नागपूर : २०१४ ते २०१९ अशी पाच वर्ष नागपूरचे पालकमंत्री असलेले भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अचानक पक्षाने तिकीट कापले. तेव्हा बावनकुळे यांचे राजकारण संपले असाच अर्थ राजकीय वर्तुळातून काढण्यात आला होता. पण त्यानंतर दोनच वर्षाने त्यांच्या राजकीय जीवनाला कलाटणी देणाऱ्या घटना एकापाठोपाठ एक घडत गेल्या. त्यातून त्यांचे पक्षातील स्थानही अधिक बळकट होत गेले.
सध्या बानकुळे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. राज्य मंत्रिमंडळात त्यांच्याकडे महसूल सारखे महत्वाचे खाते आहे आणि शनिवारी पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली. त्यात त्यांना नागपूर व अमरावती या विदर्भातील दोन महसूल मुख्यालय असलेल्या जिल्ह्यांचे पालकमंत्री नियुक्त करण्यात आले. नागपूर आणि अमरावती हे दोन्ही जिल्हा विदर्भातील राजकारण आणि समाजकारणासाठी महत्वपूर्ण मानले जातात हे येथे उल्लेखनीय.
हेही वाचा >>>अमरावतीत पालकमंत्र्यांसमोर महायुतीतील घटकांना सांभाळण्याचे आव्हान
राजकीय प्रवास
जिल्हा परिषदेचे सदस्य ते आमदार आणि २०१४ मध्ये मंत्री असा बावनकुळे यांचा राजकीय प्रवास २०१९ पर्यंत होता. पालकमंत्री म्हणून पाच वर्ष केलेली कामगिरी चमकदार असताना त्यांना २०१९ मध्ये विधानसभेचे तिकीट नाकारण्यात आले. त्यावेळी त्यांच्यासह पक्षातील अनेकाना धक्का बसला होता. बावनकुळेंचे राजकारणातील ‘गॉडफादर’ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रयत्न केल्यानंतरही केंद्रीय नेतृत्वाचा बावनकुळेंवरील राग कमी झाला नव्हता. त्यामुळेत्यांची राजकीय कारकीर्दच संपुष्टात येईल, अशीच चर्चा त्यावेळी होती. पण त्याही स्थितीत बावनकुळे यांनी अत्यंत संयमाने पक्षातूनच निर्माण करण्यात आलेल्या संकटाला तोंड देत वाटचाल सुरूच ठेवली. त्यामुळे दोनच वर्षानं म्हणजे २०२२ मध्ये त्यांना पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या माध्यमातून विधानपरिषदेचे सदस्य केले. महाविकास आघाडीची राज्यात सत्ता होती, काँग्रेसने संघ परिवारातील छोटू भोयर यांना फोडून उमेदवारी दिली. पण बावनकुळे यांनी सर्व बळपणाला लावून ही निवडणूक जिंकली. हा त्यांच्या राजकीय कारकीर्दीतील निर्णायक क्षण ठरला.
हेही वाचा >>>नव्या पालकमंत्र्यास समतुल्य सहकारी सांभाळण्याचेच आव्हान
नेतृत्वाचा विश्वास जिंकण्यात यश
कालांतराने म्हणजेऑगस्ट २०२२ मध्ये त्यांची प्रदेश भाजपच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यांच्या कारकीर्दीत झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, विधानसभा पोटनिवडणुका किंवा लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पक्षाला विशेष यश मिळाले नाही, मात्र प्रदेशाध्यक्ष म्हणून बावनकुळे यांनी संपूर्ण राज्य पिंजून काढले. विशेष म्हणजे या दरम्यान त्यांनी राज्यातील प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रातील नेतृत्वाचा विश्वास संपादन केला. त्यामुळे त्यांना विधान परिषदेचे सदस्य असतानाही विधानसभेची उमेदवारी मिळाली. त्यांना महसूल सारखे महत्वाचे खाते देण्यात आले, त्यानंतर अमरावती व नागपूर या दोन महत्वाच्या शहराचे पालकमंत्रीपद देण्यात आले. पक्षाचे प्रदेश भाजपचे अध्यक्षपद अजूनही त्यांच्याडे कायम आहे. त्यामुळे मागील पाच वर्षात बावनकुळे यांचे पक्षातील स्थान बळकट झाले. गडकरी केंद्रात, फडणवीस राज्यात हे भाजपचे महाराष्ट्रातील राजकारणाचे सध्याचे चित्र आहे. विदर्भात बावनकुळे असे तिसरे शक्तीस्थान यानिमित्ताने पुढे येत आहे.