नागपूर : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत अनियमितता झाल्याचा गंभीर आरोप करताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी उदाहरणादाखल राज्यातील कामठी मतदारसंघाचा उल्लेख केला. त्यामुळे हा मतदारसंघ आणि त्याचे प्रतिनिधीत्व करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष तसेच विद्यमान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे एकदम चर्चेत आले आहेत.
नागपूर जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघापैकी एक ऐवढीच साधी ओळख कामठी मतदारसंघाची होती. २००४ ते २०१४ या दरम्यान सलग तीन निवडणुका भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथून जिंकल्या. त्यामुळे तो त्यांचा बालेकिल्ला मानला जात होता. खऱ्या अर्थाने या मतदारसंघाची संपूर्ण राज्यात म्हणा किंवा देशात चर्चा झाली ती २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी . कारण बावनकुळे मंत्री असून आणि त्यांची निवडणून येण्याची खात्री असताना पक्षाने त्यांना ऐनवेळी तिकीट नाकारल होते.
भाजपमध्ये गडकरी समर्थक म्हणून ओळख असलेल्या बावनकुळे यांच्यासाठी तो मोठा धक्का होता.ज्या पद्धतीने बावनकुळे यांना ऐनवेळी तिकीट नाकारण्यात आले त्याच प्रमाणे २०२४ मध्ये धक्कादायक पद्धतीनेच त्यांना याच मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे पुन्हा हा मतदारसंघ चर्चेत आला. विद्यमान आमदार टेकचंद सावरकर यांना डावलून बावनकुळे यांना उमेदवारी देण्यात आली. विशेष म्हणजे बावनकुळे विधान परिषदेचे सदस्य असताना त्यांना विधानसभेची उमेदवारी देण्यात आली. आता तिसऱ्यांदा कामठीची चर्चा होते आहे ती तेथील मतदारसंघ्येत वाढ झाल्याने आणि विशेषत: खुद्द राहुल गांधी यांनी उल्लेख केल्यामुळे.
कामठी हा रामटेक लोकसभा मतदारसंघात येतो. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत येथून काँग्रेस आघाडीवर होती. विधानसभा निवडणुतीत भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे विरुद्ध काँग्रेसचे सुरेश भोयर यांच्यात लढत झाली. भोयर हे मागील पाच वर्षापासून या भागात काम करीत होते तर बावनकुळे यांचा मतदारसंघातील संपर्क कमी झाला होता. शिवाय लोकसभा निवडणुकीचे निकालही महायुतीच्या विरोधात गेलेले होते. त्यामुळे ही लढत अटीतटीची होणार अशी अपेक्षा होती पण बावनकुळे यांनी सहज विजय मिळवला.
कामठी विधानसभा मतदारसंघाबाबत राहुल काय म्हणाले ?
कामठी विधानसभा जागेचा संदर्भ देत राहुल गांधी म्हणाले की, लोकसभेत काँग्रेसला १.३६ लाख आणि विधानसभेत १.३४ लाख मते मिळाली, पण भाजपची मते १.१९ लाखांवरून १.७५ लाख झाली. लोकसभा निवडणुका झाल्यानंतर विधानसभा निवडणुकापर्यंत ३५ हजार मतदार वाढले. विशेष म्हणजे भाजप उमेदवारांचे मताधिक्यही तेवढेच आहे.म्हणजे नवीन मतदारांनी भाजपला मतदान केले, असा याचा अर्थ होतो याकडे राहुल गांधी यांनी लक्ष वेधले होते. न्ही निवडणुकांमध्ये मतदार यादीचा तपशील हवा आहे. मतदारांची नावे मोठ्या प्रमाणावर हटवण्यात आली असून, त्यापैकी बहुतांश दलित आहेत. निवडणूक आयोग प्रश्नांची उत्तरे देत नाही. निवडणुकीतील पारदर्शकतेची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे.
बावनकुळेचे राहुल गांधींना आव्हान
राहुल गांधी यांनी कामठी विधानसभा मतदारसंघातून माझ्या विरोधात निवडणूक लढवावी व विजयी होऊन दाखवावे. मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढण्यास तयार आहे. त्यांनी आत्ताच २०२९ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कामठीतून लढण्याची घोषणा करावी,