विधानसभेच्या २००९ च्या निवडणुकीत काँग्रेसमध्ये ‘अशोकपर्व’ गाजले. अशोकरावांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला १९९० नंतर सर्वाधिक जागा मिळाल्या आणि तेवढी मजल अजून काँग्रेसला गाठता आलेली नाही. राहुल गांधी यांचे उजवे हात समजले जाणारे के. सी. वेणूगोपाळ यांच्याशी अशोकरावांनी अलीकडे चांगलेच जमविले होते. अ.भा. काँग्रेस समितीच्या कार्यकारी समितीवर चव्हाणांची वर्णी लागली. असे असतानाही अशोकरावांनी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला. आता अशोकरावांना काँग्रेसमधील किती आमदारांचा पाठिंबा आहे याचा अंदाज घेतला जात आहे. नांदेडमध्ये काँग्रेसचे तीन आमदार असून ते सर्व त्यांच्या पाठीशी उभे राहतात का? राज्यसभेची खासदारकी देऊन भाजपने त्यांना राज्याच्या राजकारणाबाहेर अलगदपणे बाहेर काढले आहे.
निष्ठेचे फळ
राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत पराभव झाल्यावरही अविनाश पांडे यांना कालांतराने महाराष्ट्रातूनच राज्यसभेवर पाठविण्यात आले. मंत्रीपदी असतानाही विधानसभेची उमेदवारी नाकारल्यावर नागपाड्याचे सय्यद अहमद यांना झारखंडच्या राज्यपालपदाची लॉटरी लागली. चंद्रकांत हंडोरे असेच नशीबवान ठरले. विधान परिषद निवडणुकीत पक्षांतर्गत दगाफटक्यामुळे पराभूत झाल्याने त्याची भरपाई म्हणून हंडोरे यांना राज्यसभेवर संधी देण्यात आली.
हेही वाचा >>> मुख्य माहिती आयुक्तपदासाठी योग्य उमेदवार सापडेना!शेखर चन्ने , प्रदीप व्यास यांची विभागीय आयुक्तपदी वर्णी
मोहितेपाटील घराण्यातच जुंपली
माढा मतदारसंघात सत्ताधारी भाजपमध्ये उमेदवारीसाठी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि अकलूजचे धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यात मोठा संघर्ष सुरू असताना त्यात धैर्यशील यांचे चुलते जयसिंह मोहिते-पाटील यांनी उडी घेतली आहे. मोहिते-पाटलांपैकी कोणी लढले नाही तर आपण स्वत: शड्डू ठोकून या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहोत, अशी गर्जना जयसिंह मोहिते-पाटील यांनी केली. परंतु भाजप श्रेष्ठींकडून जयसिंह मोहिते-पाटील यांचे हे विधान किती गांभीर्याने घेतले जाईल, याचीही उत्सुकता आहे.
तोच अभंग चाल बदलली!
महायुतीचे उद्दिष्ट ठरले असले तरी जागावाटप अजूनही झालेले नाही. त्यामुळे या संदर्भातील नानाविध प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविकच आहे. शिवसेनेच्या महाअधिवेशनाच्या वेळी हा प्रश्न अनेकदा उपस्थित करण्यात आला. उद्याोगमंत्री उदय सामंत यांचे बंधूच रिंगणात राहणार असल्याने त्यांना तर हा प्रश्न वेगवेगळ्या अंगाने विचारत जणू भंडावून सोडले. हा मारा असह्य होऊ लागल्यावर अखेरीस तर उदय सामंत यांनी पत्रकारांच्या प्रश्नाचा रोख लक्षात घेऊन ‘अभंग तोच आहे, केवळ चाल बदलली जात आहे,’ अशी नर्मविनोदी टिपणी केली.
सांगलीतील भाजप नेत्यांना वेगळीच भीती…
आमदार जयंत पाटील यांची पावले भाजपच्या दिशेने असल्याची बातमी येऊ लागली. पाटील यांना याचा इन्कार केला असला तरी व्हायची ती चर्चा झालीच. एकेकाळी भाजपला बरोबर घेऊन महापालिकेची सत्ता पाटील यांनी विकास आघाडीच्या माध्यमातून हस्तगत केली होती. कालपरवापर्यंत भाजपची सांगली ‘जेजीपी’ म्हणजेच ‘जयंत जनता पार्टी’ अशी ओळख होती. यामुळे पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या वावडीनेच अनेक भाजपेयींच्या पोटात गोळा आला नसेल तरच नवल.
पालघरमधील नेतेमंडळींचा हिरमोड
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालघर येथे शिवसंकल्प अभियानांतर्गत कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. गेल्या काही महिन्यांपासून पालघर शिवसेनेत अंतर्गत गटबाजी उफळून आल्याने या मेळाव्याला मर्यादित प्रतिसाद मिळावा, यासाठी अंतर्गत हालचाली सुरू असल्याचे नेत्यांच्या कानी आले होते. दुसऱ्या गटाने या संधीचा लाभ घेऊन शक्तिप्रदर्शन करण्याचे विद्यामान पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी चंग बांधून मनोर येथे उभारलेल्या मंडपात गर्दी होईल यासाठी शर्थीचे ‘अर्थपूर्ण’ प्रयत्न केले होते. शिंदे यांनी मेळाव्याला लाभलेल्या प्रतिसादाबाबत समाधान व्यक्त केले. मात्र पालघर लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत चकार शब्द उच्चारला नाही.
(संकलन : दिगंबर शिंदे, संतोष प्रधान, दयानंद लिपारे, एजाज हुसेन मुजावर, नीरज राऊत )