सध्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत काँग्रेसने ओबीसी मतदारांना आकर्षित करण्यासाठी जातीनिहाय जनगणना करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या राज्यांत काँग्रेसच्या या आश्वासनाचा जनतेवर खास प्रभाव पडल्याचे दिसत नाहीये.
लोकांसाठी शेतकरी कर्जमाफी जवळचा विषय
काँग्रेसच्या जातीनिहाय जनगणनेच्या आश्वासनाबद्दल जनतेला काय वाटते, हे जाणून घेण्यासाठी इंडियन एक्स्प्रेसने साधारण आठ दिवस उत्तर छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमधील महाकौशल भागात लोकांशी बातचित केली. मात्र, या भागातील मोजक्याच लोकांनी जातीनिहाय जनगणना हा राजकीय मुद्दा आहे, असे मत व्यक्त केले. याउलट शेतकरी कर्जमाफी हा मुद्दा अनेक मतदारांना जवळचा वाटतो. सत्तेत आल्यास छत्तीसगडमधील शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल, असे आश्वासन काँग्रेसचे नेते भूपेश बघेल यांनी दिले आहे. कुर्मी आणि साहू जातीतील मतदारांनी या निवडणुकीत जातीआधारित विचार न करता एक शेतकरी म्हणून कर्जमाफीच्या मुद्द्याला महत्त्व दिल्याचे दिसते.
जातीआधारित जनगणनेच्या मुद्द्याला काँग्रेसकडून महत्त्व
काँग्रेसने सत्ता आल्यास जातीनिहाय जनगणना करण्यात येईल, असे आपल्या जाहीरनाम्यात नमूद केले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी या महत्त्वाच्या नेत्यांनी हाच मुद्दा लावून धरल्याचे दिसत आहे. भाजपाने मात्र या मुद्द्यावर सावध भूमिका घेतली आहे. २ नोव्हेंबर रोजी भाजपाचे नेते अमित शाह छत्तीसगडमध्ये बोलताना “भाजपाने जातीआधारित जनगणनेला कधीही विरोध केलेला नाही, मात्र याबाबतचा निर्णय पूर्ण विचार करूनच घेतला पाहिजे”, अशी भूमिका शाह यांनी मांडली. दरम्यान, भाजपाने छत्तीसगडमध्ये एकूण ३१, तर काँग्रेसने ३० ओबीसी नेत्यांना उमेदवारी दिली आहे.
भाजपाने कर्जमाफीचे आश्वासन न दिल्यामुळे नाराजी
छत्तीसगडमधील कावर्धा तहसीलमधील शेतकरी भगत पटेल यांची भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. काँग्रेसने शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आता भाजपाचे उमेदवार विजय शर्मा यांना मिळणारी हिंदू मते काँग्रेसच्या मोहम्मद अकबर यांना मिळतील. त्यामुळे येथून आता काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय होईल, असे मत व्यक्त केले. अकबर रोहिंग्या मुस्लिमांना येथे आश्रय देत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. काँग्रेसकडून मात्र हा आरोप सातत्याने फेटाळला जातो. पटेल यांना भाजपाचा विजय व्हावा असे वाटते. मात्र, काँग्रेसप्रमाणे भाजपाने कर्जमाफीचे आश्वासन न दिल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली.
“सर्वजण मुलींचीच काळजी घेतात”
मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री तथा भाजपाचे नेते शिवराज चौहान यांच्या लाडली बहना
योजनेची गोटेगाव, नरसिंहपूर या भागातील ओबीसी मतदारांमध्ये चर्चा होत आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना प्रतिमहिना १२५० रुपयांची मदत केली जाते. पिपारिया येथे एका लोधी समाजाच्या तरुण मतदाराला या योजनेबद्दल विचारण्यात आले. यावर बोलताना ‘या योजनेमुळे महिलांना महिन्याला पैसे मिळतात. मात्र, या सरकारने पायाभूत सुविधा आणि नोकरी निर्माण करण्याकडे लक्ष दिलेले नाही’, अशी प्रतिक्रिया या तरुणाने दिली. तसेच महिलांना प्रतिमहा १२५० रुपये मिळतात; हे पैसे महिला आपल्या पतीला देत नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी कौटुंबिक कलह पाहायला मिळत आहेत. येथे सर्वजण मुलींचीच काळजी घेतात. मुलांवर कोणीही प्रेम करत नाही, अशी खंत या तरुणाने व्यक्त केली.
“विधानसभेत काँग्रेस, लोकसभेत भाजपा”
मध्य प्रदेशमधील छिंदवाडा जिल्ह्यातील जुन्नरदेव या मतदारसंघातील सुरज या तरुणाचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. राज्यातील भाजपाने माझा भ्रमनिरास केला आहे. सध्या देशातील दहशतवाद कमी झाला आहे, राम मंदिर लवकरच प्रत्यक्षात येईल. त्यामुळे राज्याच्या विधानसभा निवडणुकीत मी काँग्रेसचे नेते कमलनाथ, तर लोकसभेच्या निवडणुकीत मी भाजपाला मतदान करेन, अशी प्रतिक्रिया या तरुणाने व्यक्त केली.
“आमच्याकडे जात हा प्रमुख मुद्दा नाही”
बारगी मतदारसंघातील जबलपूर येथील विश्वकर्मा जातीतील काही मतदारांशी इंडियन एक्स्प्रेसने चर्चा केली. या मतदारांनी जातीआधारित जनगणनेचा उल्लेखही केला नाही. याच मतदारांतील एकाने आमच्या राज्यात जात हा मुख्य मुद्दा नाही. हा मुद्दा उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांत असेल. आमच्याकडे मात्र तसे काही नाही, अशी प्रतिक्रिया दिली.