महाभारतातील महायुद्धाप्रमाणे महा राज्याची सत्ता कुणाच्या हाती सोपवायची हे निश्चित करण्यासाठी इंद्रप्रस्थनगरी स्थित महाराजांनी युद्ध पुकारले. युद्ध म्हटलं की, जिंकण्यासाठी आधुनिक राज्यातील संस्थानिक आप-आपली मांडलिक सरदार शस्त्रासह सैन्य मैदानात उतरवले होतेच. आता निकाल देण्याचे काम लोकांचे असल्याने लोकांना आपलेसे करण्यासाठी प्रेमात आणि युद्धात ज्या पद्धतीने सगळे क्षम्य असते तीच स्थिती यावेळी महायुद्धात दिसली. लक्ष्मीदर्शनाबरोबरच आश्वासनाचा पाऊस पाडला गेला. लोकांचा कौल कुणाचा हे कळाले, सत्ता मिळाल्यानंतर अधिकाराची खुर्ची देण्याचे आश्वासन दिलेल्या एका सेनापतीच्या तुकडीतील हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच सरदार विजयी झाले. आता त्यांना काही तरी बक्षिस द्यायची वेळ आली. त्यावेळी एकाला मिळाली पाटीलकी, मात्र ती सध्या ओसाड गावची. बघुया ही पाटीलकी तरी नांदती होते का?
हेही वाचा >>> एक लाख मतदान केंद्रांवर वाढीव मतदान; मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचे प्रतिपादन
नामसाधर्म्याची चलाखी निष्प्रभ
निवडणुकीचे राजकारण यशस्वी करण्यासाठी काही पक्ष आणि उमेदवार अनेक प्रकारचे डाव रचतात. मतदारांची दिशाभूल करण्यासाठी चिन्ह आणि नामसाधर्म्य असलेले उमेदवार उभे केले जातात. यंदा नामसाधर्म्य असलेल्या उमेदवारांमुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा आणि हवे ते इप्सित साध्य करण्याचा डाव आखला गेला खरा; परंतु ही चलाखी मतदारांनी ओळखल्यामुळे उमेदवारांच्या नामसाधर्म्याचा कोणताही परिणाम झाला नाही. सोलापूर जिल्ह्यातील माढा आणि करमाळा या दोन्ही मतदारसंघांमध्ये असा प्रयोग मतदारांच्या जागरूकतेमुळे विरोधकांचा डाव यशस्वी झालेला दिसत नाही. माढ्यातून निवडून आलेले शरद पवार पक्षाचे अभिजित पाटील यांच्या नावाशी साधर्म्य असलेले अन्य तीन उमेदवार रिंगणात होते. परंतु त्यांना किमान ५७२ मतांपासून ते कमाल १०२७ मित्रांपर्यंतच मजल गाठता आली. शेजारच्या करमाळा मतदारसंघातही मावळते अपक्ष आमदार संजय शिंदे यांच्या नावाशी साधर्म्य असलेले अन्य दोन उमेदवारांचीही डाळ शिजली नाही. अर्थात संजय शिंदे यांचा पराभव झाला असला तरी त्याचे श्रेय अन्य दोन संजय शिंदे यांना मिळू शकले नाही.
(संकलन : दिगंबर शिंदे, एजाज हुसेन मुजावर.)