चंद्रपूर : वैचारिक मतभेद असलेल्या रिपाइं नेत्याच्या घरी जाऊन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्या ‘घर चलो अभियाना’ची सुरुवात चंद्रपुरातून केली. याउलट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘लोकसंवाद यात्रे’च्या निमित्ताने स्वपक्षीय ज्येष्ठ नेत्यांशी संवाद साधण्याचे कौशल्य दाखवले नाही. एकूणच यातून भाजपच्या ‘संवादा’चे तर काँग्रेसमधील ‘विसंवादा’चे दर्शन झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या पंधरवड्यात भाजप व काँग्रेस पक्षाचे दोन मोठे कार्यक्रम झाले. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडताना भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी ‘घर चलो अभियाना’ची सुरुवात शहरातून केली, तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी काँग्रेसच्या ‘लोकसंवाद यात्रे’ला हजेरी लावली. बावनकुळे यांनी अभियानादरम्यान जास्तीत जास्त लोक भाजपशी जुळावे, हा दृष्टिकोन समोर ठेवून स्वपक्षीय नेत्यांच्या घरी भेट देतानाच कायम वैचारिक मतभेद असलेल्या नेत्यांच्या घरीही भेट दिली. त्यांनी रिपाइंचे ज्येष्ठ नेते व्ही.डी. मेश्राम, ओबीसी समाजाचे नेते ॲड. पुरुषोत्तम सातपुते यांच्याशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षांत राबवलेल्या विविध योजनांची माहिती देत कुठे काही चुकते काय, हेदेखील जाणून घेतले. स्वपक्षीय नेत्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत स्थानिक पातळीवर सर्वपक्षीय नेत्यांच्या मतांचा आदर करण्याचा संदेश त्यांनी यातून दिला. केवळ हिंदूच नाही तर मुस्लीम, शीख व ख्रिश्चन धर्मीयांच्या घरी, दुकानात भेट दिली.

हेही वाचा – कुटुंबाला मोबदला मिळतो म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ; कर्नाटकमधील मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य

याउलट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी स्वपक्षीय नेत्यांशी संवाद साधणे तर दूरच, ज्येष्ठ नेत्यांच्या घरी भेट देण्याची तसदी घेतली नाही. जिल्ह्यात काँग्रेस पक्ष विविध गटांत विखुरलेला आहे. माजी खासदार नरेश पुगलिया यांचे आजही जिल्ह्याच्या राजकारणात वजन आहे. मात्र, पटोले यांनी दोन दिवसांच्या मुक्कामात पुगलिया यांची भेट घेऊन संवाद साधण्याचे कौशल्य दाखवले नाही. पुगलियाच नाही तर पटोले यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या गटाच्या नेत्यांनाही सोबत घेतले नाही. त्यामुळे वडेट्टीवार गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यात्रेत सहभागी झाले असले तरी प्रदेशाध्यक्षांच्या विसंवादी भूमिकेमुळे दूरच होते. काँग्रेसपासून दुरावलेल्यांच्या आणि स्वातंत्र्य संग्राम सैनिक यांच्या घरी भेट देण्याची शिष्टाईदेखील पटोले यांनी दाखवली नाही. केवळ वरोरा व चंद्रपूर शहरातच त्यांनी लोकसंवाद यात्रा काढली. स्वपक्षीय नेत्यांच्या घरी ‘बिर्याणी’वर ताव मारण्यापेक्षा त्यांनी वैचारिक मतभेद असलेल्या अन्यपक्षीय नेत्यांच्या घरी भेट देऊन काँग्रेस नेते राहुल गांधी, विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीचा विचार पोहोचवला असता तर ही यात्रा अधिक यशस्वी ठरली असती, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे.

हेही वाचा – विशेष अधिवेशनाचा अजेंडा काय? सोनिया गांधींचे थेट मोदींना पत्र; केंद्र सरकारचेही उत्तर; म्हणाले, “सर्व परंपरा…”

एकूणच भाजपने ‘घर चलो अभियाना’च्या माध्यमातून सर्वसामान्यांना पक्षाशी जोडण्याचा प्रयत्न केला तर काँग्रेस स्वपक्षीय नेत्यांनाही जोडू शकली नाही, असेच काहीसे चित्र विदर्भातील या दोन प्रदेशाध्यक्षांच्या कार्यप्रणालीतून दिसून आले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrasekhar bawankule started bjp ghar chalo abhiyaan from chandrapur meeting rpi leader while nana patole did not communicate with his party leaders print politics news ssb