नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सक्तवसुली संचालनालय (ईडी) कारवायांपासून मुक्ती मिळविण्यासाठी भाजपच्या आश्रयाला गेल्याच्या आरोपांत तथ्य नाही. आम्ही विकासासाठी सत्तेत सहभागी झालो. या संदर्भातील पत्रावर ज्या ५४ जणांनी स्वाक्षरी केली होती, त्या सर्वांवरच ईडीचे गुन्हे वा कारवाई सुरू होती असे नव्हे, असा दावा राष्ट्रवादीचे (अजित पवार) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केला आहे.
‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘ईडीमुक्तीसाठी भाजपकडे’ या वृत्ताने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दोन वर्षांपूर्वी अजित पवार यांच्यासह भुजबळ आणि अन्य नेत्यांच्या एका गटाने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना सोडून भाजपला साथ दिली. ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या ‘२०२४- द इलेक्शन दॅट सरप्राईज्ड इंडिया’ या पुस्तकातील ‘हमारे साथ ईडी है’ या शीर्षकाच्या प्रकरणात राज्यातील राजकारण आणि फोडाफोडीच्या राजकारणातील कथित सत्य आढळते. हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर भुजबळांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन त्याचे खंडन केले. महाराष्ट्र सदन प्रकरणात उद्धव ठाकरे यांचे सरकार असताना न्यायालयाने आपणास निर्दोष ठरविले होते. ईडीपासून वाचण्यासाठी आम्ही सत्तेत सहभागी झाल्याचा आरोप मागील अनेक वर्षांपासून होत आहे. आपणास तुरुंगात जाण्याची कुठलीही भीती नाही. राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांवर ईडीने कारवाई केलेली नव्हती. त्यामुळे शंका निरर्थक ठरते. ईडीची कारवाई काही विशिष्ट समाजाच्या नेत्यांवरच झाली, असे म्हणणेही चुकीचे आहे. मतदारसंघातील विकासकामांसाठी आम्ही महायुतीत सहभागी झालो. त्यामुळे राज्यात आज कोट्यवधींची विकासकामे सुरू असून आपल्या येवला मतदारसंघात दोन हजार कोटींची कामे सुरू असल्याकडे भुजबळ यांनी लक्ष वेधले.