छत्रपती संभाजीनगर : महायुतीच्या समन्वयासाठी विभागीय पातळीवर दोन मेळावे घेतले जाणार असून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात २० ऑगस्टपासून मेळावे घेतले जाणार आहेत. लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर महायुतीमधील नेत्यांकडून योजनांबरोबरच राजकीय बांधणीला वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजीनगर शहरात दलित समाजातील महिला आणि तरुणांचा अलिकडेच मेळावा घेतला. नामांतराचा लढा, घटना बदलण्याच्या खऱ्या- खोट्या कथनामुळे पक्के झालेले समज अशा वातावरणात महायुतीकडे दलित मतदान वळेल का, हा प्रश्न सध्या कळीचा बनला आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरातील तीन मतदारसंघापैकी औरंगाबाद मध्य, पूर्व आणि आरक्षित पश्चिम मतदारसंघात अनुसूचित जाती – जमातीची मतदान लक्षणीय आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील दोन विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीमध्ये एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांना आघाडी मिळाली होती. त्यामुळे या विधानसभा मतदारसंघात दलित मते मिळाल्याशिवाय पुढे जाता येणार नाही असे लक्षात आल्यानंतर आमदार प्रदीप जैस्वाल यांनी शहरात दलित उद्योजक, तरुण आणि विशेषत: महिलांचा मेळावा घडवून आणला. ‘ मुख्यमंत्री कृतज्ञता सोहळा’ असे या कार्यक्रमाचे नाव देण्यात आले होते. शहरातील काही भागातील रस्त्यांसाठी ४०० कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्र्यांनी दिल्याचा दावा करण्यात आला. काही भागातील लोक अक्षरश: चिखलातून ये- जा करत होते. या भागात रस्त्यांची सोय निर्माण झाल्याने ते मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देत आहेत, असे चित्र राजकीय पटलावर निर्माण करण्यात आले. लाडकी बहिण योजनेसाठी पात्र ठरू शकणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना निळे फेटे बांधून कार्यक्रम स्थळी आणण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटना हीच देशाचा कारभार चालविण्यासाठी आधार आहे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत पाऊल ठेवताना घटनेस वंदन केले होते. त्यामुळे घटना बदलाचे कथन खोटे आहे, असा दावा केला. काही दलित उद्याेजकांची कर्ज प्रकरणेही या वेळी मंजूर करण्यात आली. हे सरकार घेणारे नाही , देणारे आहे असेही मुख्यमंत्री आवर्जून म्हणाले. त्यामुळे दलित मते महायुतीच्या बाजूने यावेत यासाठी प्रयत्न सुरू झाले असून त्यासाठी योजनांचे ‘ लाभार्थी’ वाढविण्यावर भर दिला जात आहे.
एका बाजूला महायुतीकडून दलित मतदारांना आपल्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न सुरू असताना दलित आणि ओबीसी अशी आघाडी तयारी करण्याची प्रक्रिया वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सुरू आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये ॲड्. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीकडे मतदारांने दुर्लक्ष केल्याने दलित मते आपोआप कॉग्रेसच्या बाजूने वळली होती. ती महायुतीच्या बाजूने करण्यासाठी होणारे प्रयत्न मतदारसंघनिहाय वेगवेगळे आहेत. औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघाची रचनेत दलित व मुस्लिम मते लक्षणीय आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी शहरात दलित समाजासाठी मेळावा घेतला. लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेलाही दलित मते एकगठ्ठा मिळाली नव्हती. त्यामुळे दलित मतांची जुळवाजुवळ करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
हेही वाचा : लोकसभेमध्ये अनुसूचित जातींमधील ‘प्रबळ’ गटांना आहे अधिक प्रतिनिधित्व? काय सांगते आकडेवारी?
घटना हीच सर्वोच्च आहे. ती बदलण्याचा प्रश्नच नाही, अशी उत्तरे देत आता महायुतीचे नेते देऊ लागले आहेत. मुख्यमंत्र्यानी अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, संजय शिरसाठ आणि प्रदीप जैस्वाल या त्यांच्या मर्जीतील नेत्यांना पुढे करत केलेली जुळवाजुळव पुढे सरकेल का, याची उत्तरे नकारात्मक अधिक असल्याचे सांगण्यात येते. मात्र, गर्दी जमविण्यात या नेत्यांना यश मिळत आहे.