Sindhudurg Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: ‘असे पुतळे पडतात, यात कलाकाराचा दोष मानता येणार नाही’…. ‘पुतळ्याचे पदस्थल (चबुतरा किंवा प्लिंथ) आणि पुतळा यांच्या उंचीचा मेळ घालण्याची जबाबदारी फक्त शिल्पकारावर टाकून कसे मोकळे होता येईल?’…. ‘पुतळे भक्कम, मनासारखे घडवायचे असतील तर शिल्पकाराला वेळ द्यायलाच हवा’… ‘आमचा कार्यक्रम अमुक तारखेला आहे त्याआधी पुतळा करा, अशी ऑर्डर सोडणे हाच मुळात संबंधित सत्ताधाऱ्यांनी केलेला कलावंताचा अवमान असतो’… अशा प्रतिक्रिया छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवण समुद्रकिनाऱ्यानजीक उभारलेला पुतळा पडून ध्वस्त झाल्यानंतर महाराष्ट्रातले शिल्पकार आणि दृश्यकलावंत यांच्याकडून उमटल्या आहेत.
हेही वाचा >>> विरोधक आक्रमक
‘कलाकाराचा दोष मानता येणार नाही’ असा ठाम निर्वाळा आपण एकट्यादुकट्या पुतळ्यापुरता देत नसून, गेली अनेक वर्षे आपली व्यवस्था आणि त्यातून उभारले जाणारे पुतळे यांची अवस्था पाहूनच देतो आहोत, असे कलाशिक्षण तज्ज्ञ आणि समीक्षक महेंद्र दामले यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट केले. खर्च, वेळ यांचा मेळ घालण्याची पाळी शिल्पकारांवर येणे वाईटच, असे ते म्हणाले. या पुतळ्याचे शिल्पकार जयदीप आपटे यांच्याशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न वारंवार केला असता, आपण प्रवासात आहोत, उद्या/ तासाभराने/ काही वेळाने बोलू अशी उत्तरे त्यांच्याकडून मिळत राहिली.
हेही वाचा : पदावर असताना मृत्यू पावलेले नांदेडमधील सातवे लोकप्रतिनिधी !
शिल्पकार गिरीश आरज यांनी पुतळ्याच्या जागेची निश्चितीच चुकल्याचा मुद्दा मांडला. ते म्हणाले की, मालवण समुद्रकिनाऱ्यालगत, पण उंचावर हा पुतळा असल्यामुळे तो समुद्रकिनाऱ्यावरून दिसत नाही, तसेच तेवढ्या उंचीवर फार तर साठ फूट रुंद आणि तेवढ्याच लांबीच्या मोकळ्या जागेत हा पुतळा असल्यामुळे तो पाहण्यासाठी अवकाशाची (स्पेस) कमतरता भासते. पुतळ्याचे पदस्थल कमी आणि पुतळा अधिक उंचीचा, असा निर्णय कोणताही शिल्पकार घेणार नाही… असले निर्णय लादले गेलेलेच असू शकतात, असेही गिरीश आरज यांनी सूचित केले.
पदस्थल आणि त्यावरचा पुतळा यांचा मेळ घालण्याचे काम शिल्पकाराचेही असतेच, पण त्याकामी त्याला अन्य सर्व यंत्रणांचे सहकार्यही अपेक्षित असते, यावर स्वप्नील कदम यांनी भर दिला. रत्नागिरीस राहणारे स्वप्नील कदम यांनी घडवलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा गेली अनेक वर्षे ठाणे रेल्वे स्थानकालगत उभा आहे. पदस्थल आणि पुतळा यांचा ताळमेळ घालताना अनेक तंत्रे वापरली जातात. पुतळयाच्या पायाचा भाग जड वजनाचा करण्याचे साधे पथ्य बहुतेक शिल्पकार अनेक वर्षे पाळत आलेले आहेत. त्यासाठी पायथ्याच्या भागात भरीव ब्राँझ वापरलेले ब्रिटिशकालीन पुतळे आजही मुंबईत दिसतात. हल्ली काहीजण तितके जड काम करत नाहीत.
थ्रीडी प्रिटिंग की धातूचे ओतकाम?
‘पुतळा थ्रीडी प्रिंटिंग तंत्राने केला’ असे मालवणच्या या पुतळ्याचे शिल्पकार जयदीप आपटे यांनी स्वत:च सांगितल्याचा गैरसमज एका मराठी दैनिकाने (‘लोकसत्ता’ नव्हे) पुतळा अनावरणाच्या वेळी दिलेल्या बातमीतून होतो, परंतु वस्तुस्थिती तशी असू शकत नाही, असे ‘थ्रीडी प्रिंटिंग’सह अनेक तंत्रांमध्ये काम करणारे दृश्यकलावंत निलेश किंकळे यांनी सांगितले. ‘एवढ्या मोठ्या पुतळ्यासाठी थ्रीडी प्रिंटिंग ही मधली पायरी असू शकते’ असे निलेश किंकळे म्हणाले. म्हणजे काय, याचा खुलासा गिरीश आरज यांनी केला. जयदीप यांनी ज्या ‘सीएनसी’ तंत्राचा उल्लेख केला आहे, त्याने मूळच्या लहान आकाराच्या पुतळ्यावरून कितीही मोठ्या आकाराचे मॉडेल म्हणजे प्रतिरूप (पुतळ्यासारखेच, पण खुद्द पुतळा नाही) बनवता येते. हे प्रतिरूप थर्मोकोलचेही असू शकते. त्यावर फायबरचा साचा (डाय) घालून, त्या साच्यामध्ये धातूचे ओतकाम करून मग पुतळ्याचे अंतिम रूप तयार होत असते, असे गिरीश आरज म्हणाले.
काही अनुत्तरित प्रश्न
छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवण येथील पुतळा कसा होता, याविषयी माहीतगार गोटातून ‘लोकसत्ता’स मिळालेल्या माहितीमुळे आणखी काही प्रश्न निर्माण होतात
१. पुतळा मिश्र धातूचा (पितळ) आणि पाच टन वजनाचा होता. इतका वजनी पुतळा तोलून धरण्यासाठी आधार म्हणून पुतळ्याच्या आत आणि त्याखाली असे एकंदर १० ते १२ टन पेलणाऱ्या धातूचा वापर आवश्यक असतो, तसा इथे झाला होता का?
२. पुतळ्याला आधार म्हणून साधे पोलाद (माइल्ड स्टील) वापरले तर ते गंजण्याचा संभव असतो, तोही खाऱ्या वाऱ्यांच्या परिसरात अधिकच; म्हणून सहसा ३१६ ग्रेडचे स्टेनलेस स्टील वापरले जाते. पण या पुतळ्यासाठी काय वापरले गेले?
३. ३५ फुटी पुतळा आतून पोकळ असतोच, तसा हाही होता आणि त्याच्या धातूची जाडी सुमारे दीड इंच होती- एवढी जाडी सरासरीपेक्षा अधिक मानली जाते; पण त्यामुळेच आतला आधार अधिक भक्कम हवा, तो तसा होता ना?
४. १५ दिवसांत पुतळ्याचे धातूकाम पूर्ण होऊन उभारणीही झाली. इतका कमी वेळ मिळणे तांत्रिकदृष्ट्या उचित मानले जात नाही, याची कल्पना आयोजकांना होती का?