ढोल वाजवायचे आहेत पण..
देशात सर्वत्र हळूहळू सार्वत्रिक निवडणुकांचं वातावरण निर्माण होत आहे. विधानसभेच्या निवडणुकीला अजून सुमारे वर्षभराचा अवधी असला तरी लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय नेते त्या दृष्टीने कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करत आहेत. रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हेही त्या दृष्टीने तयारीला लागले आहेत. कारण त्यांचे ज्येष्ठ बंधू किरण सामंत लोकसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार आहेत. गेल्या सुमारे दीड वर्षाच्या कालावधीत सामंतांनी रत्नागिरी जिल्ह्यात आणि विशेषतः त्यांच्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात कोट्यवधी रुपयांच्या योजनांची खैरात केली आहे. गेल्या रविवारी, एकाच दिवशी त्यांनी रत्नागिरी शहर आणि तालुक्यातील सुमारे सव्वाशे कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ केला. आता मंत्रिमहोदयांचा कार्यक्रम म्हटल्यावर हार-तुरे नि ढोल-ताशे आलेच. पण कुवेतच्या अमीरांचं निधन झाल्याने राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला. त्यामुळे त्यांना फाटा देऊन कार्यक्रम साधेपणाने करावे लागले. भाषणात हा संदर्भ देऊन सामंत म्हणाले की, हे ढोल खासदारकीपर्यंत असेच ठेवा. तेव्हा आपल्याला उपयोगी पडतील. आता आपल्याला ‘समोरच्यां’चे ढोल वाजवायचे आहेत! शहरातील एखादी पाईपलाईन फुटली तर त्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याची ओरड होते. मी पालकमंत्री आहे, ओरड करणार्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढले तर त्यांना पळता भूई थोडी होईल. पण मला तसं करायचं नाही, असा सूचक इशाराही मंत्रिमहोदयांनी दिला. मागील वेळी शिवसेनेच्या उमेदवाराला ९० हजार मतांनी निवडून दिल्यानंतरही मला नारायण राणेंबरोबर भांडण्यासाठी सिंधुदुर्गचा पालकमंत्री केलं. मी मंत्रीपदावर डोळा ठेवून काम केलेलं नाही. ‘गुवाहटी ट्रीप’ यशस्वी झाली आणि मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्योगमंत्री व जिल्ह्याचा पालकमंत्री केलं. त्यामुळे विकास करणार्यांच्या मागे तुमचे आर्शिवाद राहिले पाहिजेत, असे नागरिकांना बजाविण्यात पालकमंत्री विसरले नाहीत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा