या लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला मोठा फटका बसला आहे. तब्बल ८० लोकसभा मतदारसंघ असणारे उत्तर प्रदेश हे राज्य केंद्रातील सत्तेसाठी फार महत्त्वाचे मानले जाते. याच राज्यामध्ये भाजपाला मोठा फटका बसला. निवडणुकीच्या तोंडावर राम मंदिराचे उद्घाटन करुनही अयोध्येतही (फैजाबाद लोकसभा मतदारसंघ) भाजपाचा पराभव झाला. आता याच पार्श्वभूमीवर भाजपाने आपली रणनीती बदलली आहे. त्याचे अनेक संकेत सध्या दिसत आहेत. उत्तर प्रदेशची राजधानी असलेले लखनौ हे शहर हिंदु पुराणकथांनुसार, ‘लखनपुरी’ अथवा ‘लक्ष्मणपुरी’ या नावाने ओळखले जाते. प्रभू श्रीरामाचे बंधू लक्ष्मण यांच्या नावावरुन या शहराची ओळख वारंवार अधोरेखित केली गेली आहे. मात्र, आता लोकसभा निवडणुकीमध्ये फटका बसल्यानंतर तसेच बदललेल्या राजकीय पार्श्वभूमीवर भाजपाने या शहराचा इतिहासही एका वेगळ्या नावाबरोबर जोडण्यास सुरुवात केली आहे. गेल्या रविवारी (१४ जुलै) पक्षाच्या राज्य कार्यकारिणी बैठकीमध्ये नव्या नेत्यांचे स्वागत करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा उपस्थित होते. त्यावेळी उत्तर प्रदेश भाजपाचे प्रदेशाध्यक्ष भुपेंद्र सिंह चौधरी म्हणाले की, “या क्षणी या शहराचे वास्तविक भारतीय वास्तुविशारद लखन पासी यांची आठवण काढणे औचित्यपूर्ण ठरेल.” पुढे ते म्हणाले की, त्यांची आठवण न काढल्यास ही बैठक अपूर्ण ठरेल. लखन पासी नावाच्या राजाने दहाव्या अथवा अकराव्या शतकामध्ये आजच्या लखनौवर राज्य केल्याचे मानले जाते.
हेही वाचा : विशाळगडावरून राजकीय चिखलफेक अधिक; मूळ प्रश्नाचे गांभीर्य हरपले
अगदी गेल्या वर्षीपर्यंत भाजपाच्या अजेंड्यावर कुठेच लखन पासी यांचे नाव नव्हते. याउलट लखनौचे नाव बदलून ते लक्ष्मणपुरी करण्यात यावे, अशी मागणी काही भाजपाच्या नेत्यांकडून जोरदारपणे केली जात होती. मात्र, लोकसभा निवडणुकीमध्ये, पासी समाजाची मते मोठ्या प्रमाणावर इंडिया आघाडीकडे गेल्यामुळे भाजपा आता या समाजाला आपल्या बाजूने ओढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पासी समाज हा दलित समुदायांमध्ये मोडतो. उत्तर प्रदेशमध्ये जाटव समाजानंतर या समाजाची संख्या लक्षणीय आहे. हा समाज इंडिया आघाडीकडे झुकणे भाजपासाठी धोक्याची घंटा आहे. २०२७ साली उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय गणिते आखण्याची तयारी भाजपाने आतापासूनच सुरु केली आहेत. तसेच राज्यातील १० विधानसभा जागांवरील आमदार लोकसभा निवडणुकीमध्ये विजय प्राप्त करुन संसदेत गेल्याने त्यांच्या विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होणार आहे. त्या ठिकाणची मोर्चेबांधणी करण्यासाठी आणि पासी समाजाची मते आपल्या बाजूने वळवण्यासाठी म्हणून भाजपाकडून ‘लखन पासी’ हा मुद्दा पुढे रेटला जात आहे. उत्तर प्रदेशमध्ये असलेल्या दलितांच्या एकूण लोकसंख्येपैकी १६ टक्के दलित पासी समाजाचे आहेत. पासी समाज हा राज्यातील राजकीयदृष्ट्या सर्वांत प्रभावशाली समुदायांपैकी एक आहे. विशेषतः फैजाबाद, लखनौ, बाराबंकी, हरदोई, सीतापूर, लखीमपूर खेरी, उन्नाव, रायबरेली आणि प्रतापगड अशा अवध प्रदेशात हा समुदाय महत्त्वपूर्ण भूमिका बजावताना दिसतो.