सोलापूर : वर्षानुवर्षे राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणा-या करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक नेहमीप्रमाणे यंदाही वादळी ठरत आहे. पक्षीय राजकारणापेक्षा स्थानिक गटातटातच अटीतटीची होत असून प्रचारात महायुती आणि महाविकास आघाडीच्या नावाची बिरूदावली केवळ नावालाच दिसत आहे. महायुतीचे नेते महाविकास आघाडीला तर महाविकास आघाडीचे नेते महायुतीच्या बाजूने समर्थन देत आहेत.‌

महायुतीच्या बाजूने राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे युवा नेते, आमदार रोहित पवार यांचे समर्थक तर दुसरीकडे महायुतीचे नेते तथा शेजारच्या विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचे समर्थक महाविकास आघाडीचा प्रचार करीत आहेत.‌ यात होणा-या फलकबाजीतून गोंधळाचे चित्र पाहायला मिळत आहे.

३५-४० वर्षांपूर्वी उभारणी झाल्यापासून आदिनाथ साखर कारखाना कधीही विकासाच्या वाटेवर गेला नाही. उलट, संपूर्ण तालुक्याच्या राजकारणाचा अड्डा म्हणूनच हा कारखाना ओळखला जात आहे.

गेल्या २०-२२ वर्षांपासून आदिनाथ साखर कारखान्याची सूत्रे दिवंगत माजी मंत्री दिगंबर बागल यांच्या कुटुंबीयांकडे होती. सदैव कर्जाच्या विळख्यात सापडलेला हा कारखाना कधीही कर्जमुक्त होऊ शकला नाही. तीन वर्षांपूर्वी १२८ कोटींचा कर्जाचा डोंगर आणि शेतकरी सभासद व कामगारांची देणी असताना हा कारखाना शेजारच्या बारामती ॲग्रो लि. कंपनीच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया राबविली जात होती. परंतु त्याचवेळी रश्मी बागल व त्यांचे बंधू दिग्विजय बागल यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धावा केला. शिंदे यांनी आर्थिक सहास्यासाठी शब्द देताना त्याची जबाबदारी तत्कालीन आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्यावर सोपवली होती.

त्यावेळी कारखान्याचे बंद पडलेले धुराडे पेटविण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे कारखान्यात आले होते. कारखान्याचा गळीत हंगाम औटघटकेचा ठरला. शिवसेनेचे माढा विभाग जिल्हाप्रमुख महेश चिवटे व इतरांचे प्रशासकीय संचालक मंडळ अस्तित्वात आले. नंतर त्यात बदलही झाला. परंतु त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. यातूनच बागल गट कारखान्यापासून दुरावला. बागल गट सध्या भाजपमध्ये कार्यरत आहे.

या पार्श्वभूमीवर आदिनाथ साखर कारखान्याच्या निवडणुकीत बागल गटाने अलिप्त राहणे पसंत केले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार नारायण पाटील यांनी ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील, भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, करमाळ्याचे राजकारणात नेहमीच निर्णायक भूमिका घेणारे माजी आमदार जयवंत जगताप यांच्यासोबत महाविकास आघाडीचे संजीवनी पॅनेल उभे केले आहे. तर त्याविरोधात अपक्ष माजी आमदार संजय शिंदे यांनी महायुतीच्या माध्यमातून शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे आदींच्या मदतीने आदिनाथ बचाव पॅनेलचे आव्हान उभे केले आहे. या निवडणुकीत कारखान्याचे कार्यक्षेत्र असलेल्या शेजारच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जतमधील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आणि त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे नेते असलेले विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे हे एकमेकांविरुद्ध सक्रिय झाले आहेत.

उल्लेखनीय म्हणजे आमदार रोहित पवार हे महाविकास आघाडीबरोबर राहण्याची भूमिका न घेता महायुतीच्या बाजूने उभे आहेत. तर त्यांचे विरोधक प्रा. राम शिंदे यांच्या समर्थकांनी महायुतीऐवजी महाविकास आघाडीला ताकद देण्याची परस्परविरोधी भूमिका घेतली आहे. महाविकास आघाडी पुरस्कृत संजीवनी पॅनेलच्या प्रचारात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे छायाचित्र झळकावण्यात येत आहे. तर दुसरीकडे महायुतीच्या पॅनलकडून आमदार रोहित पवार यांचे छायाचित्र वापरले जात आहे.

या निवडणुकीत खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार नारायण पाटील, माजी आमदार जयवंत जगताप यांच्याकडून ताकद पणाला लावण्यात आली आहे. तर त्यांचे प्रतिस्पर्धी माजी आमदार संजय शिंदे यांच्या बाजूने माळशिरसमधील मोहिते-पाटील यांचे कट्टर विरोधक, भाजपचे माजी आमदार राम सातपुते हे धावून आले आहेत. या निवडणुकीत कोणाच्या बाजूने कौल लागणार, यापेक्षा आदिनाथ साखर कारखाना आर्थिक चक्रव्यूहातून कधी बाहेर पडणार, यांची जास्त उत्सुकता आहे.