छत्तीसगड राज्यासह इतर पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. या निवडणुका जिंकण्यासाठी काँग्रेस पूर्ण ताकदीने प्रचार करीत आहे. दुसरीकडे छत्तीसगडमध्ये पुन्हा सत्तेत येण्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या एका फोटोची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. एका बैठकीत ते कँडी क्रश हा मोबाईल गेम खेळताना दिसत आहेत. याच फोटोचा आधार घेत भाजपाने बघेल यांच्यावर टीका केली आहे. तर, मला हा मोबाईल गेम खेळायला आवडतो. तो मी भविष्यातही खेळत राहीन, असे प्रत्युत्तर बघेल यांनी भाजपाला दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“… म्हणून मुख्यमंत्री निवांतपणे खेळतात कँडी क्रश”

कँडी क्रश हा प्रसिद्ध असा मोबाईल गेम आहे. लहान मुलापासून ते प्रौढ व्यक्तीपर्यंतच्या सर्वच वयोगटांतील लोक हा गेम आवडीने खेळतात. सारख्या दिसणाऱ्या कँडी एका रांगेत आणून गुण मिळवायचे आणि जिंकायचे, असे काहीसे या मोबाईल गेमचे स्वरूप आहे. भूपेश बघेल यांचा हाच गेम खेळतानाचा फोटो भाजपा आयटी सेलचे प्रभारी अमित मालवीय यांनी समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केला. याच फोटोचा आधार घेत, त्यांनी बघेल आणि काँग्रेस पक्षावर टीका केली. कितीही मेहनत घेतली तरीही पुन्हा सत्तेत येणार नाही, याची कल्पना मुख्यमंत्री बघेल यांना आहे. कदाचित याच कारणामुळे मुख्यमंत्री काँग्रेसच्या उमेदवारनिवडीच्या बैठकीत निवांतपणे कँडी क्रश हा गेम खेळत आहेत, असे खोचक भाष्य मालवीय यांनी केले.

बघेल यांचे जशास तसे उत्तर

मालवीय यांच्या या टीकेला बघेल यांनी जशास तसे उत्तर दिले. यापूर्वी मी गेडी खेळ (लाकडी पोलच्या साह्याने चालणे) खेळायचो. त्यावेळीही भाजपा आक्षेप घेत असे, असे बघेल म्हणाले. “मी गेडीवर चालणार, मी विटी-दांडू खेळणार, कँडी क्रश हादेखील माझा आवडता खेळ आहे. मी या खेळात अनेक लेव्हल पूर्ण केल्या आहेत. भविष्यातही मी हा खेळ खेळणार. कोणाला आशीर्वाद द्यायचा याची छत्तीसगडच्या जनतेला कल्पना आहे,” अशी प्रतिक्रिया बघेल यांनी दिली. भाजपाला माझ्या प्रत्येक कृतीवर आक्षेप असतो. निवडणुकीत कोणाला विजयी करायचे आणि कोणाला पराभूत करायचे हे छत्तीसगडमधील जनताच ठरवेल, असेही बघेल म्हणाले.

“छत्तीसगडच्या जनतेशी पाच वर्षांपासून खेळ”

बघेल यांच्या या प्रतिक्रियेनंतर माजी मुख्यमंत्री रमणसिंह यांनी त्यांच्यावर पलटवार केला. “बघेलजी तुम्ही छत्तीसगडच्या जनतेशी गेल्या पाच वर्षांपासून खेळत आहात. घोटाळ्याचा खेळ खेळता येत नसल्यामुळे तुम्ही आता कँडी क्रश हा गेम मोबाईलमध्ये खेळत आहात,” अशी टीका रमणसिंह यांनी केली.

दरम्यान, छत्तीसगडमध्ये ७ व १७ नोव्हेंबर अशा दोन टप्प्यांत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. भाजपाने आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण ६४ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. या राज्यात काँग्रेस विरुद्ध भाजपा, असा थेट सामना पाहायला मिळणार आहे. २०१८ साली काँग्रेसने भाजपाची १५ वर्षांची राजवट संपुष्टात आणत तेथे काँग्रेसने सत्ता स्थापन केली होती. या राज्यात काँग्रेसने ९० पैकी ७१ जागा जिंकल्या होत्या; तर भाजपाला फक्त १५ जागा जिंकता आल्या होत्या. बहुजन समाज पक्षाला एक; तर माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांच्या जनता काँग्रेस छत्तीसगड या पक्षाला एक जागा मिळाली होती.

मात्र, सध्या राज्यातील परिस्थिती काहीशी बदलली आहे. येथे गेल्या पाच वर्षांत भाजपाने बघेल सरकारवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानेदेखील या निवडणुकीत लक्ष घातले आहे. त्यामुळे ही निवडणूक चांगलीच अटीतटीची होणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhattisgarh assembly election 2023 bjp criticizes cm bhupesh baghel on candy crush game prd
Show comments