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये, या प्रदेशातील पासी समाजाने इंडिया आघाडीच्या मागे आपले राजकीय मत एकवटल्याने फैजाबाद, बाराबंकी, सीतापूर, खेरी, प्रतापगड आणि रायबरेली अशा अनेक जागांवर इंडिया आघाडीचे उमेदवार निवडून आले आहेत; तर ज्या जागांवर जिंकता आले नाही, अशा लखनौ, हरदोई आणि उन्नावसारख्या जागांवरील भाजपाचे मताधिक्य घटवण्यातही इंडिया आघाडीला यश आले आहे. अवध प्रदेशातील २५ पेक्षा जास्त विधानसभा मतदारसंघांवर पासी समाज प्रभाव टाकू शकतो, असा भाजपाचा प्राथमिक अंदाज आहे. येत्या काही महिन्यांमध्ये या समाजाला आपल्या बाजूने वळवण्यासाठीची लढाई अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. अयोध्येतील (फैजाबाद लोकसभा मतदारसंघ) पराभवामुळे भाजपाचे नाक कापले गेल्याची भावना आहे. निवडणुकीच्या तोंडावर घाई-गडबडीने राम मंदिराचे भव्यदिव्य उद्घाटन करुनही त्याचा राजकीय फायदा भाजपाला झालेला नाही. याच अयोध्येमध्ये समाजवादी पार्टीचे उमेदवार अवधेश प्रसाद यांचा विजय झाला असून ते सध्या संसदेतील एक महत्त्वाचा चेहरा झाले आहेत. अवधेश प्रसाद स्वत: पासी समाजाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांनी अलीकडेच संसदेमध्ये सदस्यत्वाची शपथ घेताना बिजली पासी आणि उर्दा देवी या पासी समाजातील लोकप्रिय व्यक्तींची नावेही घेतली होती.
दुसऱ्या बाजूला आता भाजपानेही या समुदायाला आपल्या बाजूने खेचण्यासाठीचे प्रयत्न सुरु केले आहेत. राज्य कार्यकारणीच्या बैठकीमध्ये लखन पासी या ११ व्या शतकातील राजाचा उल्लेख करुन भाजपाने एकप्रकारे या समुदायाला संदेश दिला आहे, की आम्हाला तुमच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक प्रतिमांची काळजी आहे. भाजपाचे अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष राम चंद्र कनौजिया म्हणाले की, “लक्ष्मण आणि लखन पासी हे दोघेही इतिहासातील महत्त्वाच्या व्यक्ती आहे. हजारो वर्षांपूर्वी, लक्ष्मणाच्या नावावरुनच लखनौ हे शहर लखनपुरी नावाने ओळखले जायचे. कालांतराने, लखन पासी या पासी समाजातील राजाने लखनौ शहर वसल्याचे म्हटले जाते. पासी राजांचा समृद्ध असा इतिहास अवध प्रदेशाला लाभला आहे.”
मात्र, एकाच वेळी लक्ष्मण आणि लखन पासी या दोघांचेही नाव घेणे विरोधाभासी असल्याची लोकांची भावना आहे. गेल्या वर्षी, विमानतळाजवळ लक्ष्मणाच्या विशाल पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यानंतर भाजपाचे प्रतापगढ मतदारसंघांचे तेव्हाचे खासदार संगम लाल गुप्ता यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून लखनौचे नाव बदलून लखनपुरी वा लक्ष्मणपुरी करण्याची विनंती केली होती. प्रभू रामाने हे शहर आपल्या धाकट्या भावाला भेट दिल्याचा दावा त्यांनी केला. या पत्रानंतर वादाला तोंड फुटले होते. समाजवादी पार्टीचे तत्कालीन नेते आणि माजी मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी शहराला लक्ष्मणाशी जोडण्याला विरोध केला होता. लखन पासी आणि त्यांची पत्नी लखनवती यांच्या नावावरुन हे शहर लखनौ म्हणून ओळखले गेले असल्याचा दावाही त्यांनी केला होता.