छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. येथे पहिल्या टप्प्यातील मतदान ७ नोव्हेंबर रोजी पार पडले असून दुसऱ्या टप्प्यातील मतदान १७ नोव्हेंबर रोजी होणार आहे. या राज्यात भाजपा आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत होत आहे. मात्र, बहुजन समाज पार्टी (बीएसपी), गोंडवाना गणतंत्र पार्टी (जीजीपी), जनता काँग्रेस छत्तीसगड-जोगी (जेसीसी-जे) आदी पक्षांनीही निवडणुकीत उडी घेतल्यामुळे काँग्रेस आणि भाजपाला मतविभाजनाचा फटका बसण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपाची छत्तीसगडवर १५ वर्षे सत्ता

बीएसपी, जीजीपी, जेसीसी-जे आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (सीपीआय) आदी पक्ष छत्तीसगडची निवडणूक लढवत आहेत. २०१८ सालच्या निवडणुकीत काँग्रेसने ९० पैकी एकूण ६८ जागांवर विजय मिळवला होता, तर भाजपाला फक्त १५ जागांवर विजय मिळवता आला होता. २०१८ सालाच्या आधी भाजपाने सलग तीन निवडणुका जिंकल्या होत्या. म्हणजेच भाजपाने २०१८ सालाच्या अगोदर छत्तीसगडवर सलग १५ वर्षे राज्य केले होते.

जेसीसी-जे आणि बीएसपी पक्षाने जिंकल्या होत्या सात जागा

छत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री अजित जोगी यांनी जेसीसी-जे पक्षाची २०१६ साली स्थापना केली होती. या पक्षाने बहुजन समाज पार्टीशी युती करत २०१८ सालची निवडणूक लढवली होती. या दोन्ही पक्षांनी एकत्र येत एकूण सात जागांवर विजय मिळवला होता. यातही जेसीसी-जे पक्षाने पाच जागा जिंकत एकूण ७.६१ टक्के मते मिळवली होती; तर बीएसपी पक्षाने दोन जागा जिंकत ३.८७ टक्के मते मिळवली होती. सध्या जेसीसी-जे पक्षाच्या रेणू जोगी या एकमेव महिला आमदार आहेत. रेणू जोगी या अजित जोगी यांच्या पत्नी आहेत. सध्याच्या निवडणुकीत मात्र जेसीसी-जे हा पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असून अजित जोगी यांचे पुत्र अमित जोगी या पक्षाचे नेतृत्व करत आहेत. या निवडणुकीनंतर कोणताही पक्ष आमच्या सहकार्याशिवाय सरकारची स्थापना करू शकणार नाही, असा दावा अमित जोगी यांनी केला.

यावेळी जेसीसी-जी आणि बीएसपी यांच्यात युती

२०१८ सालच्या निवडणुकीत जेसीसी-जी पक्षाने तीन जागा बिलासपूर विभागातून, तर रायपूर आणि दुर्ग विभागातून प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला होता. या निवडणुकीत जेसीसी-जी पक्षाने काँग्रेसची मते फोडली होती. परिणामी या भागातील रामपूर, मुंगेली, बिल्हा, बेलतारा यांसह एकूण पाच जागांवर भाजपाचा विजय झाला होता. २०२३ सालच्या म्हणजेच या निवडणुकीतही अमित जोगी यांनी युतीसाठी मायावती यांची भेट घेतली होती. मात्र, ही युती होऊ शकली नाही. सध्या जेसीसी-जी आणि बीएसपी हे दोन्ही पक्ष येथे स्वतंत्रपणे निवडणुका लढवत आहेत.

चार जागांवर बीएसपीचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर

यावेळी बीएसपी पक्षाने जेसीसी-जे या पक्षाशी नव्हे, तर जीजीपी पक्षाशी युती केली आहे. बीएसपी एकूण ३३ जागा लढवत आहे, तर जीजीपी पक्ष ५७ जागा लढवत आहे. २०१८ सालच्या निवडणुकीत बसपाने दोन जागांवर विजय मिळवला होता, तर बिलासपूर विभागातील एकूण चार जागांवर बीएसपीचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. २०१८ सालच्या निवडणुकीत जीजीपी पक्षाचा एकाही जागेवर विजय झाला नव्हता. मात्र, या पक्षाने १.७३ टक्के मते मिळवली होती. कोरबा येथील पाली-तनहाकर या जागेवर जीजीपी पक्षाचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होता. या जागेवर काँग्रेसचा विजय झाला होता.

सीपीआय पक्षाला मिळाली होती ०.३४ टक्के मते

या निवडणुकीत आम्ही कमीत कमी एका जागेवर विजय मिळवणार, असा विश्वास जीजीपीने व्यक्त केला आहे. “भारतपूर-सोनहात या जागेवर आमचे सरचिटणीस श्यामसिंह मारकाम हे निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे या जागेवर आमचा विजय होण्याची शक्यता आहे. आम्ही सुरगुजा या आदिवासी पट्ट्यात चांगली लढत देऊ”, असे या पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष कुलदीप प्रजापती म्हणाले; तर सीपीआय पक्षाने २०१८ साली एकाही जागेवर विजय मिळवला नव्हता. या पक्षाला ०.३४ टक्के मते मिळाली होती. या पक्षाला दंतेवाडा आणि कोंटा जागेवर जनाधार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhattisgarh assembly election 2023 bsp cpi ggp contesting election vote division of congress and bjp prd