राष्ट्रीय राजकारणामध्ये दलितांचा आवाज म्हणून बहुजन समाज पक्षाकडे पाहिले जायचे. एकेकाळी उत्तर प्रदेशमध्ये सत्ता उपभोगलेला हा पक्ष आता मात्र आपला राष्ट्रीय पक्षाची मान्यता गमावून बसण्याच्या उंबरठ्यावर आला आहे. त्यामुळे राष्ट्रीय राजकारणात सध्या दलितांचे प्रतिनिधित्व करणारा विश्वासू चेहरा म्हणून कुणाकडे पहावे, अशी परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर आझाद समाज पार्टीचे (कांशीराम) नेते चंद्रशेखर आझाद यांच्याकडे आशेने पाहिले जात आहे. चंद्रशेखर आझाद यांनी उत्तर प्रदेशमधील नगीना लोकसभा मतदारसंघातून विजय प्राप्त करून संसदेत प्रवेश केला आहे. संसदेमध्ये आपण सत्ताधारी अथवा विरोधक कुणालाही पाठिंबा देणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. “नेहमी कुणाच्या तरी मागे जाणारी मेंढरं आम्ही नाही. आम्ही आमच्या लाखो लोकांची आशा आहोत”, असे चंद्रशेखर आझाद यांनी द इंडियन एक्स्प्रेसच्या ‘आयडिया एक्स्चेंज’ कार्यक्रमात बोलताना शुक्रवारी (५ जुलै) म्हटले. चंद्रशेखर आझाद म्हणाले की, “जेव्हा मी पहिल्यांदा संसदेमध्ये गेलो, तेव्हा मी रिकाम्या बाकांवर एकटाच बसलो. मी नवीन होतो, मला काहीच माहीत नव्हते. मला असे वाटले की, विरोधकांमधील माझे काही मित्र मला त्यांच्याबरोबर बसण्यासाठी बोलावतील. ‘आपण सगळे भाजपाविरोधात लढा देत आहोत, तर आपण एकत्र काम केले पाहिजे’, असे ते म्हणतील असे मला वाटले. मात्र, तीन दिवस रिकाम्या बाकांवर बसल्यानंतर मला जाणीव झाली की, चंद्रशेखर आझाद तिथे बसला आहे, याबाबत कुणालाही काहीही पडलेले नाही.”
हेही वाचा : सुसंवादाचा अभाव, अंतर्गत वाद! उत्तराखंडमधील सलग तिसऱ्या पराभवाचे काँग्रेसने केले विश्लेषण
पुढे ते म्हणाले की, “जेव्हा अध्यक्षपदाची निवडणूक जवळ आली, तेव्हा काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने मला बोलावले आणि मदतीची विचारणा केली. मी त्यांना म्हटले की, ठीक आहे. मात्र, प्रत्यक्षात त्यांनी मतविभाजनासाठी दबाव आणला नाही. हे घडलेच नाही, त्यामुळे हा मुद्दा तिथेच संपला. तो नेता त्याच्या मार्गाने गेला आणि मी माझ्या. त्यानंतर मी ठरवले की मी ना उजव्या बाजूला बसेन, ना डाव्या बाजूला! मी बहुजन आहे आणि मी माझ्या मुद्द्यांसह एकटा उभा राहीन. त्यामुळेच मी विरोधकांबरोबर सभात्याग केला नाही. नेहमी कुणाच्या तरी मागे जाणारी मेंढरं आम्ही नाही. आम्ही आमच्या लाखो लोकांसाठीची आशा आहोत. भलेही आम्ही लहान राजकीय कार्यकर्ते असू; मात्र, आम्ही आमच्या समाजाचे नेते आहोत. जर आम्हीच इतरांच्या मागे विचार न करता जाऊ लागलो तर त्यामुळे आमच्या लोकांच्या स्वाभिमानाला धक्का लागेल.” २०२४ च्या या लोकसभा निवडणुकीमध्ये चंद्रशेखर आझाद यांचा नगीना मतदारसंघातून १.५१ लाख मतांनी विजय झाला आहे. याबाबत बोलताना आझाद म्हणाले की, काँग्रेस आणि समाजवादी पार्टीबरोबर युती करण्याची इच्छा होती; मात्र दोन्हीही पक्षांनी नगीना मतदारसंघ त्यांना देण्यास नकार दिला.
