विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्तीसगडमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. येथे भाजपा आणि काँग्रेस या पक्षांकडून पूर्ण ताकदीने प्रचार केला जात आहे. असे असतानाच आता काँग्रेसने आपल्या उमेदवारांची शेवटची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीमध्ये एकूण सात जागांसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेसने या यादीच्या माध्यमातून चार विद्यमान आमदारांना तिकीट नाकारले आहे. छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या एकूण ९० जागांसाठी निवडणूक होत असूनत काँग्रेसने आपल्या २२ विद्यमान आमदारांना तिकीट नाकारले आहे.
कोणाला तिकीट नाकारले? कोणाला संधी?
काँग्रेसने आपल्या शेवटच्या यादीत सात नावांमध्ये विद्यमान आमदार अंबिका सिंह देव यांची उमेदवारी कायम ठेवली आहे. त्या कोरिया जिल्ह्यातील बैखुंटपूर येथून निवडणूक लढवतील; तर रायपूर शहर उत्तर मतदारसंघाचे आमदार कुलदीप जुनेजा यांचीदेखील उमेदवारी काँग्रेसने कायम ठेवली आहे. तिकीट गमावलेल्या आमदारांमध्ये महासमुंद जिल्ह्यातील सरायपालीचे आमदार किस्मत लाल नंद यांचा समावेश आहे. त्यांच्याऐवजी यावेळी अनुसूचित जातीचे स्थानिक नेते चतुरी नंद यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महासमुंद येथील आमदार विनोद चंद्राकर यांच्याऐवजी महासमुंदच्या जिल्हाप्रमुख रश्मी चंद्राकर यांना तिकीट देण्यात आले आहे. बलोदा बाजार जिल्ह्यातील कसडोलमध्ये आमदार शकुंतला साहू यांना यावेळी तिकीट नाकारण्यात आले आहे. त्यांच्याऐवजी आता संदीप साहू यांना तिकीट देण्यात आले आहे. धामतारी जिल्ह्यातील सिहावा मतदारसंघाच्या आमदार लक्ष्मी ध्रुव यांनाही काँग्रेसने तिकीट दिलेले नाही. त्यांच्याऐवजी अंबिका मरकाम या निवडणूक लढवतील. त्या २००८ साली आमदार होत्या.
“… म्हणून २२ आमदारांना तिकीट नाकारले”
धामतारी या मतदारसंघासाठी काँग्रेसने यावेळी ओमकार साहू यांना तिकीट दिले आहे. विद्यमान २२ आमदारांना तिकीट नाकरण्याच्या निर्णयावर काँग्रेसचे प्रवक्ते विकास बजाज यांनी प्रतिक्रिया दिली. “काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी दिलेल्या अभिप्रायाच्या आधारेच २२ आमदारांना तिकीट नाकारण्यात आले आहे. आम्ही सर्व समुदायांचे प्रतिनिधित्व राहील याची काळजी घेतली आहे. आमच्या या तिकीटवाटपातून सर्वसमावेशकताच दिसून येते,” असे बजाज म्हणाले. दरम्यान, काँग्रेसने एकूण २२ महिलांना यावेळी तिकीट दिले आहे.