दयानंद लिपारे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये १५ वर्षानंतर पुन्हा एकदा छत्रपती आणि मंडलिक या तुल्यबळ घराण्यामध्ये सामना होत आहे. त्यावेळीही एका घरातील पिता विरुद्ध दुसऱ्या घरातील मुलगा अशी लढत होती. यावेळी उलटफेर होऊन अशाच प्रकारची लढत होत आहे. मागील लढतीत मंडलिक घराण्याने छत्रपती घराण्यावर मात केली होती. आता छत्रपती घराणे हे मंडलिक घराण्याला मात देणार की वेगळे काही घडणार याकडे राज्याचे लक्ष असणार आहे.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात उमेदवारीच्या घोळ जवळपास संपुष्टात आला आहे. गेले महिनाभर महाविकास आघाडी कडून उमेदवाराचा शोध सुरू होता. त्यामध्ये गोकुळचे संचालक डॉ. चेतन नरके, काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे अशी काही नावे चर्चेत होती. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, आमदार सतेज पाटील आणि माजी अध्यक्ष आमदार पी. एन. पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढण्याला नकार दिला होता. अखेर महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे उमेदवार म्हणून करवीर गादीचे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.

आणखी वाचा-सांगलीतील ‘ती’ अदृश्य शक्ती कोणती ?

दुसरीकडे महायुतीमध्ये भाजपने दावा केल्याने पेच निर्माण झाला होता. अखेरीस विद्यमान खासदार संजय मंडलिक यांनी आपल्यालाच उमेदवारी मिळणार असा ठाम दावा केला आहे. त्यांनी प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटीवर जोर देत प्रचाराला हात घातला आहे. सध्याच्या प्राथमिक हालचाली पाहता छत्रपती आणि मंडलिक घराण्यात पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीचा सामना रंगतो आहे.

पूर्वी काय घडले होते?

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात सदाशिवराव मंडलिक यांनी काँग्रेसचे उदयसिंहराव गायकवाड यांच्यानंतर मतदार संघात दबदबा निर्माण केला होता. प्रथम काँग्रेस पक्षाकडून आणि राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर सलग तीन वेळा या पक्षाकडून मंडलिक यांनी विजय मिळवला होता. २००९ साली मंडलिक यांचे पक्षनेते शरद पवार यांच्याशी बिनसले होते. शरद पवार यांनी वजनदार उमेदवाराचा शोध सुरू केला, तो छत्रपती घराण्यातील संभाजीराजे छत्रपती यांच्यापर्यंत येऊन थांबला. या निवडणुकीत शरद पवार यांनी वयोवृद्ध सदाशिवराव मंडलिक यांचा उल्लेख ‘ म्हातारा बैल ‘असा केला होता. पण तो कोल्हापूरकरांना रुचला नसल्याचे निकालातून दिसून आले. राज्याचे लक्ष वेधलेल्या या महत्त्वपूर्ण निवडणुकीत सदाशिवराव मंडलिक यांनी संभाजीराजे छत्रपती यांचा पराभव केला होता.

आणखी वाचा-सांगलीत दादा घराण्याच्या अस्तित्वाचा लढा

या वेळच्या लोकसभा निवडणुकीत छत्रपती आणि मंडलिक घराण्यातच पुन्हा एकदा लढत होत आहे. फरक एवढाच की यावेळी छत्रपती घराण्यातील वडील असलेले श्रीमंत शाहू महाराज रिंगणात आहेत. त्यांच्याविरुद्ध मंडलिक घराण्याचे सुपुत्र असलेले संजय सदाशिवराव मंडलिक मुकाबला करणार आहेत. नात्यांचा असा हा उलटफेर हे निवडणुकीचे प्रमुख वैशिष्ट्ये ठरले आहे. दोन्ही बाजूकडून प्रमुख नेत्यांची ताकद लागली आहे. शाहू महाराज यांच्या भोवती भारदस्त छत्रपती घराण्याचे वलय आहे. संजय मंडलिक यांच्या मागे सदाशिवराव मंडलिक यांचा लोकसभा निवडणुकीतील अपराजित वैभवशाली राजकीय परंपरेचा वारसा आहे. अशा तुल्यबळ दोन घराण्यातील लढत होत आहे.

ओल्या जखमांची सल

यंदा लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार निवडीचा शोध सुरू होता. तेव्हा संभाजीराजे छत्रपती यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. २००९ सालच्या निवडणुकीतील जखमा आम्ही अजून विसरलो नाही, असे विधान त्यांनी केले होते. आता ते रिंगणात नाहीत. त्यांचे वडील शाहू महाराज यांच्याकडे उमेदवारी गेली आहे. त्यामुळे जखमा पुसल्या जाणार की त्यावर आणखी व्रणाघात होणार याचा फैसला या निवडणुकीत होणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhatrapati and mandlik family face to face again after 15 years in kolhapur lok sabha constituency print politics news mrj