भाजपबरोबर हातमिळवणी केल्यापासून अजित पवारांमध्ये कमालीचा बदल झाला आहे. एरवी रूक्ष अर्थसंकल्प सादर करणाऱ्या अजित पवारांनी आपल्या दहाव्या अर्थसंकल्पात थेट तुकोबांच्या अभंगांचा आधार घेतला. वारीला हजेरी लावली. ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधला. आपल्या विरोधातील एकही आरोप सिद्ध झाला नसल्याचा खुलासा त्यातून केला. अर्थसंकल्पात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना जाहीर केली तरी त्याचे सारे श्रेय मुख्यमंत्र्यांना मिळू लागले. म्हणून ‘संवाद लाडक्या बहिणीं’सोबत हा उपक्रम सोमवारी त्यांच्या वाढदिवसापासून सुरू केला. एरवी वाढदिवसाला अजितदादा कधी उपलब्ध नसतात. पण तोही बदल झाला. ‘मी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतो’, असे कार्यकर्त्यांनी लिहिलेला केकही कापला. अजितदादा आता गुलाबी रंगाचे जाकीट परिधान करू लागले. राष्ट्रवादीचा रंग गुलाबी करण्यात आला. अजितदादांमधील या बदलाचे भाजपपासून काँग्रेस, शरद पवार गटातही औत्सुक्य आहे. अजित पवार एवढे बदलले कसे, अशीच चर्चा असते. एकत्रित राष्ट्रवादीत असताना मुख्यमंत्रीपदाने हुलकावणी दिली. निदान महायुतीत तरी ही इच्छा पूर्ण व्हावी, असा बहुधा त्यांचा प्रयत्न दिसतो. यासाठीच त्यांनी सल्ला आणि रणनीती ठरविण्याकरिता एका संस्थेची मदत घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ममता बॅनर्जी, नितीशकुमार, के. चंद्रशेखर राव आदींनी राजकीय रणनीतीकारांची मदत घेतली होती व त्यांना यशही आले होते. याचा बोध घेऊनच बहुधा राष्ट्रवादीने एका संस्थेची मदत घेतली आहे. आता या संस्थेच्या सल्ल्यानुसार अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे राजकीय रणनीती आखणार आहेत. काहीही असो, अजितदादा बदलले खरे!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा