भाजप प्रदेश कार्यालयात प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींची केंद्रीय प्रभारींना डोकेदुखी होऊ लागल्याने माध्यमांना तडीपार करण्यात आले आहे. प्रदेश प्रसिद्धीमाध्यमे विभागाची रवानगी कफ परेड येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये कॉर्पोरेट कार्यालयात केली आहे. भाजप नेत्यांची विरोधी पक्षात अधिक काळ राहिल्याने पूर्वीपासून प्रसिद्धीमाध्यमांशी चांगली मैत्री होती. मात्र राज्यात गेल्या दहा वर्षांत महाविकास आघाडी सरकारचा अडीच वर्षांचा काळ सोडता भाजप सत्तेत आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी-लालकृष्ण अडवानी यांच्या काळातील पक्षाची कार्यपद्धती, वातावरण व वर्तणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी-अमित शहा यांच्या कार्यकाळात बदलली आहे. त्यामुळे आता निवडणूक काळात प्रदेश कार्यालयात प्रसिद्धी माध्यमांचा वावर हा दिल्लीश्वर निवडणूक प्रभारींना डोकेदुखी ठरला आहे.

हेही वाचा >>> नरेश म्हस्के यांच्या खासदारकीला आव्हान; जप्त मतदान यंत्र पुन्हा निवडणूक आयोगाकडे

नवी दिल्ली केंद्रीय कार्यालय, गांधीनगर आणि देशातील काही प्रदेश कार्यालयांमध्ये प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींचा वावर मर्यादित आहे. वरिष्ठ नेत्यांच्या बैठका होत असलेल्या ठिकाणी माध्यम प्रतिनिधींना फारसे फिरकता येत नाही. मुंबईत मात्र प्रदेश कार्यालयातील सर्व नेत्यांची दालने, पहिल्या मजल्यावरील बैठकीचे दालन आदी ठिकाणी प्रसिद्धीमाध्यमांचे प्रतिनिधी सहजपणे जातात. ही बाब केंद्रीय प्रभारी भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव, सह संघटन सरचिटणीस शिवप्रकाश यांना खटकली आहे. निवडणूक काळात दररोज प्रचार यंत्रणा, सभा व दौऱ्यांचे नियोजन, नेत्यांच्या भेटीगाठी प्रदेश कार्यालयात होतात. त्यात अनेक बाबी गोपनीय असतात. पण त्या प्रसिद्धीमाध्यमांकडे लगेच जातात. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असून प्रसिद्धीमाध्यमे विभागाच्या दालनातील दिवे, वातानुकूलन यंत्रे बंद ठेवावीत, कोणालाही चहापाणीही देऊ नये, पत्रकारांशी फारसे कोणी बोलू नये, अशा तोंडी सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. अशा रीतीने भाजपच्या मुख्यालयातून माध्यमांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे.

सांगली पॅटर्नची धमकी

विधानसभेच्या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांची धावपळ सुरू आहे. भाजपने सांगली, मिरजेचे उमेदवार पहिल्या यादीत जाहीर करून बाजी मारली. आता महाविकास आघाडीत काही ठिकाणी जागा वाटपावरून ताणाताणी तर काही ठिकाणी उमेदवाराच्या नावावरून चढाओढ सुरू आहे. उमेदवारी मिळावी यासाठी विरोधकांवर दबावाचे राजकारणही बऱ्याच वेळा यशस्वी ठरते, ठरल्याचे भासवून विरोधकांचे मानसिक खच्चीकरण करण्याचेही प्रयत्न केले जातात. मात्र जिल्ह्यातील एक नेते कायम माझा विरोधक मीच निश्चित करतो असे सांगत असतात. आता महायुती आणि महाविकास आघाडीत जागेसाठी सुरू असलेल्या संघर्षाच्या अग्नीला चूड लावण्याचे काम मात्र यावेळी इमानेइतबारे पार पाडले जात आहे. परवा एक शिष्टमंडळ मुंबईला जाउन धडकले. जागा हक्काची सांगितली, जर जागा मित्राच्या वाट्याला गेली तर ‘सांगली पॅटर्न’ राबवणार असेही सांगून झाले. आता मात्र या मुंबईवारीसाठी निधी कुणाचा होता हे आम्हाला विचारू नका, समजलं तर मतदारांना सांगू नका, कारण हे उघड गुपित.

(संकलन : उमाकांत देशपांडे, दिगंबर शिंदे )