छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीमध्ये दलित मतांचा कौल महाविकास आघाडीकडे झुकल्याने दिसून आल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी आता सरकारी योजनांमधील सामान वाटपाबरोबरच मतदारांना बौद्ध तीर्थस्थळी पाठविण्याचे कार्यक्रम आखले आहेत. एवढे दिवस मराठवाड्यातील विविध मतदारसंघातून अयोध्या, तिरुपती अशी तीर्थयात्रा घडवून आणली जात असे आता गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनी तीन हजार मतदारांना बोधगयाचे दर्शन घडवून आणणार आहेत. बुधवारी दुपारी रेल्वेने यात्रेकरुंना रवाना करण्यात आले.
केवळ बोधगयाच नाही तर पोखरा देवीच्या दर्शनासाठी ३०० जण आणि अष्टविनायकाच्या यात्रेसाठी ३०० जणांचा गट पाठविण्यात आला आहे. अचानक यात्रांचा हंगामात तेजी आली आहे. दुसऱ्या बाजूला लाडकी बहीण योजनेची रक्कम वाटप, दुसरीकडे सरकारी योजनेतून मिळणारे साहित्य आणि क्रीडा साहित्य वाटपावर अनेक मतदारसंघात जोर असल्याचे दिसू लागले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजप व शिवसेनेच्या बाजूने केवळ लाडकी बहीण या योजनेचाच बोलबाला आहे. त्यामुळे आपल्या बाजूने मतदान वळविण्यासाठी योग्य ती वाट भाजप कार्यकर्त्यांना मिळत नसल्याने आता बहुतांश सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघात यांत्रांच्या आयोजनावर जोर दिला जात आहे.
हेही वाचा…Assam Row: आसाममध्ये बदलापूरसारखा उद्रेक; अल्पवयीन मुलीच्या छेडछाड प्रकरणात मारवाडी समाज लक्ष्य
प्रशांत बंब यांनी गंगापूर मतदारसंघात अनेक प्रकारची बांधणी सुरू केली आहे. राज्यातील समाजशास्त्र महाविद्यालयात शिकलेल्या मुलांना त्यांनी सर्व्हेक्षणाच्या कामाला लावलेले आहे. प्रत्येक गावात तसेच प्रत्येक घराची निकड माहीत करुन घेणारे कार्यकर्ते असल्याने ‘ पूर्तता करा’ अशी व्यूहरचना त्यांनी आखली असल्याची चर्चा गंगापूर मतदारसंघात ऐकावयास मिळते. याच मतदारसंघात पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनीही जोर लावला आहे. अजित पवार गटाचे सतीश चव्हाण यांनी गावोगावी रस्ते करण्याची यंत्रणा उभी केली केल्याचे त्यांचे समर्थक सांगत आहेत. त्यांच्या कार्यालयासमोर गंगापूरमधून मदत मागण्यासाठी येणाऱ्यांचीही रीघ लागलेली असते. अनेक गावातील सरपंच आणि तरुण नव्या राजकीय रचनेत स्वत: कोठे बसवून घेता येता का, याची चाचपणी करत आहेत. या काळातच व्दारका, जगन्नाथ्ज्ञ पुरी, रामेश्वरम, बद्रीनाथ या यात्रांबरोबर आता बोधगया हे नवे ठिकाण भाजपच्या आमदारांनी नव्या बांधणीसाठी निवडले असल्याची चर्चा मराठवाड्यात आहे. तालुका पातळीवरही सामाजिक न्याय भवन उभारणीसाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले होते. मंत्री संजय बनसोडे यांनी तर उदगीर मतदारसंघात सामाजिक न्याय भवनाच्या उद्घाटनास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रित केले आहे.