दयानंद लिपारे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापूर : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा प्रतिसाद खोडून काढत भाजपचा संघटनात्मक प्रभाव वाढवण्यावर प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांचा पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यात भर राहिला. सातारा जिल्ह्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केल्यामुळे भाजपला ताकद मिळाली. याचवेळी जिल्हा पातळीवरील भाजपा अंतर्गत मतभेद निस्तरण्याचे आव्हानही बावनकुळे यांच्यासमोर असणार आहे.

यापूर्वी कोल्हापूरचे चंद्रकांत पाटील यांच्याकडे भाजप प्रदेशाध्यक्षपद होते. त्याची सूत्रे आता बावनकुळे यांच्याकडे आल्यानंतर ते पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर प्रथमच आले. काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये घाऊक प्रवेश घडवून आणून त्यांनी भाजपची संघटनात्मक ठासीव बांधणी करण्याच्या दृष्टीने पावले टाकली. सभा, बैठका, मेळावा, पत्रकार परिषद येथे विरोधकांना धक्का देण्याची रणनीती वारंवार बोलून दाखवली. सत्तांतराचा फायदा घेऊन राज्यात भाजप व बाळासाहेबांची शिवसेना या दोन्हीचा प्रभाव वाढवण्याचे नियोजन सुरू असल्याचे दाखवून देताना महाविकास आघाडीत दुही कशी निर्माण होत आहे हे सांगण्यावर बावनकुळे यांचा भर राहिला.

हेही वाचा : विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुण्यात आघाडीत बिघाडी

काँग्रेसला दे धक्का
काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू असताना काँग्रेस कार्यकर्ते मात्र काँग्रेस छोडोच्या भूमिकेत कसे आहेत हे बावनकुळे यांच्या सातारा दौऱ्यात दिसले. तेथे काँग्रेसच्या १२०० कार्यकर्त्यांनी बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये केलेला प्रवेश काँग्रेससाठी दे धक्का होता. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनोभूमिकेचे विश्लेषण बावनकुळे यांनीच केले. राहुल गांधी यांची यात्रा नेत्यांच्या मुलांनी हायजॅक केली आहे. सामान्य कार्यकर्त्याला पक्ष कार्य करण्यासाठी संधी नाही. या अस्वस्थतेमुळे ते काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असतानाही मंत्रालयात जात नव्हते तर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १८ तास काम करून कामांचा धडाका लावत आहेत, असा उल्लेख करताना बावनकुळे यांना वारंवार देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचा जप करावा लागत होता.

भाजपने आगामी निवडणुकांमध्ये सत्तेचे सोपान गाठण्याचा इरादा आतापासून व्यक्त करायला सुरुवात केली आहे. लोकसभेच्या ४५ पेक्षा अधिक तर विधानसभेच्या २०० हून अधिक जागा जिंकण्याचा इरादा व्यक्त करीत बावनकुळे यांनी विरोधकांना केवळ आव्हानच दिले नाही तर त्यांच्याकडे सक्षम उमेदवार शोधणे हीच समस्या होऊन बसेल इतक्या मोठ्या प्रमाणात भाजप प्रवेशाचे मोठमोठे बॉम्बस्फोट होत राहतील, असा इशारा दिला. बालेकिल्ल्यात येऊन बावनकुळे यांनी दिलेले हे आव्हान उभय काँग्रेस कसे पेलणार हा प्रश्न आहे.

हेही वाचा : भाजपच्या पत्रकार परिषदेत प्रश्न न आवडे नेत्यांना!; चित्रा वाघ व पत्रकारांच्या वादानंतर पक्षातच संमिश्र प्रतिक्रिया

जादूटोणा ते जाळे
नेत्यांची वादग्रस्त विधाने हा अलीकडे नेहमीचा भाग बनू लागला आहे. बावनकुळे त्याला अपवाद राहिले नाहीत. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे व राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांच्यातील संबंध भाजपच्या डोळ्यावर येणारे असल्याने त्यांच्यात अंतर पडावे असे या पक्षाच्या नेत्यांची विधाने दर्शवत आहेत. सातारा येथे शिवसेनाप्रमुखांचे विचार बदलून उद्धव ठाकरे हे शरद पवार यांच्यासोबत बसत असतील; तर हा पवार यांचा जादूटोणा आहे, असे विधान केल्यावर बावनकुळे यांच्यावर राष्ट्रवादीकडून जोरदार टीका झाली. मात्र आपले हे विधान उपरोधिक होते असे स्पष्ट करताना बावनकुळे यांनी शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांना हायजॅक केले आहेत. ते पवारांच्या जाळ्यात पूर्णपणे अडकले आहेत, असे वक्तव्य करत पुन्हा नव्या वादाला निमंत्रण दिले. बावनकुळे यांची शाब्दिक कसरत, टीका सुरू असताना पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांच्या निशब्द, थंड प्रतिक्रिया आश्चर्यकारक ठरली.

हेही वाचा : विश्लेषण : शिवाजी महाराजांच्या तलवारीचा इतिहास काय? ती इंग्लंडच्या राजाला कोणी आणि का दिली? वाचा…

भाजपची असंबद्ध मांडणी
मुळात राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा हा केवळ काँग्रेस पक्षाचा उपक्रम नाही. देशातील संविधान, विद्वेषाचे राजकारण, धार्मिक उन्माद याच्या विरोधातील तो संघटित आवाज आहे. त्यामुळे कोणी फुटकळ कार्यकर्त्यांनी भाजप प्रवेश केला. त्यावरून काँग्रेस छोडो अभियान सुरू झाले हा भाजपचा युक्तिवाद शुद्ध फसवणूक करणारा आहे. राहुल गांधी यांच्या यात्रेला मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहून भाजपाकडून ही असंबद्ध मांडणी केली जात आहे, असे प्रदेश काँग्रेसचे सचिव गुलाबराव घोरपडे यांचे म्हणणे आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrasekhar bawankule attempt to increase bjp organizational influence west maharashtra satara kolhapur tour bharat jodo yatra rahul gandhi print politics news tmb 01
Show comments