‘अरे त्या एकनाथास चांगले उमेदवार कोणी हवेत की नको..’, या पत्रकारमहर्षीच्या प्रश्नावर या महाराष्ट्रातील समस्त राजकीय पक्ष पॉवरफुल धक्क्याने हादरले. कारण प्रश्न विचारणारी व्यक्ती कोणी साधीसुधी असामी नव्हती. देशातल्या आयटी उद्योगाची तारणहार, ज्याच्या हातून प्रणब रॉय इत्यादींनी ‘सेफॉलॉजी’चे धडे गिरवले आणि ज्यांच्या केवळ उपस्थितीने काही दूरचित्रवाणी वाहिन्यांचा आणि त्यामुळे मराठी पत्रकारितेचा उद्धार झाला अशी ही असामी ! भाजपच्या दबावाखाली पिचलेल्या आणि अजितदादांच्या ‘राष्ट्रवादी’ शेजाऱ्याने कावलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साह्यास जाण्याचा या पत्रमहर्षीचा विचार ऐकून शिंदेच्या गोटातही दाणादाण उडाली. शिंदेचा मित्रपक्ष असलेल्या भाजपच्या फडणवीसांनी तर घाबरून डोळे गच्च मिटून घेतले आणि रामाचा (अयोध्येतल्या) धावा सुरू केला. न जाणो हे पत्रमहर्षी आपणासही विचारायचे.. भाजपस कोणी अभ्यासू, विद्वान, युगप्रवर्तक इत्यादी उमेदवार हवेत की नकोत? हा प्रश्न समजा दिल्लीतल्या दोघांपैकी एकाच्या कानावर गेला आणि त्यांनी नारायण राणे, विखे पाटील, हर्षवर्धन पाटील अशा मान्यवरांप्रमाणे या पत्रमहर्षीनाही आपल्या पक्षात घेतलं तर उद्या आपलाच बाजार उठायचा अशी भीती फडणवीसांना चाटून गेली. हा प्रश्न ऐकून त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांचाही शांतपणा ढळला. उद्या यांना उमेदवारी दिली तर मुख्यमंत्रिपदाचे तेच दावेदार व्हायचे.. अशी चिंता निर्माण होऊन ते चि. श्रीकांत, रा.रा. उदय सामंत.. गेला बाजार ते ‘काय झाडी, काय डोंगार.’वाले शहाजीबापू कुठे दिसतात का मदतीला म्हणून घाबरेघुबरे झाले. त्यांनी हाक दिली.. कोण आहे रे तिकडे? भाईंचा आवाज ऐकून दरवाजाबाहेर स्टुलावर पेंगणारे म्हस्के धावत आत आले. त्यांना पाहताच शिंदेनी आदेश दिला.. ठरलं तर मग.. ठाणे मतदारसंघ आपण लढवायचा नाही..! पत्रमहर्षीसाठी आपण आवळा द्यायचो आणि त्या बदल्यात आपला कोथळा निघायचा. म्हस्क्यांनी लगेच चुक दुरूस्त केली..कोहळा म्हणायचंय का आपल्याला? तेच ते.. मुख्यमंत्री म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा