मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचा ताबा घेतला असला तरी ठाकरे घराण्याचा अंकुश असलेला पक्ष सांभाळणे सोपे नाही आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जनता व शिवसेना कार्यकर्ते विसरलेले नाहीत. त्यामुळेच लोकसभा व विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना ‘ठाकरे’ हे आडनाव आपल्याबरोबर असावे, या हेतूने भाजपने राज ठाकरे यांचा महायुतीत समावेश करण्यासाठी खलबते होत आहेत. शिवसेनेत मनसेचा विलीन झाल्यास राज ठाकरे यांच्या रुपाने शिंदे गटाला एक नेतृत्व आणि बाळासाहेब ठाकरे यांचा एक राजकीय वारसदारही लाभेल. त्याचबरोबर राज ठाकरे यांना धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह व शिवसेनेत पक्षप्रमुख दर्जाचे मोठे स्थानही मिळेल, असे चित्र रंगविले जात आहे. अर्थात हे सारे जर, तरवर अवलंबून आहे.
साप पाहुण्याच्या लाठीने कधी मरणार?
लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाला आहे. आचारसंहिता लागू झाली आहे. भाजपने उमेदवारही जाहीर केला आहे. तरीही प्रचाराची रंगत मात्र अजून काही येत नाही. महाविकास आघाडीने संयुक्त जागा वाटप जाहीर करण्यापूर्वीच ठाकरे शिवसेनेने मशाल हाती घेऊन डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना मैदानात उतरवले आहे. यामुळे खरी कोंडी झाली आहे ती काँग्रेसची. काँग्रेसला सांगलीची जागा मिळेलच या आशेवर नेतेमंडळी असली तरी ऐनवेळी काय होणार याची त्यांनाही चिंता लागली आहेच. महाआघाडीतील मित्र घरातील कोनाडयात वेटोळे घालून बसलेला साप पाहुण्याच्या लाठीने कधी मरतो याची प्रतीक्षा करत आहे.
खोकला संपवा आणि सुंठही संपू नये!
जबाबदारी कशी निभवावी हे अमित देशमुख यांच्याकडून शिकावं, अशी चर्चा आता लातूर लोकसभा मतदारसंघात सुरू आहे. लातूर हा आरक्षित मतदारसंघ. त्यामुळे उमेदवार निवडीपासून निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणे, ही जबाबदारी काँग्रेसचे नेते म्हणून अमित देशमुख यांच्यावर येऊन पडते. समजा अगदीच साधा उमेदवार निवडला तर त्याच्या प्रचारासाठी लागणारी रसद देशमुखांना पुरवावी लागणार, हे लातूरच्या राजकारणात गृहीत धरलेले. त्यामुळे असा उमेदवार निवडवा की, त्याने आपल्या खिशाला चाट लावू नये. डॉ काळगे नेत्ररोग तज्ज्ञ असल्याने त्यांच्यासाठी बाकीचे प्रयत्न करावे लागणार नाहीत, हे ओघाने आलेच. त्यामुळेच सध्या अमित देशमुख यांच्या कार्यशैलीची चर्चा ‘खोकला तर संपवा आणि सुंठही संपू नये,’ अशी केली जात आहे.
बोकड चषक अन् जिवंत कोंबडी
सध्या देशात लोकसभा निवडणुकीचं वारं वाहू लागलं असलं तरी सध्या कोकणात राजकारणापेक्षा शिमगोत्सवाचा जास्त जोर आहे. त्याचबरोबर या काळात शहरातील उपनगर किंवा ग्रामीण भागात गावपातळीवर अतिशय स्थानिक स्वरूपात क्रिकेट स्पर्धा भरवल्या जात आहेत. स्थानिक राजकीय नेते आणि व्यापारी या स्पर्धाचे प्रायोजक बनून स्वत:च्या नावाने रोख बक्षिसांची खैरात करतात. रत्नागिरी शहरातल्या गवळीवाडा परिसरातील काही मंडळांनी एकत्र येऊन ‘गवळीवाडा प्रीमियर लीग’ अर्थात ‘जीपीएल’ ही अंडर आर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा आयोजित केली. बाजारपेठ, वाल्मिकी समाज, गवळीवाडा, बैलबाग, सुर्वे वाडी, खालचा गवळीवाडा दत्त मंदिर आणि आदर्श वरचा गवळीवाडा या सात मंडळांचे संघ या स्पर्धेत उतरले. इथपर्यंतचं सगळं कुठेही होणाऱ्या स्पर्धेसारखंच होतं. पण या स्पर्धेसाठी बक्षीस म्हणून विजेत्या संघाला जिवंत बोकड आणि सामनावीरांना कोंबडी व अंडयांचे क्रेट, बक्षीस म्हणून देण्यात आले.
(संकलन : उमाकांत देशपांडे, दिगंबर शिंदे, सुहास सरदेशमुख, सतीश कामत )