निवडणुकीच्या धामधुमीत राजकीय नेत्यांनी पक्ष बदलणं यात काही विशेष राहिलेलं नाही. सध्याही लोकसभा निवडणूक काळात देशात आणि राज्यात अनेक ठिकाणी अनुभव येत आहे. रात्री एका उमेदवाराच्या प्रचार सभेत भाषण करायचं आणि सकाळी उठून विरोधी पक्षात सहभागी व्हायचं हे क्वचितच घडतं. पण राजापूरचे ठाकरे गटाचे माजी आमदार गणपत कदम यांनी एका रात्रीत मतपरिवर्तन कसं होऊ शकतं, याचा नमुना पेश केला आहे. सध्या शिवसेना ठाकरे गटात असलेले कदम भाजपचे केंद्रीय मंत्री असलेले नारायण राणे यांच्यासमवेत २००५ मध्ये काँग्रेस पक्षात गेले. त्यानंतर काही वर्षांनी त्यांनी पुन्हा ठाकरे गटामध्ये प्रवेश केला. मात्र नुकतेच भाजपचे महायुतीचे उमेदवार राणे यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली आणि कदम यांना, ‘देशात ज्यांची छाप आहे, विकास करण्याची ज्यांची धमक आहे असे नेतृत्व म्हणजे केंद्रीय मंत्री नारायण राणे’, असा साक्षात्कार झाला.
जय लोकशाही!
सांगली लोकसभेच्या मैदानातून दिल्लीच्या तख्ताकडे जाण्यासाठी २० कार्यकर्ते मतदारांचा कौल मागत आहेत. उमेदवारी मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर उमेदवारांचा प्रचारही आता रंगात येऊ लागला आहे. नेत्यांच्या सभांचे आयोजन करायचे म्हटले तर श्रोते आणायचे कोठून, हा प्रश्न गर्दीच्या ठेकेदारांनी सोडवला असून एरवी गावच्या चावडीवर राजकीय फड जमविणाऱ्यांना सुगीचे दिवस आले आहेत. ‘डोकी मोजा, पैका घ्या’ असा हिशोब सध्या सुरू आहे. एका डोक्याला पाचशे आणि शाकाहारी पुलावा पाकीट असा ठराव होत आहे. परवा सांगलीत झालेल्या सभेवेळी एक पाचशेचा गांधीबाबा मिळण्याऐवजी शंभराचे तीन गांधीबाबा पदरी पडले, पण पुलाव्याचे पाकीट काही केल्या मिळाले नाही. यामुळे झालेल्या वादा-वादात अखेर रस्त्यावरच्या भजी-पाववाल्याचा धंदा मात्र दुप्पट झाला. जय हो लोकशाही!
हेही वाचा >>>राहुल गांधींच्या वायनाड मतदारसंघात जंगली प्राण्यांचा उच्छाद
असाही धसका
उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर यांच्या उमेदवारीमुळे शिंदे गटात असलेल्या विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांच्यात वाकयुद्ध पाहायला मिळेल असे वाटले होते. गजानन कीर्तिकर शिंदे गटात गेल्यावर त्यांचा मुलगाही बरोबर जाईल अशी अटकळ होती; परंतु ती फोल ठरली. मुलगा अमोल याला शिवसेना ठाकरे गटाने उमेदवारी जाहीर केली. तेव्हा आपण मुलाच्या विरोधात प्रचार करणार असे गजाभाऊंनी जाहीर करून टाकले. भाजपने उमेदवाराच्या प्रचारासाठी महायुतीचे मेळावे घेण्यास सुरुवात केली. महायुतीचा पहिला मेळावा दिंडोशी मतदारसंघातील ओबेरॉय मॉलसमोर झाला. महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रचार करू, असे गजाभाऊंनी जाहीर केले. त्याच दरम्यान अमोलला सक्तवसुली संचालनालयाचे समन्स आले. त्याला चौकशीसाठी बोलावले गेले. वडिलांना साहजिकच मुलाचा पुळका आला. मुलावर कसा अन्याय झाला याचा पाढा गजाभाऊंनी वाचून दाखविला. गोरेगाव येथे झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात मुंबई भाजप अध्यक्ष व आमदार आशीष शेलार यांच्या उपस्थितीत मुलगा अमोलवर झालेल्या ईडी कारवाईचा निषेध करीत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. यामुळेच बहुधा महायुतीने धसका घेतलेला दिसतो. कारण अंधेरी पश्चिम, अंधेरी पूर्व आणि जोगेश्वरी पूर्व येथे महायुतीचे मेळावे झालेच नाही. कीर्तिकर यांच्या टीकेमुळेच मेळावे रद्द झाल्याची चर्चा रंगली आहे.
(संकलन : सतीश कामत, निशांत सरवणकर, दिगंबर शिंदे)