मुंबई : विधानसभा निवडणुकीत राज्यात व मुंबईत भाजपने दणदणीत विजय मिळविल्याने चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रदेशाध्यक्षपदी आणि अॅड. आशिष शेलार यांना मुंबई अध्यक्षपदी कायम ठेवले जाण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्य मंत्रिमंडळात कोणाचा समावेश होणार, याविषयी भाजपमध्ये विविध नावांवर चर्चा सुरू आहे. पण मंत्रिमंडळात भाजपच्या जास्तीत जास्त १२-१३ नेत्यांचा समावेश होण्याची शक्यता असून काही जागा रिक्त ठेवल्या जातील. त्यामुळे मंत्रिमंडळात जातीय समीकरण आणि विभागनिहाय प्रतिनिधित्व देताना मोजक्याच नेत्यांना संधी मिळणार असून, इच्छुक नेत्यांना वरिष्ठांकडून पुन्हा पक्षासाठी त्याग करण्याचा सल्ला दिला जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>>Ajit Pawar : एकनाथ शिंदेंची ‘बार्गेनिंग पॉवर’ अजित पवारांनी कशी संपवली? शरद पवारांच्या पावलावर पाऊल कसं ठेवलं?

बावनकुळे व शेलार यांच्या अध्यक्षपदाची मुदत ऑगस्ट २०२५ पर्यंत असल्याने सध्या तरी त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल होण्याची शक्यता कमी असल्याचे सूत्रांनी सांगितले. पुढील वर्षी मुंबई महापालिकेसह राज्यातील सर्वच महापालिका, नगरपालिका आणि बहुतांश ग्रामपंचायतींच्या निवडणुका होतील. भाजपच्या दृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही मोठे यश मिळविणे महत्त्वाचे असणार आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष व मुंबई अध्यक्षपदी नवीन नेत्याची नियुक्ती शक्यतो करू नये, असा पक्षाचा विचार आहे.

भाजपला जातीय समीकरणाचाही विचार करावा लागणार आहे. मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण समाजाचे असतील, तर प्रदेशाध्यक्षपद बावनकुळे या ओबीसी आणि मुंबई अध्यक्षपद शेलार या मराठा समाजातील नेत्याकडे असल्यास जातीय समीकरणही साधले जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrashekhar bawankule ashish shelar continue to hold the responsibility of mumbai president bjp print politics news amy