भारताची चांद्रयान-३ ही मोहीम यशस्वी झाली आहे. या मोहिमेंतर्गत चांद्रयानातील विक्रम हे लँडर चंद्रपृष्ठावर यशस्वीरित्या उतरले आहे. या कामगिरीनंतर भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाणारा पहिला देश ठरला आहे. या कामगिरीमुळे भारताला जगभरातून शुभेच्छा देण्यात येत आहेत. दरम्यान, चांद्रयान-३ च्या कामगिरीबद्दल शुभेच्छा देताना काँग्रेस आणि भाजपा तसेच इतर पक्षांनी आपापल्या पद्धतीने स्वत:च्या नेत्यांच्या कार्याचा गौरव केला.
पंतप्रधान मोदी यांनी दिल्या भारतीयांना शुभेच्छा
विक्रम लँडर चंद्रपृष्ठावर उतरत असतानाचा सर्व प्रसंग लाईव्ह दाखवला जात होता. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रोसाठी ही एक परीक्षाच होती. ही सर्व प्रक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील पाहात होते. विशेष म्हणजे इस्त्रोच्या यूट्यूब चॅनलेवर विक्रम या लँडरची लँडिंग दाखवली जात असताना एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील दाखवले जात होते. मोहीम यशस्वी झाल्यानंतर मोदी यांनी एक्स खात्याच्या माध्यमातून भारतीयांना, इस्त्रोला शुभेच्छा दिल्या.
काँग्रेसकडून नेहरू, इंदिरा गांधींची आठवण
तर चांद्रयान-३ मोहिमेच्या यशाबद्दल शुभेच्छा देताना काँग्रेसने पंडित जवाहरलाल नेहरू यांचा उल्लेख करत काँग्रेसची सत्ता असताना अंतराळ संशोधन क्षेत्रात भारताने काय काय कामगिरी केली? याचा लेखाजोखा मांडला. दुसऱ्या एका ट्वीटमध्ये काँग्रेसने इस्त्रो या संस्थेच्या उभारणीत काँग्रेसने तसेच पंडित जवाहरलाल नेहरू, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी तसेच काँग्रेसच्या अन्य पंतप्रधांनी काय योगदान दिले? हे सांगण्यासाठी विशेष व्हिडीओ शेअर केला.
भाजपाच्या काळात अंतराळ संशोधनात भारताची प्रगती- भाजपा
विक्रम लँडर चंद्रपृष्ठावर उतरल्यानंतर मोदी यांनी इस्त्रोचे प्रमुख के. शिवन यांना फोन करून शुभेच्छा दिल्या होत्या. भाजपाने या प्रसंगाचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर शेअर केला. तसेच नरेंद्र मोदी भारतीयांना आणि इस्त्रोतील संशोधकांना शुभेच्छा देतानाचीही व्हिडिओ शेअर करत अंतराळ संशोधनात भाजपा सरकारच्या काळात खूप प्रगती झाली, हे सांगण्याचा प्रयत्न केला.
गेल्या ९ वर्षांत भाजपाने खूप प्रगती केली- मालवीय
भाजपाच्या आयटी सेलचे प्रभारी अमित मालवीय यांनी एक खास ट्वीट करून काँग्रेस, तृणमूल काँग्रेस तसेच विरोधातील अन्य पक्षांवर हल्लाबोल केला. “तृणमूल काँग्रेस, काँग्रेस या पक्षांतील नेते आम्ही अंतराळ संशोधनात खूप काही केले हे सांगण्याआधी भाजपाच्या शासनकाळात भारताने ९ वर्षांत काय काय मिळवलं याचा हा लेखाजोखा. खरं पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात भारताने अंतराळ संशोधनात खूप काही मिळवलं आहे. पंडित नेहरू आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यापेक्षा ते कितीतरी अधिक आहे,” असे मालवीय म्हणाले.