“वंचितांचा स्वतंत्र आवाज असावा अशी त्यांची इच्छा नाही, असे मला वाटते. त्यांना असे वाटते की, प्रत्येकाने त्यांच्याबरोबर उभे रहावे आणि त्यांच्या हाताखाली काम करावे; जेणेकरून ते त्याला वापरू शकतील आणि त्याची स्वत:ची प्रगती रोखली जाईल. त्यांनी मला दुसऱ्या एखाद्या मतदारसंघातून अथवा त्यांच्या पक्षचिन्हावर निवडणूक लढवण्याची विचारणा केली. मी त्यांना म्हटले की, मी माझा मतदारसंघही सोडणार नाही आणि इतर कोणत्याही चिन्हावर निवडणूकही लढवणार नाही” असेही आझाद म्हणाले. “तेव्हा माझ्या मनात असा विचार आला की, मला किती मते मिळतील हा भाग वेगळा; मात्र जर ही निवडणूक मी माझ्या पूर्ण शक्तिनीशी लढली नाही तर मी लढण्यासाठी पात्रच नव्हतो, असा त्याचा अर्थ घेतला जाईल. टाइम मॅगझीनने माझी देशातील १०० उदयोन्मुख नेत्यांच्या यादीत गणना केली होती, तेव्हा मला स्वत:ला सिद्ध करावेच लागणार होते. भाजपाने मला पंतप्रधान पदाचा प्रस्ताव जरी दिला असता, तरी मी त्यांच्याबरोबर गेलो नसतो. मला माहिती आहे की, ते फक्त पद देतात, अधिकार नाही. जर तुमच्याकडे अधिकार नसतील, तर तुम्ही लोकांसाठी काहीही करू शकत नाही”, असेही आझाद म्हणाले.
हेही वाचा : राहुल गांधींच्या मणिपूर दौर्यामागचा नेमका उद्देश काय? या दौर्यामुळे भाजपावर दबाव वाढणार का?
ते म्हणाले की, विरोधकांची राज्यघटनेबाबतची सध्याची भूमिका आणि राजकारण आणि प्रशासनामधील समानुपाती प्रतिनिधित्वाची संकल्पना या दोन्हीही बसपाचे संस्थापक कांशीराम यांच्या घोषणा आहेत. “आम्ही आधीपासूनच हे मुद्दे घेऊन उभे आहोत. मात्र, कांशीराम आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे ध्येय अद्याप अपूर्णच राहिले आहे. एक चांगला शिष्य म्हणून चंद्रशेखर आझाद आणि त्यांच्या सहकाऱ्यांची ही जबाबदारी आहे की, त्यांनी हे उद्दिष्ट्य पूर्णत्वास न्यायला हवे. हे काम तेव्हाच पूर्ण होईल, जेव्हा राज्यघटनेचा पूर्णपणे अवलंब होईल आणि सामाजिक आणि आर्थिक विषमता नष्ट होईल.” आझाद म्हणाले की, २०१४ पासूनच दलितांना अशी भीती वाटत आहे की, राज्यघटना बदलली जाईल. “भाजपा आणि त्यांची मातृसंघटना आरएसएसची ही जुनी योजना आहे. आज ते काहीही म्हणोत, पण ते कधीच राज्यघटनेच्या समर्थनात नव्हते. २०१४ ते २०२४ हा त्यांच्यासाठी सुगीचा काळ आहे. त्यामुळे जर अयोध्येत भाजपाचा पराभव होत असेल आणि पंतप्रधान इतक्या कमी मताधिक्याने जिंकत असतील तर आता उत्तर प्रदेशच्या राजकारणामध्ये धार्मिक राजकारण करून जिंकणे तितकेही सोपे असणार नाही, हेच दिसून येत आहे.” पुढे चंद्रशेखर आझाद यांनी उत्तर प्रदेशमधील हाथरसमध्ये घडलेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेवरूनही योगी आदित्यनाथ सरकारला लक्ष्य केले.