बदलापूर / ठाणे : विधानसभा उमेदवार निवडीसाठी भाजपच्या प्रदेशस्तरावरून आयोजित करण्यात आलेल्या ‘चिठ्ठी प्रयोगा’वर ठाण्यात काही इच्छुकांनी प्रश्न उपस्थित करत प्रक्रियेवर आक्षेप घेतल्याचे, तर मुरबाड विधानसभा मतदारसंघात माजी खासदार कपिल पाटील आणि आमदार किसन कथोरे यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आल्याचे चित्र दिसून आले. यामुळे ठाणे आणि बदलापूर अशा दोन्ही ठिकाणी चिठ्ठी प्रयोगामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. भाजपकडूनही उमेदवार निश्चितीची प्रक्रिया सुरू आहे.

प्रक्रिया कशी?

विधानसभा निवडणुकीत उमेदवारांची निवड सोपी जावी यासाठी भाजप प्रदेश कार्यकारणीने जिल्हास्तरावर चिठ्ठीद्वारे उमेदवारी कळविण्याचे आदेश स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. जिल्हा कार्यकारणीतील पदाधिकारी, सदस्यांनी त्यांच्या पसंतीची तीन नावे पसंतीक्रमानुसार बंद लिफाफ्यात पक्ष निरीक्षकांकडे सोपवावी अशी ही प्रक्रिया आहे.

हेही वाचा >>> न्यायदेवतेवर विश्वास पण दोन वर्षे न्याय मिळाला नाही! उद्धव ठाकरे यांची खंत

ही प्रक्रिया गुरुवारी ठाणे आणि बदलापूर भागात पार पडली. ठाणे भाजपच्या वर्तकनगर येथील विभाग कार्यालयात गुरुवारी पालघरचे खासदार डॉ.हेमंत सावरा यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यावेळी व्यासपीठावर आमदार संजय केळकर, जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, माधवी नाईक उपस्थित होते. उमेदवार ठरविण्यासारख्या महत्त्वाच्या प्रक्रियेची कोणतीही पूर्वसूचना आम्हाला दिली गेली नसल्याबाबत स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत, या बैठकीत काही इच्छुकांनी संपूर्ण प्रक्रियेवर आक्षेप घेतला. यावेळी नाराजांची निरीक्षकांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

पाटीलकथोरे गटात संघर्ष

गुरुवारी बदलापुरात झालेल्या उमेदवार निवड प्रक्रियेदरम्यान पाटील आणि कथोरे यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आला. निरीक्षक गोपाळ शेट्टी आणि जिल्हा संघटक हेमंत म्हात्रे यांच्या उपस्थितीत बदलापूर पूर्वेतील सभागृहात ही प्रक्रिया राबवण्यात येणार होती. यावेळी कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांची यादी वाचून दाखवण्यात आली. मात्र यावेळी वाचून दाखवण्यात आलेल्या यादीत अनेक पदाधिकाऱ्यांची नावेच नसल्याचे समोर आले. तसेच अनेक कथोरे समर्थक पदाधिकाऱ्यांची नावेच यात नव्हती. त्यामुळे त्यांनी या यादीला विरोध केला. त्यावेळी काही पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली तसेच धक्काबुक्कीही झाली.

पाटील समर्थकांचा वरचष्मा

संबंधित यादीत कपिल पाटील समर्थकांचा वरचष्मा असल्याची माहिती कथोरे समर्थकांनी दिली आहे. तसेच भाजपशी संबंधित नसलेले, कथोरे यांच्या सक्रिय नसलेल्या व्यक्ती तसेच काही संघाच्या पदाधिकाऱ्यांचीही नावे या यादीत असल्याची माहिती भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने दिली आहे.