पंतप्रधान नरेंद्र मोदी असो, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे वा खासदार संजय राऊत, कोणाचीही भीडभाड ठेवायची नाही हा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा स्वभाव. काँग्रेसमध्ये डावलले जात असल्याची भावना झाल्याने नाना पटोले २००९च्या निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये गेले. तेथे आमदार व नंतर खासदार झाले. २०१४ मध्ये मोदी सरकार सत्तेत आले. मोदींचा करिष्मा काही औरच होता तेव्हा. संसदेच्या उपाहारगृहात मोदी दुपारी भोजनासाठी गेले, तेव्हा त्यांच्या शेजारी नाना पटोले बसले होते. मग काय स्वारी एकदमच हवेत गेली. वृत्तवाहिन्यांना नानांनी मोदींच्या भोजनाचे रसभरीत वर्णन सांगितले. त्या दिवशी नाना राष्ट्रीय पातळीवर चमकले. भाजप आणि काँग्रेसमधील फरक बहुधा नानांना कळलाच नाही. पंतप्रधानांच्या उपस्थितीत झालेल्या एका बैठकीत कृषी क्षेत्रावर बोलू दिले नाही म्हणून नानांनी निषेधाचा सूर लावला. झाले भाजपने नानांवर फुल्ली मारली. नानानीही मध्येच लोकसभा खासदारकीचा राजीनामा देऊन टाकला. नाना काँग्रेसमध्ये परतले. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांना संधी मिळाली नाही, मग त्यांची निवड विधानसभा अध्यक्षपदी करण्यात आली. विधानसभा अध्यक्षपदापेक्षा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद नानांना अधिक आकर्षक वाटले. त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. (नानांनी तेव्हा राजीनामा दिला नसता तर एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर अध्यक्ष म्हणून नानांना अधिकार गाजविता आला असता) जागावाटपात शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली असता त्याला नाना पटोले यांनीच आक्षेप घेतला. नाना आणि संजय राऊत यांच्यातील वाद वाढत गेला. शेवटी नाना जागावाटपात नको, अशी भूमिका शिवसेनेला घ्यावी लागली. लोकसभेतील काँग्रेसच्या यशानंतर ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून नानांचा उल्लेख होऊ लागला. नानाही सुखावले. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळणाऱ्या यशावर नानांचे पुढील भवितव्य अवलंबून आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा