चंद्रपूर : भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने चंद्रपूर-आर्णी-वणी लोकसभा मतदारसंघातून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना तिकीट दिल्यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर सध्या नाराज आहेत. लोकसभा निवडणुकीत अहीर व त्यांचे समर्थक काय भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
अहीर यांनी सलग चार वेळा या लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे, माजी खासदार नरेश पुगलिया, माजी मंत्री संजय देवतळे व शेतकरी संघटनेचे नेते ॲड. वामनराव चटप या दिग्गजांना त्यांनी लोकसभा निवडणुकीत पराभूत केले. पायाला भिंगरी लावून मतदारसंघात सतत फिरणाऱ्या अहीर यांचा जनसंपर्क दांडगा आहे. ते भाजपच्या ओबीसी सेलचे प्रमुख पदाधिकारी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता व स्वत:चा जनसंपर्क या बळावर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचा पराभव करू, असा विश्वास अहीर यांना होता. मात्र, जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर भाजपची सत्ता असतानाही त्यांचा ४४ हजारांपेक्षा अधिक मतांनी पराभव झाला. राज्यभरात सर्वत्र भाजपचे खासदार निवडून आले, केवळ चंद्रपुरात काँग्रेसचा उमेदवार निवडून आल्याने हा पराभव अहीर यांच्या जिव्हारी लागला. त्यातच सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानसभा मतदारसंघात पिछाडीवर राहिल्याने त्याचे वेगळे अर्थ काढण्यात आले होते.
हेही वाचा – अनंतराव थोपटेंचा ‘हात’ सर्वांनाच का हवाहवासा?
या पराभवानंतर अहीर यांनी मतदारसंघात जनसंपर्क मोहीम अधिक तीव्र केली. याचदरम्यान त्यांना मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्षपद मिळाले. त्याचाही फायदा घेत अहीर यांनी मतदारसंघ पिंजून काढला. मात्र, केद्रीय नेतृत्वाने त्यांच्याऐवजी मुनगंटीवार यांच्यावर विश्वास दाखविला. मुनगंटीवार यांना लोकसभेच्या रिंगणात उतरविले. त्यामुळे अहीर व समर्थक काहीसे नाराज आहेत. लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मुनगंटीवार यांचे चंद्रपूर नगरीत भव्य स्वागत झाले. स्थानिक गांधी चौकात आशीर्वाद सभा झाली. या सभेला वणी, आर्णीचे आमदार तसेच भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. अपवाद फक्त अहीर यांचा होता. दिल्लीत असल्यामुळे अहीर या सभेला उपस्थित राहू शकले नाही, असे त्यांचे समर्थक सांगतात. मात्र, नाराजीमुळेच ते अनुपस्थित राहिले, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
हेही वाचा – मोहिते-पाटलांच्या घराण्यात उमेदवारी नाकारण्याचा ५२ वर्षांतील दुसरा प्रसंग
दुसरीकडे, मुनगंटीवार यांना विजय संपादन करायचा असेल तर अहीर यांना सोबत घ्यावे लागणार आहे. प्रचारात त्यांना समोर करावे लागणार आहे. मी नाराज नाही, पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करणार, असे अहीर सांगत असले तरी ते प्रचारात सहभागी होतात की, त्यांच्यावर अन्य कुठली जबाबदारी सोपवली जाते, याकडे राजकीय वर्तुळ तथा महाविकास आघाडीचे नेते लक्ष ठेवून आहेत.