मुंबईतील अंधेरी ते गोरेगाव पसरलेल्या उत्तर पश्चिम मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण तापले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अमोल कीर्तिकर यांची उमेदवारी जाहीर करताच काँग्रेसचे संजय निरुपम संतापले. त्यांनी खिचडी घोटाळयातील अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी कशी, असा सवाल केल्याने महाविकास आघाडीत वाद सुरू झाला. जागावाटप अद्याप अंतिम झालेले नाही, अशी सारवासारव मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षांना करावी लागली. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व शिवसेनेच्या शिंदे गटाचे गजानन कीर्तिकर करतात. वडील शिवसेनेच्या शिंदे गटात तर मुलगा ठाकरे गटात. मध्यंतरी गजाननभाऊ प्रकृती साथ देत नसल्याने निवडणूक न लढण्याच्या मन:स्थितीत होते. पण प्रकृती ठिकठाक होताच त्यांची महत्त्वाकांक्षा बळावली. यातच शिंदे गटाचेच रामदास कदम यांना आपल्या मुलाला उमेदवारी हवी होती. त्यावरून कीर्तिकर व रामदासभाई या शिवसेनेच्या जुन्या नेत्यांमध्ये वाद झाला होता. ठाकरे गटाने कीर्तिकर पुत्राची उमेदवारी जाहीर केली आहे. शिंदे गट गजानन कीर्तिकर यांनाच उमेदवारी देणार की हा मतदारसंघ भाजपच्या वाटयाला जाणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. उमेदवारीचा निर्णय काहीही होवो, उत्तर पश्चिम मतदारसंघाने सर्वपक्षीय नेतेमंडळींची डोकेदुखी वाढवली आहे.
हेही वाचा >>> निवडणुकीपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत ३३ निर्णय; सर्व घटकांना खूश करण्याचा प्रयत्न
राजकारणातील सुपारी..
रायगड जिल्ह्यातील दिवेआगर येथे सुपारी संशोधन केंद्राच्या विस्तारित केंद्राचा भूमिपूजन समारंभ नुकताच पार पडला. यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे एकत्र आले होते. धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात सुपारीचे धार्मिक महत्त्व सांगतानाच युती सरकारच्या काळात गोपीनाथ मुंडे यांनी गृहमंत्री असताना राज्यातील सुपारीबाजांचा म्हणजे गँगवॉरचा बंदोबस्त केला याची आठवण करून दिली. तोच धागा पकडत सुनील तटकरे यांनी राजकारणातील सुपारीचे महत्त्व मी सांगू शकतो, असे मिश्कीलपणे सांगितले. राजकारणात आमच्यासाठी देखील सुपारी देणारे अनेक आहेत, पण आमच्याकडचे अडकित्ते इतके मजबूत आहेत की कुणाला जरी सुपारी दिली तरी त्याचा बंदोबस्त करण्याची ताकद इथल्या जनतेमध्ये आहे, असे तटकरे यांनी सांगताच एकच खसखस पिकली.
तयारी दिल्लीच्या तख्ताची, पण आखाडा कोणता?
लोकसभा निवडणुकीची रंगत अजून बाकी असताना सांगलीच्या आखाडयात पैलवान कोण उतरणार याचीच चर्चा गावच्या पारावर सुरू आहे. गडी तावातावाने बोलत होते. जो तो आपापल्या नेत्यालाच तिकीट मिळणार असं शपथेवर सांगत हुता. आखाडयात नवीन पैलवान उतरणार असल्याची गेल्या एक वर्षांपासून चर्चा सुरू होती. पर कंच्या गाडीचं तिकीट मिळणार याची खात्री देता येत नव्हती. कधी वंचित, कधी भाजप, तर कधी राष्ट्रवादी असं करता करता पैलवानाची गाडी मातोश्रीच्या मुक्कामावर पोहोचली. आता तिकीट मिळणार असं वाटत असताना ते कंच्या गावचं याची चर्चाही चावडीच्या पारावर सुरू आहे.
पैलवानांची तयारी दिल्लीच्या तख्तासाठी असताना गावच्या जत्रेतील आखाडाचा गोड मानावा लागतो की काय, अशा शंकेची पालही पारावर सावली धरणाऱ्या लिंबावर चुकचुकलीच..
मुख्यमंत्री आणि मातोश्री..
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कोल्हापूरवर भारीच प्रेम. जवळपास दर महिन्याला त्यांची कोल्हापूर भेट ठरलेलीच. शुक्रवारी कोरोची या गावी ते आले होते. महिला दिनाचा कार्यक्रम असल्याने मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कामाची जंत्री वाचण्यास सुरुवात केली. त्यातही प्रामुख्याने भर राहिला तो महिलांसाठी करण्यात आलेल्या कामांचा, योजनांचा. शासकीय कार्यक्रम असल्याने राजकीय टीकाटिप्पणी करण्यास तसा फारसा वाव नव्हता. कोल्हापूर, सांगली भागातील महापूर नियंत्रणासाठी ३२०० कोटी रुपयांचा प्रकल्प राबवत असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. महापुरात जनावरांना वाचवण्यासाठी शेतकरी त्यांना दुसऱ्या, तिसऱ्या मजल्यावर गच्चीवर नेऊन ठेवतात असे नमूद करीत शिंदे यांनी शेतकऱ्यांचे जित्रापबावर प्रेम किती असते याचा प्रत्यय दिला. हा संदर्भ घेऊन लगेचच, पण काही जण वडील आजारी असताना पंचतारांकित हॉटेलमध्ये जाऊन राहतात, असे म्हणत ‘मातोश्री’ला उद्देशून बोचरी टिपणी केली. कार्यक्रम कोणताही असो, मुख्यमंत्र्यांची भाषणात गाडी ‘मातोश्री’वर वळतेच. त्याशिवाय त्यांच्या भाषणाला धारच येत नाही. (संकलन : हर्षद कशाळकर, दयानंद लिपारे, संतोष प्रधान, दिगंबर शिंदे)