निवडणुकीत कार्यकर्त्याला आमदार होण्याची स्वप्ने पडत असतात, यात वावगेही काही नाही. मात्र, पक्षाकडून उमेदवारी देत असताना जनमताचा कौल काय, उमेदवाराची पत किती, निवडणुकीत किती खर्च केला जाऊ शकतो, याचा सारासार विचार करून उमेदवारी दिली जाते. आता एखाद्याला उमेदवारी जाहीर झाली की पक्षात रुसवे फुगवे काढण्याचे काम संबंधित उमेदवार अथवा त्यांचे निकटचे समर्थक करत असतात. सांगलीतही भाजपने विद्यामान आमदार सुधीर गाडगीळ यांना नको म्हणत असताना निवडणुकीच्या रणांगणात उतरवले. मात्र, नाराजांची संख्याही दादा मैदानात मी नाही म्हटल्याने वाढली. आता रुसवेफुगवे काढण्यासाठी खुद्द चंद्रकांतदादा पाटील म्हणे सांगलीत येत आहेत. मात्र, एक नेते मी रुसलो हे दादांना कळावे म्हणून कृष्णा ओलांडणारच नाही असे म्हणून अडून बसले आहेत. आता दादा नदी ओलांडतात, की नेता पलीकडेच थांबतो याची चिंता पक्ष कार्यकर्त्यांना लागली आहे.

हेही वाचा >>> ठाण्यात उद्यापासून प्रचाराची रणधुमाळीला सुरूवात; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जितेंद्र आव्हाड, अविनाश जाधव अर्ज भरणार

तेव्हा किडीची उपमा, आता प्रचार…

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार संजय पाटील यांच्या विरोधात उघड भूमिका घेऊन माजी आमदार अजितराव घोरपडे यांनी प्रचाराचे रणशिंग फुंकले होते. जोरदार आरोप – प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या होत्या. संजय पाटील ही जिल्ह्याला लागलेली कीड आहे, अशी जहरी टीका घोरपडे यांनी केली होती. आता तेच घोरपडे वरिष्ठांशी झालेल्या तडजोडीनंतर संजय पाटील यांचे पुत्र प्रभाकर पाटील यांचा प्रचार करण्यास सज्ज झाले आहेत. तासगाव तालुक्यात संजय पाटील यांची ताकद चांगली आहे, तर कवठेमहांकाळ तालुक्यात अजितराव घोरपडे गटाची ताकद चांगली आहे. त्यामुळे संजय पाटील यांना कवठेमहांकाळमधील मतदानासाठी घोरपडे यांची गरज भासते आहे.

मात्र, चार महिन्यांपूर्वी संजय पाटील यांच्या विरोधात बोलून जाहीर सभा गाजविणारे घोरपडे आता त्यांच्या मुलाचा प्रचार कसा करणार, हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे. शिवाय लोकसभेला चुरशीने संजय पाटील यांच्या विरोधात मतदान करणारे घोरपडे समर्थक आता त्यांच्याच मुलाला मतदान करतील का. संजय पाटील आणि घोरपडे यांच्या कार्यकर्त्यांचे मनोमीलन होईल का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

(संकलन : दत्ता जाधव, दिगंबर शिंदे)