोद खोब्रागडे हे चंद्रपूर व वरोरा या दोन मतदारसंघांतून निवडणूक लढवित आहेत. दोन्ही मतदारसंघांत अपक्ष उमेदवार असलेले खोब्रागडे तलाठी होते. त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आल्यानंतर त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. विशेष म्हणजे, खोब्रागडे यांनी लोकसभा निवडणुकीतही उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, काही त्रुटींमुळे त्यांचा अर्ज रद्द करण्यात आला होता.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrapur district six constituencies eight women candidates no female candidate in chimur bramhapuri print politics news ssb