नागपूर : निवडणुकीच्या राजकारणात येऊन दहा वर्षे होत आली तरी चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार अजूनही कोणत्या एका पक्षात स्थिरावलेले नाहीत. राज्यात येणाऱ्या प्रत्येक सरकारला सर्वात आधी समर्थन देणारे असा नावलौकिक असलेले जोरगेवार आता बदललेले राजकीय वातावरण बघून महाविकास आघाडीच्या तंबूत दाखल होण्यासाठी धडपड करू लागले आहेत.

गेल्या विधानसभा निवडणुकीत अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या चंद्रपूर मतदारसंघातून विक्रमी मतांनी विजयी झालेल्या जोरगेवारांचा राजकीय श्रीगणेशा झाला तो भाजपमधून. दीर्घकाळ ते याच पक्षात पदाधिकारी म्हणून सक्रिय होते. राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे समर्थक अशीही त्यांची ओळख होती. २०१४ ला पक्षाने उमेदवारी द्यावी म्हणून त्यांनी भरपूर प्रयत्न केले पण नितीन गडकरींचे विश्वासू अशी ओळख असलेले तेव्हाचे आमदार नाना शामकुळेंनाच पुन्हा संधी मिळाली. त्यामुळे नाराज झालेल्या जोरगेवारांनी भाजपचा त्याग करत शिवसेनेची वाट धरली. तेव्हा हे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले. त्याचा फायदा घेत जोरगेवार रिंगणात उतरले पण त्यांचा पराभव झाला व शामकुळे विजयी झाले. नंतरच्या पाच वर्षांत ते शिवसेनेतसुद्धा फारसे सक्रिय नव्हते. याच काळात ते कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मिळवता येईल याची चाचपणी करत वेगवेगळी पक्षीय दारे ठोठावत राहिले.

हेही वाचा – दक्षिण नागपूर सोडण्यास काँग्रेस तयार नाही, तातडीची बैठक ऐनवेळी रद्द झाल्याने तर्कवितर्क

२०१९ मध्ये त्यांना काँग्रेसकडून उमेदवारी हवी होती. त्यासाठी त्यांनी सध्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याशी जवळीक साधली. एकीकडे काँग्रेसशी बोलणी सुरू असतानाच ते दुसरीकडे राष्ट्रवादीच्या संपर्कातसुद्धा होते. त्याची ही चलबिचल बघून काँग्रेसने सुरुवातीला सावध पवित्रा घेतला. मात्र वडेट्टीवारांनी आग्रह धरल्यामुळे त्यांना उमेदवारी व एबी फॉर्म देण्यात आला. नंतर जोरगेवारांच्या निष्ठेवर पक्षातील अनेकांनी संशय घेतल्याने अखेरच्या क्षणी त्यांची उमेदवारी बदलण्यात आली. एबी फॉर्म महेश मेंढे यांना देण्यात आला. यामुळे अपक्ष म्हणून रिंगणात राहण्याऐवजी दुसरा पर्याय त्यांच्यापुढे उरला नाही. त्यावेळी काँग्रेसने ऐनवेळी दगा दिला हा प्रचार तसेच शामकुळेंची निष्क्रियता त्यांच्या पथ्यावर पडली व ते मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. निवडून येताच त्यांनी तातडीने भाजपनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठिंब्याचे पत्र सोपवले. राज्यात फडणवीस व अजित पवारांच्या युतीच्या दीड दिवस चाललेल्या सरकारला पाठिंबा देणारे जोरगेवार विदर्भातील एकमेव अपक्ष आमदार होते. हे सरकार कोसळल्यावर महाविकास आघाडी स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. ही आघाडी आकार घेईपर्यंत जोरगेवार भाजपच्या सोबत होते. आघाडी स्थापन झाल्यावर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताच जोरगेवार पुन्हा पलटले व त्यांनी थेट मातोश्रीवर जात ठाकरेंना पाठिंबा जाहीर केला. नंतरची अडीच वर्षे म्हणजे सरकार असेपर्यंत ते अधिकृतपणे शिवसेनेसोबत होते पण दुसरीकडे राष्ट्रवादीतील संभाव्य फूट लक्षात घेऊन अजित पवारांच्यासुद्धा संपर्कात होते.

विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बंड केले. आमदार घेऊन ते गोवाहाटीला गेले. आता आघाडी सरकार कोसळणार हे लक्षात येताच ते शिंदे गटात दाखल झाले व पाठिंब्याच्या पत्रावर ४९ व्या क्रमांकावर स्वाक्षरी करून मोकळे झाले. नंतरची अडीच वर्षे ते शिंदे गटाचे म्हणून ओळखले गेले. या सरकारने समर्थन देणाऱ्या आमदारांना भरपूर विकासनिधी दिला. त्याचा फायदा जोरगेवारांना झाला. आता ते शिवसेना (शिंदे) कडून निवडणूक लढवतील असा अंदाज असताना अचानक त्यांनी भाजपकडे उमेदवारीची मागणी केली. विदर्भात शिंदेंच्या सेनेचा अजिबात प्रभाव नाही. त्यामुळे निवडून जायचे असेल तर भाजप बरी असा विचार त्यांनी केला असावा. त्यांना पक्षात घेण्यावरून बरेच वाद उद्भवल्यावर आता जोरगेवारांनी महाविकास आघाडीकडे मोर्चा वळवला आहे. सर्वात आधी त्यांनी काँग्रेसची दारे ठोठावली पण आघाडी सरकारच्या काळात पक्षाला साथ न दिल्याचा राग असल्याने नेत्यांनी त्यांना दाद दिली नाही. उमेदवारी मिळणे कठीण आहे हे लक्षात येताच त्यांनी पुन्हा शरद पवारांना गाठले व तुतारी फुंकण्याची इच्छा दर्शवली. आता पवारांच्या राष्ट्रवादीकडून जोरगेवारांचे नाव चर्चेदरम्यान पुढे येताच काँग्रेससमोर पेच निर्माण झाला आहे. या पक्षाचे बहुतांश नेते त्यांना आघाडीची उमेदवारी देण्यास विरोध करत आहेत. जोरगेवार सतत चक्राकार गतीने सर्व पक्षाचे उंबरठे झिजवत असतात, ते अतिमहत्त्वाकांक्षी आहेत, निवडून आले तर पक्षातच राहतील याचा काही भरवसा नाही असे या नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता जोरगेवार नेमके काय करतात? अपक्ष राहतात की तुतारी फुंकतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा – आमदार गीता जैन यांना रोखण्यासाठी भाजपचा संकल्प

मी तुतारी वाजवणार

यासंदर्भात जोरगेवारांशी संपर्क साधला असता शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारी मागितली आहे. तसे पत्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना दिले आहे.