भाजपबरोबर हातमिळवणी केल्यापासून अजित पवारांमध्ये कमालीचा बदल झाला आहे. एरवी रूक्ष अर्थसंकल्प सादर करणाऱ्या अजित पवारांनी आपल्या दहाव्या अर्थसंकल्पात थेट तुकोबांच्या अभंगांचा आधार घेतला. वारीला हजेरी लावली. ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधला. आपल्या विरोधातील एकही आरोप सिद्ध झाला नसल्याचा खुलासा त्यातून केला. अर्थसंकल्पात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना जाहीर केली तरी त्याचे सारे श्रेय मुख्यमंत्र्यांना मिळू लागले. म्हणून ‘संवाद लाडक्या बहिणीं’सोबत हा उपक्रम सोमवारी त्यांच्या वाढदिवसापासून सुरू केला. एरवी वाढदिवसाला अजितदादा कधी उपलब्ध नसतात. पण तोही बदल झाला. ‘मी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतो’, असे कार्यकर्त्यांनी लिहिलेला केकही कापला. अजितदादा आता गुलाबी रंगाचे जाकीट परिधान करू लागले. राष्ट्रवादीचा रंग गुलाबी करण्यात आला. अजितदादांमधील या बदलाचे भाजपपासून काँग्रेस, शरद पवार गटातही औत्सुक्य आहे. अजित पवार एवढे बदलले कसे, अशीच चर्चा असते. एकत्रित राष्ट्रवादीत असताना मुख्यमंत्रीपदाने हुलकावणी दिली. निदान महायुतीत तरी ही इच्छा पूर्ण व्हावी, असा बहुधा त्यांचा प्रयत्न दिसतो. यासाठीच त्यांनी सल्ला आणि रणनीती ठरविण्याकरिता एका संस्थेची मदत घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ममता बॅनर्जी, नितीशकुमार, के. चंद्रशेखर राव आदींनी राजकीय रणनीतीकारांची मदत घेतली होती व त्यांना यशही आले होते. याचा बोध घेऊनच बहुधा राष्ट्रवादीने एका संस्थेची मदत घेतली आहे. आता या संस्थेच्या सल्ल्यानुसार अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे राजकीय रणनीती आखणार आहेत. काहीही असो, अजितदादा बदलले खरे!
हेही वाचा >>> दलालांमुळे मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलिन; जनतेत योग्य संदेश जात नसल्याची गणेश नाईकांची टीका
दृष्टिकोन बदला…
चोरी करणे पाप आहे असा सुविचार शाळेच्या फळ्यावर लिहिला होता. गुरुजी वर्गात आले, सुविचार वाचला आणि मुलांना या सुविचारावर निबंध लिहिण्यास सांगितले. सर्व मुलांनी चोरीमुळे होणारा मनस्ताप, होणारी शिक्षा यावर लिहिले. मात्र, एका मुलाने निबंध लिहिला तो म्हणजे चोरीमुळे अर्थकारणाला गती येते. गुरुजींनी त्याला वर्गात उभे राहून लिहिलेला निबंध वाचण्यास सांगितले. त्याने सांगितले चोरी होते, म्हणून आपण घराला कुंपण बांधतो, यामुळे गवंडी, मजुरांना रोजगार मिळतो, दाराला कुलूप लावतो, कधी चावी हरवते, मग किल्ली तयार करणाऱ्यांना रोजगार मिळतो. घरात पैसे ठेवले तर वाढत तर नाहीतच, पण चोरीची भीती असल्याने बँकेत ठेवतो. यामुळे गरजूंना कर्ज मिळते, यातून धंदा वाढतो. यामुळे अर्थकारणाला बळकटी येते. रोजगार वाढतो. मग चोरी ही कला म्हणजे विकासाला गती देणारी कला आहे. यालाच म्हणतात, दृष्टी बदला म्हणजे दृष्टिकोन बदलेल. मुलाने लिहिलेले ऐकून गुरुजी आता रजेवर गेले आहेत नवा दृष्टिकोन शिकायला. वाळव्यात झालेल्या सभेत एका लोकप्रतिनिधीने सांगितलेला हा किस्सा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
रविकांत तुपकर यांची ‘स्वाभिमानीतून’ हकालपट्टी
पुणे : पक्षविरोधी कृत्य, संस्थापक-अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यावरील टीका आणि पक्षच ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करून स्वाभिमानी पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून रविकांत तुपकर यांची हकालपट्टी करण्यात आली. पक्षाच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष प्रा. जालिंदर पाटील यांनी सोमवारी पुण्यात ही घोषणा केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिस्तपालन समितीची बैठक सोमवारी पुण्यात आयोजित करण्यात आली होती. यापुढे तुपकर यांचा पक्ष आणि संघटनेशी कोणताही संबंध असणार नाही, असेही पाटील यांनी जाहीर केले. जालिंदर पाटील म्हणाले, की स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तुपकर यांना संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पद दिले. संघटनेच्या वतीने राज्यमंत्रिपदाच्या दर्जाचे महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्याोग महामंडळाचे अध्यक्षपद दिले. तरीही तुपकर संघटनेच्या विरोधात काम करीत राहिले. पुण्यात २४ जुलै रोजी संघटनेतील काही सहकाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत चर्चा करून पुढील निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया तुपकर यांनी दिली.