उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ईडी हे समीकरण अजूनही कायम आहे. केंद्रीय यंत्रणांच्या जाचाला कंटाळूनच अजितदादांनी म्हणे भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्याचा दावा शरद पवार गटाच्या नेत्यांकडून घेतला जातो. आता खरे काय आणि खोटे हे अजितदादांच जाणो. पण अजितदादा सत्ताधारी गोटात दाखल झाले तरी त्यांच्या मागे बसलेला ईडीचा शिक्का काही जाण्यास तयार नसावा. निमित्त होते पुण्यातील बालगंधर्व रंगमदिरातील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचे. अजित पवार यांचे सभागृहात आगमन झाले, आगत-स्वागत झाले आणि ‘कितीही लावा ईडी-फडी, पण आमचा दादा आहे रुबाबदार,’ गाणे अचानक ध्वनिक्षेपकावरून वाजण्यास सुरुवात झाली. आपण आता सत्ताधारी पक्षात आहोत हे बहुधा संयोजक विसरले असावेत. मग घाईघाईत हे गाणे तत्काळ बंद करण्यात आले. ध्वनिक्षेपक यंत्रणेच्या चालकांची तरी काय चूक? अजितदादा म्हटल्यावर सिंचन घोटाळा, सहकारी कारखान्याची खरेदी, ईडी हे विषय ओघानेच येतात.

हवशे, गवशे, नवशे..

सांगली लोकसभेसाठीच्या जागेवरून महाविकास आघाडीतील वाद मुंबईच्या पातळीवर वरिष्ठ नेत्यांनी संपवला असला तरी स्थानिक पातळीवर अजूनही आग धुमसत आहे. या आगीचे रूपांतर वणव्यात होणार की कृष्णामाईत विसर्जित होणार हे कळायला अजून आठ दिवस तरी लागतील. तथापि, निवडणूक आणि लगीनघाई दोन्ही सारखेच म्हटले पाहिजे. लग्न वाजले पाहिजे तर बॅण्डबाजा लागतोच. याच निवडणूक सराईमध्ये हवशे, गवशे आणि नवशे सारेच सहभागी होत असले तरी वाजविण्याचे काम माध्यमातूनच होत असते. निवडणुकीच्या सुगीत नवनव्या कल्पना उरी बाळगून येणाऱ्यांची संख्या तर समाज माध्यमामुळे अमर्याद वाढली आहे. यामुळे नेतेमंडळींही गोंधळून गेले आहेत.

हेही वाचा >>>भाजपामध्ये असताना पटनाईक सरकारवर करायच्या जोरदार टीका; आता त्याच पक्षाकडून दोन महिला लढवणार निवडणूक

साऱ्यांचाच गोंधळ

सध्याच्या अस्थिर राजकीय वातावरणात कोण कोणत्या पक्षात आहे हे कळायलाच मार्ग उरलेला नाही. आज येथे असलेला नेता उद्या सत्ताधारी पक्षात दाखल झालेला असतो. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशीच घाऊक पक्षांतरे सुरू झाली. सकाळी पक्षात प्रवेश, संध्याकाळी उमेदवारी असे प्रकार बरेच घडले. शिरुर मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उमेदवारीसाठी शिवसेना शिंदे गटातून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. पण शिवसेनेच्या नेत्यांना ते अजून आपल्याच पक्षात आहेत असे वाटत असावे. अन्य कोणाचे चुकले असते तर समजू शकले असते. पण एरव्ही राजकीय चातुर्याबद्दल सजग असणाऱ्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांचाही असाच गोंधळ उडाला. धनुष्यबाणाला मतदान करून आढळराव यांना विजयी करा, असे आवाहन त्यांनी महायुतीच्या मेळाव्यात केले आणि त्यांची चूक कार्यकर्त्यांनी निदर्शनास आणून दिली. यावर आढळराव आमचेच हे सांगत बाजू सांभाळून घेण्याचा नीलमताईंनी प्रयत्न केला पण त्यातून पक्षाच्याच नेत्यांचे अज्ञान समोर आले.

(संकलन : अविनाश कवठेकर, दिगंबर शिंदे)

Story img Loader